[५५१] श्री.
वेदमूर्ति राजश्री वासुदेवभट दीक्षित यांचे सेवेसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. मौजे जांबगाडदीचा मोकादमीचा आहे. याजविशीं पूर्वी लिहिलेंच होते. ऐशियासी मौजे मजकुरास कौलपत्र देऊन अबादी करविली आहे. त्यास, कौल करार राहिल्यानें तुमच्याहि कार्याचीच आहे. यास्तव हें पत्र लिहिलें असे. तरी कौलाप्रमाणें रयतीपासून तफरीकबरहुकूम गुदस्ताप्रमाणें वसूल घ्यावा. कौलास अंतर जालिया रत रहाणार नाहीं, हें तुह्मीहि जाणतच आहां. आबादी राहिलिया तुमच्याहि कार्याचीच आहे. आमचा वतीन गाऊ त्याची आबादी राखावी, कौल पाळावा, यांत उत्तम आहे. आह्मांसी स्नेह धरलिया कार्याचा आहे, वाया जाणार नाहीं. गुदस्ताप्रमाणें मौजे मजकूरचा वसूल घेऊन आबादी राहे तें करावें. छ २३ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विनंति. मोर्तबसूद.
श्रीह्माळसाकांत
चरणी तत्पर । खंडोजी
सुत मल्हारजी होळकर.