प्रस्तावना
परंतु फत्तेसिंगाच्या कामांत पडावयाचें नाहीं हा बाजीरावाचा कृतसंकल्प होता. १७४० पुढें कर्नाटकची व्यवस्था शाहूनें रघोजी भोंसल्याकडे सांगितली. रघोजीचें व बाळाजी बाजीरावाचें फारसें नीट नव्हतें. १७४४ त रघोजीची बाळाजीनें व्यवस्था लाविली. नंतर इतरत्र स्थिरस्थावर झाल्यावर बाळाजी बाजीरावानें आपल्या प्रख्यात अशा कर्नाटकच्या स्वा-या सुरू केल्या. सदाशिव चिमणाजीने बहादूरभेंड्यावर स्वारी १७४६ च्या हिवाळ्यांत केली. तीच कर्नाटकांवरील १७६० पर्यंतच्या स्वा-यांचा श्रीगणेशाय नम: होय. बाजीरावाच्या कारकीर्दीत कर्नाटकावर एकापेक्षां जास्त स्वा-या कां झाल्या नाहींत, व बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत कर्नाटकावर एकसारख्या स्वा-यावर स्वा-या कां झाल्या, ह्याची कारणपरंपरा ही अशी आहे. मराठ्यांच्या मोहिमांना कारणांची बिलकुल जरूर लागत नसे, प्रांतांची लुटालूट करणें हें एकच कारण त्यांच्या प्रयत्नांना बस्स असे, अशी जेथें भावना , तेथें ऐतिहासिक कार्यकारणांची मूळपीठिका शोधीत बसण्याची उठाठेव करण्याचें प्रयोजनच रहात नाहीं; परंतु ही उठाठेव केल्याशिवाय मराठ्यांच्या इतिहासाची फोड यथास्थित होणें अशक्य आहे. १७२६ च्या श्रीरंगपट्टणच्या स्वारीनंतर बाजीरावानें किंवा चिमाजीअप्पानें कर्नाटकांत स्वा-या केल्या असत्या तर, (१) निजामुन्मुलुखाची सत्ता त्या प्रांतांत स्थिर झाली नसती, (२) निजामुन्मुलुखाचे हस्तक, जे अर्काटचे नवाब ते पार नाहीसे झाले असते, (३) तंजावरच्या मराठ्यांना जोर आला असतां, (४) मद्रासेंतील इंग्रजांना व पांडिचेरींतील फ्रेंचांना अर्काटच्या नवाबांच्या द्वारा कर्नाटकांत ढवळाढवळ बहुश: करतां आली नसती, व (५) श्रीरंगपट्टणचें राज्य नष्ट होऊन हैदरासारखा नवीन शत्रु उद्भवला नसता. अकिलिसाच्या रागानें ग्रीस देशावर जशी संकटपरंपरा ओढवली, त्याप्रमाणें बाजीरावाच्या फत्तेसिंगावरील व प्रतिनिधीवरील रागानें कर्नाटकांत ही नवीन कार्यपरंपरा उद्भवून महाराष्ट्रावर पुढें संकटपरंपरा कोसळली. बाजीरावाच्या व फत्तेसिंगाच्या दुहीचा हा असा परिणाम झाला.