[५२६] श्री.
पो छ ३० रजब.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोपाळराव गोविंद स्वामी गोसावी यांसी :-
पो बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. ऐशास, गाडदी सत्वर प्रतिपदा जालियावर तुह्मांकडेस रवाना करतों. त्यास, शहर अवरंगाबादेस तसदी न करतां, किल्ले दौलताबादेचाच बंदोबस्त उत्तम प्रकारें होय तें करणें. गाडदी, तोफा, फौज येऊन पोहोचेल. सखतीनें वेढा बसवणें. काम थोर ह्मणून प्रथमपासून नरम होऊन तुह्मी जाबसाल करीत गेले. परंतु तें लहान माणून चढी लागत चाललें. कांही सख्ती पोहोंचल्यावर डोळे उघडतील. रिकामी फौज येथें आहे ते वेढियाचें काम करील. नवी ठेवावी लागत नाहीं. श्रीकृपेनें कार्य लौकरच होईल. शहरकरांशी सलूख राखणें. अप्पाजीपंत व किल्लेदार आपले विचारांत आहेत ह्मणून लिहिता; परंतु हे जर तुमचे लोक एखादे दरवाजियानें आंत घेतील तर खरें. नाहीं तर हेच लबाडी करतात यांत संशय नाहीं. नांव गोलंदाजाचें जमातदाराचें करतात यातं संशय नाहीं. प्रत्यक्ष किल्लेदार कारभारी यांची शेपन्नास माणसें नसतील काय ? यांची शेदोनशें माणसे असलीयावर तुह्मांकडील यांनी माणसें आंत घ्यावी, लबाडी करीत असतील त्याचें पारिपत्य करावें. तर हे आमचे विचारांत खरे. नाहीं तर लटके. गोड बोलून आपला मतलब ठीक राखावा यासाठीं तुह्माशीं गोड बोलतात. माझें मतें तों किल्ला सनदेनें देतात. यांस इतकें देणेंच योग्य नाहीं. तुह्मी वारंवार लिहिलें, यास्तव निकृष्ट पक्ष कबूल केलें होतें. वेढा बसवावयास नवी शिबंदी बसवावयास लागत नाही. उगेच पाऊण लाख रुपये व पन्नासांची जागीर जवळची कां गमवता ? आतां तेंच प्रत्ययास आलें. आतां तरी रगडून करणें. रा छ २९ रजब. हे विनंति.