[५६५] श्री. २२ मार्च १७५७.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी.
विद्यार्थी शिवभट साठे कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति, उपरि येथील कुशल ता चैत्र शुध्द ३ मुक्काम नागलवाडी जाणून स्वकीय लेखन कीजे. विशेष. आज्ञा घेऊन स्वार जालो ते छ मजकुरीं मु मजकुरास येऊन दाखल जालों. श्रीमंतही येथून पांच कोसांवर सेनेसह वर्तमान येऊन प्रविष्ट जाले. दर्शनास मुहूर्त नवता. उदयीक अथवा परवा भेट होईल. अनंतर सविस्तर लिहिलें जाईल. तरी भेटी जालियावरी श्रीमंतांचीं पत्रें आपणांस येतील. तरी भेटीस यावें. शहरींचे अधिकारी यांचीही भेटी व यजमानाचीही भेटी मनोदय असे. पुढें रा. कान्होजी भोसले आपणाकडे आले. त्यास श्रीमंत भेटीस पांच सात कोस येणार त्यांस मना केलें कीं दिवस उत्तम नवता. यामुळे तेथें त्यांनीं मुक्काम केले. आपणांस कानोजी भोसले यांणीं मेजवानीस रहाविलें. त्यांचाही गांव फौजेसन्निध तीन कोस असे त्यामुळे गुरुवारी प्रात:काळीं भेटी जाहालियावरी करंजीचा घाट उतरोन तीसगांवास येतों. कळले पाहिजे. हे विनंति.