लेखांक १८४ श्री १६५१ भाद्रपद शुध्द ७
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ५६ सौम्यनाम संवत्सरे भाद्रपदशुध सप्तमी मंदवासरे खत्रियकुलावतंस श्री राजा शंभु छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व कारकून वर्तमान व भावी सुभा प्रा। सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे राजश्री कालोजी बिन जोगोजी जाधव पाटील कसबा उंब्रज हे स्वामीच्या राज्यातील पुरातन एकनिष्ट सेवक याचे आजे कालोजी जाधव खटावाचे मुक्कामी ताम्राचे जुझी तीर्थस्वरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामीचे वेलेस स्वामिकार्यावरी पडिले व याचे बाप थोरले राजश्री संभाजीराजे याचे कारकीर्दीस ताम्राचे युध्दप्रसंगी तेही स्वामिकार्यावरी खर्च जाले व याचे भाऊ खेत्रोजी जाधव राजश्री उदाजी चव्हाण हिंमतबाहादर याजबराबर स्वामिकार्यावरी पडिले मशारनिले स्वामीच्या पायासी निष्ठा धरून एकरूप निष्ठेने शेवा करित आहेत स्वामीच्या पायाविना दुसरे जाणत नाही साप्रत याणी स्वमिसनिध विनती केली की कसबे मजकूर माहाराजानी मेहेरबान होऊन इनाम करून दिल्हा पाहिजे ह्मणून विदित केले त्यावरून मशारनिले स्वामीचे पुरातन याचे बाप आजे स्वामिकार्यावरी खर्च जाले आहेत याचे सर्व प्रकारे चालवणे स्वामीस परम अवश्यक यास्तव स्वामी याजवरी कृपालू होऊन यास कसबे उंबरज सुभे मजकूर देह १ एक रास नूनत इनाम कुलबाब कुलकानू हाली-पटी व पेस्तर-पटी जलतरुपाषाणनिधिनिक्षेपसहित खेरीज हक्कदार व इनामदार करून इनाम अजरामर्हामत करून दिल्हा असे तरी तुह्मी कसबे मजकूर पूर्व मर्यादेप्रमाणे याचे स्वाधीन करणे आणि इनाम यासि व याचे पुत्रपौत्रादिवशपरपरेने सुरक्षित चालवणे साल दर साल ताजा सनदेचा न करणे या सनदेची तालीक लेहून घेऊन हे पत्र भोगवटियास परतोन देणे निदेश समक्ष
रुजू
सुरु सूद बार