[५४९] श्री.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित यांसी :-
सेवक दत्ताजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान कळलें. आह्मीं आज घांट उतरून आलों. श्रीगंगा टोक्यावर उतरूं. आपणास कळावें ह्मणून लिहिलें असे. रा छ २१ माहे जिल्हेज. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
[५५०] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
आज्ञाधारक मल्हारजी होळकर कृतानेक दंडवत विज्ञापना येथील कुशल तागाइत आश्विन वद्य नवमी मु॥ पुणे स्वामीच्या आशीर्वादेकरून यथास्थित असो. विशेष. कृपा करून पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन संतोष जाहाला. पत्रार्थ ध्यानास आला. रुपयांविशीं लिहिलें. ऐशास, स्वामीच्या लिहिण्यापूर्वीच बुंधेलखंड प्रांतांतून राजश्री गोविंद बल्लाळ यांजकडून हुंडी आमच्या ऐवजी श्रीची करवून आपणाकडे रवाना करविली. ऐसें असतां, अद्यापि रुपये न पावले. प्रस्तुत राजश्री गोविंद बल्लाळ यांसि पत्र लि॥ आहे. बहुधा मागें ऐवज त्यांनी पाविला असला तरी उत्तमच जालें. नाहीं तरी, हाली पत्र पाठविलें आहे तें त्यांसी पावावें. रुपये पावते करतील. येणेप्रमाणें ऐवज तुह्माकडे मशारनिलेच्या मारफातीनें पाठविला रुपये :-
१७२३५ कर्ज देविले ते.
५००० घाट बांधावयासी.
-------------
२२२३५
बावीसहजार दोनशे पसतीस पाठविले आहेत. मशारनिले पावते करतील. आपल्या लिहिल्यापूर्वीच अगोदर रुपयांची रवानगी स्वत:कडे केली आहे ते घेऊन उत्तर पाठविलें पाहिजे. सेवेसी विदित होय. हे विज्ञापना. मोर्तबसूद.