[५३५] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. नवाबाचे सान्निधवासी गृहस्थ आपले कामाचा जाबसाल करी असा आहे. त्यास पत्र पाठवावें. आपले जबानी घालावें; ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळलें. ऐशियास, तुह्मी वर्तमान कळावयास त्या गृहस्थाची भेट घेतली. उत्तम केलें. त्यास सांप्रत पत्र पाठवितां येत नाहीं. आमचे जाबसाल नवाबासी जें बोलणें तें प्रसिध्दच आहेत. कितेक त्यांचे कामाचे याणी आपले हित जाणून करणें तें करावें. आमचेंच काम आहे ऐसें नाहीं. केवळ आमचाच जाबसाल असतां आणि हरप्रकारें करून घेणें असें असतें, तरी पत्र पाठवितों. सध्या तातड न करणें. आह्मी त्या प्रांती येतों. तुमची आमची भेट होईल. सर्व अर्थ चित्तांस आणून मग पत्र देणें तरी दिल्हे जाईल. सत्वरच भेटीनंतर विस्तरें बोलूं. मग पत्र देणें तें देऊं. बहुत काय लिहिणें. हे विनंति.