लेखांक १८१ १६४१
तकरीरकर्दे कालोजी बिन जोगोजी पटेल काउजी बिन भागोजी पटेल का। उबरज पा। कर्हाड सु॥ अशरीन मया अलफ छ माहे शौवाल केली तकरीर ऐसी जे साहेबी पूसिले की तुमचा मूळपुरुष व सटवोजी बिन समनाजी व तिमाजी बिन नरसोजी याचा व तुमचा मूळपुरुष कैसा आहे हरदोजणापासी जमान घेऊन विचारिले तरी आपला हरदोजणाचा मूळपुरुष दयापाटिल त्यास लेक दोघे आपला वडील जाखोजी पाटिल व सटवोजीचा वडील पाकोजी पाटिल आमचा वडील जाखो पाटिल यानि पाटिलकी केली पाको पाटील धाकटा आपली तकसीम खाऊन होता आमचा वडिल जाखो पाटिल त्याचा लेक मादो पाटिल हा पटेलकी करीत होता दामो पाटलाची बायको कमाई पाटलीण पाटिलकी करीत होती तिचे लेक तिघे जण जाले त्यास वडील लेक पाटीलकी करीत होता वडील लेक मादो पाटील दुसरा लेक माबो पाटील तिसरा लेक बहिरोजी यास हाती करून कामाई पाटलीण पटेलिकी करीत होती त्यास मादो पाटील यास लेक कालोजी पाटील जाहला माबोपाटीलास लेक धुलोजी पाटील जाहला हे पटेलकी करीत होते कालोपाटील याचा लेक अपाजी पाटील वडील धाकटा लेक नरसोजी पाटील व लेकी चादाव जाली व अपाजी पाटीलाचा लेक तीन वरसाचा आवाजी पाटील व अबाजी पाटलाचा चुलता नरसोजी पाटीलाची व आपाजी पाटीलाची बहीण चादावा नागोजीराऊ पाटणकर यास दिल्ही होती त्यास अबाजी पाटिल व नरसोजी पाटिल हे धाकटी मुले होती त्यास कालोजी पाटिलास व आपाजी पाटिलास जीवकणेचे जननी चेवगत जाहाली त्याने मृत्य पावले त्यावरी मादो पाटिलाचा लेक धुलोजी पाटिल पाटिलकी करावयासी लागला तो एकनिस्टी पाहून सटवोजीच्या वडिलानी मारिला तीन वरसाचा अबाजी पाटील होता अबाजी पाटीलाचा चुलता नरसोजी पाटील याचा वारसाचा होता व धुलोजी पाटीलाचे लेक पाचजण होते व अबाजी पाटीलाची आई रखमावा व धुलोजी पाटीलाची बायको पिलावा हे पटेलकी करीत होती
असता त्या बाईका दुदील जाल्या मग त्या बाईकानी आपले मिरास भाऊ गावकर व कुलकर्णी व चौगला व सेट्या व कोष्टयाचा मेहत्र्या व माली याचा मेहत्र्या ऐसे बोलाऊन व बैते व जे मिरासदार होते तितके बोलऊन अणून त्यास विचारिले की आपला दादले मारिले मारा करून पळोन इदोलीस गेले आपणास तुह्मी भाऊ आहा काय सागता त्यावरी ते बोलिले जे सटवोजीचे वडील नाइकजी अबाजी आपली तकसीम खात असता हाक नाहक मारा करून गेले त्यास सुखरूप जाऊत तुमची मुले नेणती आहेत धीर टाकू नका तुह्मी आपला कारभार करा ऐसा धीर भरवसा देऊन सर्वस्वे अगीकार करून बाईकाच्या हाते कारभार घेऊ लागले त्यावरी सटवोजीच्या वडिलानी इदोलीहून एऊन कुलकरणी मा।रिला व चौगुला मा।रिला व सेट्या मा।रिला कोस्टेचा मेहेत्र्या व माळियाचा मेहेत्र्या हे हि मारिले ऐस पाच खून केले जे बाईकास धीर देऊन कारभार करित होते त्यानिमित्य मारिलेवरि बाईका घाबिर्या जाल्या मग रखमावा व पिलावा मुले हाती धरून मुलास मारावया जपो लागले मग कालो पाटीलाची लेक चादावा पाटणकर नागोजीराऊ यास दिली होती त्या आश्रयाने रखमावा व पिलावा मुले घेऊन पळोन गेली सटवोजीचे वडिल मारा करून पळोन इदोलीस गेले त्यास दुसरा मोकासी आला त्यास भेटोन कौल घेऊन गावात आले जोरावारीने पटेलकी करू लागले त्यास मुले व बाईका पाटणी होती त्यास नागोजीराऊ पाटणकर यास देवाज्ञा जाली त्याचा लेक हिरोजीराऊ बारा वरसाचा होता त्याचे बापभाऊ त्यास मारावया जपो लागले त्याची आई चादावाने आपल्या लेकास पळऊन भाडळेयास पाळविले