[५४६] श्री.
चरणरज बापूजी महादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ऐशीजे :-
माघ वद्य चतुर्दशीनंतर वर्तमान-अविंधाचे सैन्यांतील गोविंद नाईक व दयानाथ वकील जाटाचा व प्रतापनारायण यांस राजे यानें बलाविलें होतें. ते पहिलें दिवशी त्रयोदशीस गेले. मामलतीची बोली होती. राजा ह्मणतो कीं, गनीम येतील, मुलूख लुटतील, याचा जाब कोण करितो ? नवाब निघोन गेलियावरी म्या कोण्हास काय पुसावें ? इकडे गाजीपूरवाला पार चनाडीजवळ उतरून गेला. नवाबाच्या आज्ञेनें पुढें थोडी थोडी फौज उतरीतच आहे. आपण खासा जाणार नाहीं असे दिसतें. आणि मुलूख तरी लुटितेत. सैन्यांत चणे अठ्ठावीस शेर, गहूं पंचवीस शेर जबस सहा पासऱ्या. रुदोळीपासून शिखंडीपावेतों धान्य राजेयाचें व जमीनदारांचे बहुत आहे. पेवें काढून खुशाल खातात. आठ चार दिवस नवाबाचा मुक्काम येथेंच आहे. निजामनमुलुकाचा नातू व हरिभक्त या प्रांतास येणार ऐशी त्यासही वार्ता आहे. ऐसे वर्तमान तिसरा प्रहरपावेतों आहे. पुढें होईल तें लेहूं. विशेष. राजश्री बाबानीं दोनी पानदानें रुप्याची विकत घेतली. चांगली आहेत. बाबास आह्मीं विनंति केली आहे कीं, एक पानदान राजश्री दादा यांस पाठवणें. त्यांनी उत्तर दिल्हें कीं, पाठवा. रुपयांचे भारोभार घेतलें. चांगलें तऱ्हेदार आहे. वासुदेव भट खरा दशमीस येणार आहे. त्याजबराबरी पाठवून देऊं. कळलें पाहिजे. स्वामीनीं लिहिलें कीं, दोन परवाने, एक मीर बहीरास कोचकाचा व एक दस्तक नवाबाचे मार्गाचे मथुरापर्यंत, करून पाठवणें. त्यास, मी सैन्यांत नरशिंगरायाकडे जात होतों तों गोविंद नाईक सैन्यांत त्रयोदशीस जाऊं लागले. मी त्यांस वर्तमान सांगितलें. त्यास, त्यांनी बोलिले कीं, तुह्मी कशास येता, एक माणूस बरोबर देणें, दोनी परवाने घेऊन येतों. परवाने आलियावरी सेवेसी पाठवून देतों. विशेष. माघवद्य अमावस्या बुधवारीचें वर्तमान : राजे यांची मामलत नवाबाचें एकंदर चित्तास येत नाहीं. चनाडीजवळ सिंधोरा तेथून चार नावा येत होत्या. त्यावरी दहा मेले होते ते राजेयांचे लोकांनी गोळयांनी जिवेंच मारिलें, नावां घेतल्या. ते मुडदे नवाबाच्या देवडीवरी आणिले. तेसमयीं क्रोधें आवेश आला. परंतु उगाच राहिला. सहा सात हजार फौज निवडक चनाडीकडे पार उतरली. आणखीही वरचेवरी रात्रंदिवस उतरत आहे. राजेयासी नवाब एकंदर ठेवीत नाहीं, हा निश्चय सर्वांस कळला. पुढें काय होईल तें पहावें. गंगापुरची गढी पाडावयासी पांचसहाशें बेलदार लाविलें आहेत. पाडून खंदक बुजितात. ऐसें वर्तमान हा कालपर्यंत आहे. विशेष. दुर्गाघाटीचें काम, वरिले शिडी पहिलीच तेथपावेतों, फरश जाहाला आहे. दोन दिवस नवाबाचे सैन्याकरितां काम राहिलें. चुनाही नव्हता. आता चुना आणिला. बीजेपासून काम पुढें चालीस लावितों. आतां सत्वरीच तयारीस येईल. कळलें पाहिजे. नवाब राजेयाचे लोक जेथें जेथें लगले आहेत त्यांचा परामृष करील ऐसें दिसतें. पहिलवानशिंग, व सुंदरशा, व थोरला अला बिरदीखान यांची पत्रें राजास आली कीं, आह्मी तुझे सोबती नाहीं, आमच्या मुलकांत एकंदर तुह्मी न येणें, याल तरी लुटले जाल. राजा लतीफपुरी बाराशें स्वारानशीं आहे. याची फौज उतरत आहे. हा पुढें जाईल. जें होईल तें वरिचेवरी लेहून पाठवून देऊं. अलाकुलीखान व राजेंद्रगिरी चोचक पार गेले. नावा पाच सहा आहेत त्याजवरी जातात. कळले पाहिजें. आज माघ शुध्द १ गुरुवारीं वर्तमान : नवाबानें गोविंद नाईक यांसी राजेयाकडे पाठविलें. होईल तें लिहूं. गंगापूर पाडिलें नाहीं. भाईरामपंतांनीं सर्व कागदपत्र पाठविलें ह्मणून सांगितलें. स्वामीस पावलेच असतील. काचरिया पक्का पाठविल्या घेणें. श्रृत जालें पाहिजे. हे विनंति.