[५२३] श्री. २८ जून १७६१.
पो आषाढ वद्य ११ मंगळवार
शके १६८३.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांप्रती वाराणशीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता आषाढ वद्य ११ रविवार जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान तरी आह्मीं धामधुमेमुळें क्षेत्राबाहेर गेलों होतों ते चैत्र शुध्द १२ स महाक्षेत्रीं आलों, हें वर्तमान पूर्वी लिहिले आहे. दिल्लीहून गिलचा पठाण आपले देशास गेला. रोहिला नजीबखान फौजेनसीं दिल्लीत आहे. रा मल्हारजी होळकर माळव्यांत इंदुरी आहेत. रा गंगाधरपंत तात्या कांहीशी फौज घेऊन जाटापाशी आहे. खासा जाटाची फौज, व तात्या व गाजदीखान ऐसे त्रिवर्गांनी मिळून आग्रयाचा किल्ला सोडविला ह्मणून वार्ता आहे. किल्ल्यांत अंमल जाटाचा. आज जाट जबरदस्त आहे. उभयता त्याच्या अनुमतें आहेत. अयुध्येवाला नवाब सुजावतदौला लखनऊहून स्वार होऊन श्रीकाशीस आला. तेथून आठ दहा कोश पूर्वेच्या रोखें गेला होता. पटण्यास पातशाहा होता त्यास आणविला. आपणापाशीं आलियानंतर परस्परें भेट जाहल्या. नवाबास वजिरी दिली. तेथून काशीस आषाढ वद्य अष्टमीस आले. आजी तीन दिवस येथें आहेत. पुढें येथून कुच करून जाणार आहेत. कळले पाहिजे. यंदा येथील अधिकारी फौज घेऊन आलियामुळें जिन्नस महाग जहाला. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.