[५६२] श्री. २१ जून १७५७.
पुरा आशीर्वाद उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री बापू कोल्हटकर यांनीं मजकूर सांगितला तो लिहिला. त्यांस श्रीमंत राजश्री भाऊकडे जावें तर उगेंच गेलें असतां ठीक नव्हे, याकरितां जाणेचा अनमान केला. कांही विना निमित्य झाल्याशिवाय जाता येत नाहीं. कांहीं संध पाहून जातों. त्यास केवळ आपण होऊन जबानी सारा मजकूर सांगावा तर प्रमाणांत येईल न येईल; कसा प्रसंग पडेल नकळे. त्यास राजश्री भिकाजी नाईक बावाचें पत्र आमचे नांवें घेऊन पाठवावें. त्यांत मागील कृतही थोडकीशी लिहावी व पुढें मनसब कोणत्या रीतीनें करावयाचा हें लिहावें. या कामांत संधानें आहेत त्यांचीही एका दोघा गृहस्थांचीं नांवें लिहावी. ह्मणजे तेथें जाऊन या कामाकरितां महिनापंधरा दिवस राहून, युक्तीनें खुलासा घेऊन, मग हें पत्र त्यास दाखवून, ठीक करून श्रीमंत राजश्री भाऊचें पत्र घेऊन, राजश्री बावास पाठवून देऊं. ह्मणजे पुढें कार्यभागास ठीक पडेल. त्यास तुह्मी राजश्री भिकाजी नाईक बावाचे घरीं जाऊन, त्याचें पत्र घेऊन, पाठवावें ह्मणजे आह्मांस भाऊंशीं बोलणें ठीक पडेल. र॥ छ ३ सवाल. लोभ करावा हे आशीर्वाद.