प्रस्तावना
त्रिचनापल्लीस मुरारराव घोरपडे व तंजावरास तुळजाजी राजे असल्यामुळें त्यांना मदत करणें जरूर होते. १७२४ त निजामाशीं बाजीरावाचें किंचित् सख्य होणार तों १७२५ त त्याशीं मराठ्यांचें पुन: वांकडे आलें व चोहोंकडून युद्धाला सुरुवात झाली. कान्होजी भोंसले उत्तरेकडून, कंठाजी कदम बांडे व गायकवाड पश्चिमेकडून, चिमाजीअप्पा भागानगराकडून असा चोहोंबाजूंनीं निजामावर मराठ्यांनीं अगदीं दंगा. उसळून दिला. निजामाच्या सुभेदारींत कर्नाटकाचाहि प्रांत अवरंगझेबाच्या स्वारीपासून होताच. तेव्हां त्या प्रांतांत जाऊन निजामाला शह देण्याचा मराठ्यांनी बेत केला व त्या बेताचा परिणाम ही स्वारी झाली. शिवाय सोंधें, बिदनूर, सुरापूर, गदग, लखमेश्वर, श्रीरंगपट्टण वगैरे संस्थानिकांकडून मराठ्यांच्या खंडण्या आज कित्येक वर्षेपर्यंत राहिल्या होत्या, त्या उगविण्याचाहि ह्या मोहिमेंतील एक हेतु होता. फत्तेसिंगाला १७१३ त जहागीर दिली त्यावेळी कर्नाटकाचा अधिकारहि त्याला सोंपिला होता. ह्या कारणाकरितां मोहिमेचें आधिपत्य वरकरणी तरी त्याच्याकडे आलें होतें. नाहींतर तें नि: संशय बाजीरावाकडे आलें असतें ह्या स्वारीची कांहीं हकीकत शकावलीच्या ५३ व्या पृष्ठावर दिली आहे. त्यावरून बाकीच्या दोषांचें निरसन करण्याचें थोडेंबहुत साधन मिळण्यासारखें आहे. ह्या स्वारीचा परिणाम काय झाला, स्वारीच्या शेवटीं संस्थानिकांशीं तह काय काय झाले, वगैरे हकीकत डफनें न दिल्यामुळें, १७२६ पासून १७४० पर्यंत पुढें कर्नाकटाकडे मराठ्यांनीं ढुंकूनसुद्धां कां पाहिलें नाहीं तें समजेनासें होतें. १७२६ पासून १७४० पर्यंत मराठ्यांनीं कर्नाटकाकडे ढुंकूनसुद्धां कां पाहिलें नाहीं त्याचें खरें कारण येणेंप्रमाणें आहे. फत्तेसिंग भोसले, श्रीनिवासराव प्रतिनिधि, बाबूजी नाईक बारामतीकर व रघोजी भोंसले ही सर्व मंडळी बाजीरावाच्या विरुद्ध होती. १७२५ च्या सुमाराला हा विरोध इतका कांही विकोपाला गेला की, शाहूमहाराजांना मध्यें पडून प्रतिनिधीचें व पेशव्याचें एकसूत्र जुळवून देणें भाग पडलें. पुढें १७२५ च्या आगोठीनंतर श्रीरंगपट्टणावर जेव्हां मोहिम करावयाचें ठरलें, तेव्हां केवळ महाराजांच्या आग्रहास्तव बाजीरावाला फत्तेसिंगाच्या आधिपत्याखालीं ह्या मोहिमेस जावें लागलें, मोहिमेचें कार्य जसें निवटावें तसेंच बहुतेक निवटलें; परंतु मराठ्यांच्या सैन्याचे ह्या स्वारींत अतोनात हाल झाले. त्याचें सर्व अपेश, अर्थात्, फत्तेसिंग भोंसले, श्रीनिवासराव प्रतिनिधि व रघोजी भोंसले ह्यांच्या माथ्यावर फुटलें. शाहूला ह्या लोकांच्या कर्तृत्वाचा व ऐपतीचा अंदाज कळला, व बाजीरावावर त्याचा विश्वास व लोभ जास्तच बसला. यद्यपि असा प्रकार झाला, तत्रापि शाहूनें ह्या अपेशी लोकांना अजिबात सोडून दिलें असा प्रकार झाला नाहीं. फत्तेसिंग तर शाहूचा मानीव पुत्र होता व त्याच्यावर त्याचा अत्यंत लोभ असे. प्रतिनिधि व रघोजी भोसले फत्तेसिंगाच्या विश्वासांतले पडले, त्यामुळें त्यांचीहि बाजू बरीच सांवरली गेली. ह्या सर्व गोष्टी बाजीराव पूर्णपणें जाणून होता. फत्तेसिंगाला दुखवावयाचे नाहीं व त्यांच्या कामांत पडावयाचें नाही असा बाजीरावानें पुढें बेत केला. बाजीरावानें १७२६ च्या नंतर कर्नाटकाचें नांव काढलें नाहीं त्याचें कारण हें असें आहे. कर्नाटकाच्या स्वारीचीं सुखें फत्तेसिंगाला पक्की कळून चुकलीं होतीं. म्हणून तोहि तिकडील स्वारीच्या छंदांत पुन: १७४० पर्यंत पडला नाहीं. ह्या दोन कारणांनीं १७२६ च्या पुढें कर्नाटकावर मराठ्यांची स्वारी झाली नाहीं. स्वारी न होण्याचें तिसरेंहि एक कारण आहे. कर्नाटकची मुख्य किल्ली निजामाच्या हातांत होतीं. त्यालाच वठणीस आणिलें म्हणजे कर्नाटक जिंकल्यासारखेंच झालें, ह्या समजुतीवर भिस्त ठेवून बाजीरावानें १७२६ च्या पुढें निजामावर ज्या स्वा-या केल्या त्या सर्व खानदेशांत व माळव्यांत केल्या. बाजीरावाची ही क्लूप्ति कांही वावगी नव्हती; परंतु तिच्यापासून एक तोटा झाला. एकसारखें चवदा वर्षेपर्यंत कर्नाटकाकडे कोणी ढुंकूनहि न पाहिल्यामुळें, निजामुन्मुलुखाला त्या प्रांतांत आपली सत्ता जास्त स्थिर करतां आली, व मराठ्यांना त्या प्रांतांत कोणी ओळखीनासें झालें. १७३९ त मराठ्यांच्या नर्मदेपलीकडील उपद्व्यापाला कंटाळून, निजामुन्मुलुखानें त्यांची खोड मोडण्याकरितां जेव्हां नादिरशहाला दिलीस आणिलें, तेव्हां बाजीरावानें निजामावर एकंदर तीन स्वा-या काढिल्या. एक स्वारी निजामाच्या प्रांतांवर खानदेशांतून चिमाजीअप्पाच्या हातून करविली. दुसरी स्वत: हिंदुस्थानांत करण्याचा बेत केला, व तिसरी फत्तेसिंग व रघोजी भोसले यांच्याकडून निजामाच्या कर्नाटक प्रांतांत करविली. १७४० तील कर्नाटकांतील स्वारीचें हें मुख्य कारण आहे. ही स्वारी चिमाजीअप्पाच्या हातूनहि झाली असती.