लेखांक ४८ श्री १६८३
नकल
पुणा शास्त्रीपासी एणप्रो। लिहिले
राजीनामा बो। गोरखोजी बिन सुभानजी बिन उरसील मौजे सिंगापूर प्रा। सुपे सुरसन ११७१ कारणे साहेबाचे सेवेसी राजीनामा लेहून दिल्हा ऐसा जे आपणामधे व संताजी बिन गोमाजी पाटील उरसील मौजे मजकूर याजमध्ये मोकदमीचा कजिया आहे ह्मणोन साहेबापासी आलो त्यास साहेबी आज्ञा केलीकी जमान व तकरीरा व पुरसीर तकरीरा देणे त्याजवरून दिल्या यासि वडील आपले गोरखोजी उरसील बेदरी पातशाहापासी चाकरी करीत होते त्याजमागे त्याचे पुत्र राहूजी व संभाजी साळोखी उरसील हे हि करीत होते त्यास राहूजी व संभाजी साळोखे उरसील यानी चाकरी चांगली ह्मणोन गाव मोकासा दिल्हा तो पेरणे दिल्हे तेथे पाटिलकी वाळकियाची होती त्याजपासून पाटिलकी निमे खरीद करून घेतली आणि आपण चाकरीस गेले त्याजवर चाकरी चांगली केली मग पातशाहा मेहरबान होऊन दुसरा गाव मोकासा दिल्हा तो मौजे सिंगापूर प्रा। सुपे हा गाव दिल्हा तेहा पाटिलकी रखटियाची होती त्यास कर्ज होन पाचशे दिल्हे आणि खत करून घेतले मग बाकी मोकासियाची होन च्यारसे राहिली याचा वायदेरोखा घेतला एकूण होन नऊसे जाहाले तेव्हा आपण रखटे पाटील यासी तगादा केला की पैका देणे यासि रखटे पाटील बोलिले की पैका द्यावयास अनुकूल नाही व जिनजितरब हि नाही परतु आपण आपल्या स्वसंतोषे पाटिलकी देतो त्याजवरून पाटिलकी दिल्ही (राहूजी व संभाजी बेरदी चाकरीस गेले कालान्तरे गावी आले) आपले मूळचे अडनाव साळोखी अलीकडे उरसील पडले उरसील पडावयास कारण आपला वडील संभजी मर्द माणूस होते त्याच्या उरास सल निघाले ह्मणोन उरसील पडले उरास तीर लागला होता तो उपटोन काढिला तो तीराचे फळ आत राहिले दोन वरसे होते तो एक दिवसी न्हावी आगास तेल लावावयास गेला तो त्याने देखिले मग पुरसो लागला की काहाडतो काढिले तेव्हापासून उरसील आडनाव पडले. आपली वंशावळ