प्रस्तावना
१९. बाजीरावाच्या स्वा-यांचा वीस वर्षांचा नामनिर्देश वरील पारिग्राफांत केला आहे. ह्या स्वा-या १ निजामुन्मुलुखानें बळकाविलेला प्रांत, २ नर्मदेच्या पलीकडील प्रांत, ३ गुजराथ, ४ साष्टी, ५ जंजिरा, ६ कोल्हापूरकरांचा प्रांत व ७ कर्नाटक इतक्या प्रदेशांवर केलेल्या आहेत. ह्यात १ शाहू, २ फत्तेसिंग, ३ बाजीराव, ४ चिमाजीअप्पा, ५ खंडेराव दाभाडे, ६ त्रिंबकराव दाभाडे, ७ पिलाजी गायकवाड, ८ दमाजी गायकवाड, ९ कंठाजी कदम बांडे, १० मल्हारराव होळकर, ११ राणोजी शिंदे, १२ उदाजी पवार, १३ कान्होजी भोसले, १४ रघूजी भोसले, १५ दावळजी सोमवंशी, १६ अंबाजी त्रिंबक पुरंधरे, १७ बाजी भिमराव रेटरेकर, १८ पिलाजी जाधवराव, १९ आनंदराव सोमवंशी, २० श्रीनिवासराव प्रतिनिधि, २१ कान्होजी आंग्रे, २२ मानाजी आंग्रे, २३ संभाजी आंग्रे, २४ तुळाजी आंग्रे, २५ यशवंतराव दाभाडे, २६ मुरारराव घोरपडे, २७ उदाजी चव्हाण, २८ राणोजी भोसले, २९ फोंड सावंत भोसले, ३० सवाई कटसिंग, ३१ कृष्णाजी पवार, ३२ खंडोजी माणकर, ३३ रामचंन्द्र हरि पटवर्धन, ३४ गोविंद हरि पटवर्धन, ३५ आवजी कवडे, ३६ शंभूसिग जाधवराव, ३७ सयाजी गुजर, ३८ यशवंतराव पवार, व ३९ व्यंकटराव घोरपडे. ह्या इतक्या सरदारांनी १७२० पासून १७४० पर्यंत स्वतंत्र अशा स्वा-या केलेल्या आहेत. त्या प्रत्येकाच्या ह्या वीस वर्षातील हालचालींचा सलवारीनें निर्देश करतां येण्यास जितकी माहिती पाहिजे तितकी अद्याप मिळाली नाहीं. बाजीराव, चिमाजीअप्पा, फत्तेसिंग, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, खंडेराव दाभाडे, कान्होंजी आंग्रे, पिलाजी जाधवराव, वगैरे अत्यंत प्रमुख अशा सरदारांच्या देखील हालचालींचा नकाशा सालवारीनें देतां येणें शक्य नाही. त्यांतल्यात्यांत बाजीराव, चिमाजीअप्पा, फत्तेसिंग भोसले, त्यांच्यासंबंधीं ह्या शकावलींत व इतरत्र इतरापेक्षां बरीच माहिती सांपडते. त्यावरून वरील पारिग्राफांत ह्या तीन सरदारांच्या मोहिमांचा निर्देश केला आहे. निर्देशावरून ग्रांटडफ कोठें कोठें चुकला आहे तें कळून येईल. विशेष ठोकळ अशा चुका १७२० पासून १७४० पर्यंतचा इतिहास लिहितांना डफनें कोठें कोठें केल्या आहेत तें पुढे सांगतो.