[५२४] श्री. १२ आगस्ट १७६१.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
चरणरज बापूजी महादेव सा नमस्कार विनंति येथील क्षेम श्रावण रदि १२ बुधवार जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. यानंतर, पूर्वेचा सुभा सिराजतदौला इंग्रेज मकसुदाबादेस येऊन साता कोसांत युध्द झालें. सिराजतदौला युध्दीं पडला. मग त्यांचा यांचा सलूख झाला. कांही लुटलें नाही. बंदोबस्त तैसाच आहे. जाफर अल्लीखान महाबतजंग नवाब याचा मेहुणा यासी सुभा झाला. तो साठी वर्षाचा शहाणा बक्षी होता. अवघे मिळोन ठिकाणी लाविला. वृध्द होता. कळलें पाहिजे. ग्रामण्य आहे तैसेंच आहे. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विज्ञापना.