[५५२] श्री.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
चरणरज मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल म्हणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. कृपा करून पत्र देविलें तें सुसमयीं प्रविष्ट होऊन बहुत संतोष जाला. श्रीयात्रेशीं जाणें, साहित्यपत्राविशीं लिहिलें, त्याजवरून पत्रें पाठविलीं आहेत. पावतील. राजश्री दिनानाथजीविशीं लिहिलें. त्यास, आपणहि लिहिलें आणि यांचा अगत्यवाद सर्वांसही आहे. पुढें त्या प्रांतास गेलियावर बोलाविलें आहे. प्रस्तुत आपण समागमें न्यावयाविशीं बोलाविलें, त्यावरून त्यांची रवानगी केली. बळवंतसिंग याचा मजकूर लिहिला. त्यास साकल्य अर्थ पंत म॥ निलेशीं समक्ष बोललों. निवेदन करतील, त्याजवरून ध्यानास येईल. बहुत काय लिहिणें. हे विनंति. मोर्तब सूद.