प्रस्तावना
२१. १७२० पासून १७४० पर्यंत ग्रांटडफनें काय काय ढोबळ चुका करून ठेविल्या आहेत व कोणकोणत्या प्रसंगाचा वृत्तांत अजीबात गाळला आहे त्याचा तपशील हा असा आहे. धावडशीकर स्वामींचीं पत्रें, पेशव्यांच्या रोजनिशा, पेशव्यांचीं चिटणिशी पत्रें, सुमारें २५ बखरी व कित्येक तवारिखा इतकी सामुग्री जवळ असून डफनें ह्या अशा चुका कशा केल्या ह्याचें आश्चर्य वाटतें. मिळालेल्या पत्रांच्या मित्यांकडे नीट व बारीक लक्ष न दिल्यामुळें, रोजनिशांचा जितका चोख अभ्यास करावा तितका न केल्यामुळें व बखरी व तवारिखा ह्यांवर फाजील विश्वास ठेविल्यामुळें, डफच्या हातून हा गोंधळ झाला आहे. मराठ्यांच्या इतिहासांत शिवाजीच्या पराक्रमाच्या खालोखाल, कदाचित् कित्येक बाबतींत शिवाजीच्या पराक्रमाच्या तोडीचीं,अद्भुत कृत्यें बाजीराव बल्लाळाच्या हातून घडलेलीं आहेत. ह्या महापुरुषाच्या अचाट व अद्भुत कृत्यांचे रसभरित वर्णन देण्यास प्रासादिकच इतिहासकार पाहिजे, व साद्यंत वर्णन देतां येण्यास मुबलक जागा पाहिजे; परंतु बिनचुक वर्णन देण्यास ह्या दोन्ही गोष्टींची अपेक्षा नाहीं. पहिले दोन गुण तर डफच्या ग्रंथांत नाहींत ही सर्वमान्य गोष्ट आहे; परंतु तिसराहि गुण ह्या ग्रंथांत नाहीं हें वर दाखविलेल्या चुकांवरून निश्चयानें म्हणण्यास बिलकुल शंका वाटत नाहीं. १७५० पासून १७६१ पर्यंतच्या इतिहासासंबंधानें ग्रांटडफ विशेष विश्वास ठेवण्यालायक लेखक नाहीं हे मीं पहिल्या खंडांत सिद्ध करून दाखविलें आहे. १७२० पासून १७४० पर्यंतच्या इतिहासासंबंधानें तर डफवर फारच थोडा विश्वास ठेविला पाहिजे असें आतां ह्या खंडांत म्हणण्याची पाळी आली आहे. १७०७ पासून १७२० पर्यंतच्या महाराष्ट्रांतील यादवीचाही डफला यथातथ्य अंदाज झाला नाहीं. शाहूचे व ताराबाईचे डावपेंच, निरनिराळ्या सरदारांचे लपंडाव, कित्येकांचा अप्पलपोटेपणा, कित्येकांची एकनिष्ठा, मोंगलांचे दुटप्पी बेत, त्यांवर बाळाजी विश्वनाथाचे व धनाजी जाधवाचे शहप्रतिशह ह्या सर्वांचें वर्णन देतांना अलंकारद्वेष्ट्या अशा एखाद्या साध्या लेखकांचाहि लेख प्रसंगानें चमत्कृतिजनक व्हावा; परंतु अंगीकृत विषयाचें रहस्य यथास्थित न कळल्यामुळें, डफचें लिहिणें येथून तेथून सारखेंच नीरस असें वठलें आहे. कालाचा चोख निर्णय न केल्यामुळें, कार्यकारणसंबंध व प्रसंगाचें पौर्वापर्य ह्मा लेखकाच्या जसें ध्यानांत यावें तसें आलें नाहीं. त्याचें सर्व लिहिणें तुटक, व हीनसत्च असें भासूं लागलें आहे. जोंपर्यंत मूळ अस्सल लेखांचा अभ्यास आपल्या इकडे सुरू झाला नव्हता, तोंपर्यंत ग्रांटडफची खरी किंमत करतां येणें शक्यच नव्हतें. परंतु नीळकंठराव कीर्तन्यांच्या टीकेपासून व काव्येतिहास संग्रहकारांच्या यत्नापासून त्या ग्रंथाची खरी किंमत व खरी परीक्षा हळू हळू होत चालली आहे. मराठ्यांच्या इतिहासाची रचना नवीन पद्धतीनें करणे जरूर आहे असा परिणाम ह्या परीक्षेपासून झाला आहे.