लेखांक २२ १६०९ श्रावण शुध्द १
श्रीसके १६०९ प्रभव नाम संवछरे सुध पाडवा तदिनी गोपजी बिन रागोजी यादव मौजे माळशिरस पा। सुपे यास मालजी बिन रामजी यादव मोकदम मौजेमजकूर आत्मसंतोसे लेहोनु दिधले वृत्तिपत्र ऐसे जे काळ थोर पडिला याकरिता गाव खराब जाला लोके कितेक सुजोन मेली कितेकाची घरे बुडाली कितेक उठोन देसावेरी गेली आपला लेक रामाजी तो देसावेरी सुजोन गेला एक लेक सुभानजी आपणापासी होता तो हि पोटासाठी सुजोन मेला आपली बाईल हि मरोन गेली आपण व आपली सून दोघे उरलो अन्न मिळेना हातपाय सुजले कोण्ही हाती धरी ना मग आपणापासी मोकदमीची सनदा व वतनाचे कागद होते ते दरम्यान बुडतील ह्मणऊन हरकोण्हास मोकदमी नावनागर वतनाचे कागद व सेत घर देऊन आपला जीव वाचऊ ह्मणऊन जात होतो मग मागती आपण आपले मनेसी विचारून पाहिजे तो तुह्मी आपला बाप भाऊ तैसा च आहेस ह्मणऊन मग देसमुख व देसपाडे व गावीचे जे कोण्ही वाचली आहेत त्याचे गोहीनसी व हामशाही गावीचे मोकदमाचे गोहीनसी मोकदमी व आपले वडीलपण नाव नागर व घर सेत कुल आपले वडिलाची जे मिरासी हकलाजिमा आहे तो तुह्मास दिधला असे आपण वाचलो तरी जोवेरी वाचोन तो अन्नवस्त्र देणे व मेलियावेरी मुठीमाती देणे आणि वतन आपली जे मिरासी आहे ते तुह्मी खाणे आपणास वतनास संबंधु नाही आपले घरातील आपले भाऊबंद व आपला लेक वाचोन आला तरी त्यासी मोकदमीस समंधु नाही तुह्मी सुखे लेकराचे लेकरी काळीवेरी पाढरी तोवेरी वतन खाणे आणिकास वतनास समंधु नाही बिलाहरकती करील तो दिवाणीचा गुन्हेगार व गोताचा अन्याई
गोही
सामराज देसमुख देसपांडे पा। मा।
प॥ म॥
नाईकवाडी सीऊजी खोमणा मोकदम
तान्हाजी इतबारखान मौजे जळगाऊ