लेखांक २५३ श्री
राजश्री रंभाजी निंबाळकर गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नेहांकित जयसिंग जाधवराऊ सेनापति रामराम एथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेले पाहिजे विशेष राजश्री जनार्दन गोसावी वास्तव्य मौजे मोरगांव ता। कर्हेपटार हे श्रीच्या पायापासी पुरातन आहेत याचा योगक्षेम अन्न आछादन अतीत अभ्यागत हव्यकव्य चालिले पाहिजे याजकरिता माहाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामी होते त्याणी जमीन चावर नीम यास इनाम करून दिल्ही तेणेप्रमाणे मोगलाई तर्फेचे जाहागीरदार राजश्री वणगोजी नाईक व राजरी मुधोजी नाईक व बजाजी नाईक व मिर्जा राजाची व पातशाह खालिसाची आहेत साप्रत मौजेमजकूर तुह्माकडे जाहगीर जाले त्यास तुमचे कमाविसदार अनमान करिताति याजकरिता जनार्दन गोसावी तुमचे भेटीस आले आहेत तुह्मी हि धर्मपरायण आहा पूर्वीपासून तुमचे निंबाळकरानी हि चांलविले आहे तेणेप्रमाणे तुह्मी हि आपले पत्र गांवकरास व आपले कमावीसदारास करून देऊन याचे इनामाचा प्रसग सुरक्षित चालोन हे स्नानसंध्या श्रीचे पायापासी एकनिष्ट करून तुमचे कल्याण चिंतून राहेत ते गोष्टी केली पाहिजे बहुत काय लिहिणे छ १९ जमादिलावल हे विनंति