प्रस्तावना
शाहू राज्यावर येण्याचे वेळीं निरनिराळ्या सरदारांना ज्या जहागिरीच्या लालुची दाखविल्या होत्या, त्या सतत चालविण्याचा शाहूचा बेत नव्हता असें म्हणण्यास पुरावा आहे. परसोजी भोसले, खंडेराव दाभाडे, कान्होजी आंग्रे यांच्या सरंजामी जहागिरींची पुढील ४० वर्षांत काय काय व्यवस्था झाली ही गोष्ट लक्षांत घेतली असतां वरील विधानाची सत्यता दिसून येईल. १७०७ त सरंजामी जहागिरींची मुसलमानी पद्धत शाहूस जी स्वीकारावी लागली, ती १७३१ पुढें हळूहळू सोडून देण्याचा, त्यानें व त्याचे प्रमुख मुत्सद्दी जे बाजीराव बल्लाळ व बाळाजी बाजीराव पेशवे यांनीं प्रयत्न केला. दिलेल्या जहागिरी परत घेण्याची मुख्य सतेची इच्छा व मिळालेल्या अवाढव्य जहागिरी जाऊं न देण्याची सरदाराची मनीषा ह्या दोन प्रेरणांच्या हिसकाहिसकींत मराठ्यांच्या उत्कर्षांची बीजें सांपडण्यासारखीं आहेत. ज्या सरदाराची जहागिरी परत घेण्याचा प्रयत्न करावा तो सरदार मुख्य सत्तेच्या विरुद्ध नानाप्रकारें उठे; शत्रूंच्या व इतर सरदारांच्या साहाय्यानें आपलें अस्तित्व कायम करी, व तें करण्यास फसल्यास क्वचित् नष्ट किंवा सामर्थ्यहीन होऊन जाई. नष्ट झाला, सामर्थ्यहीन झाला किंवा कायम राहिला तत्रापि त्याची स्थिति त्याला व इतर सरदारांना धड्यासारखी होई व मुख्य सत्ता दुर्बळ करण्याचा निदान विशेष प्रबळ न होऊं देण्याचा, प्रयत्न ते हमेषा करीत.
१८. १७२० च्या १७ एप्रिलास बाजीरावास प्रधानपद प्राप्त झालें. ह्या वेळीं तो खानदेशांत किंवा व-हाडांत अलमअल्लीच्या साहाय्यास गेंला होता, अथवा खरें म्हटलें असतां, बाळाजी विश्वनाथानें त्यास पाठविलें होतें. बाळाजी विश्वनाथाच्या व शाहूच्या बहुतेक स्वा-यांत बाजीराव हजर असे. बाळाजी विश्वनाथ दमाजी थोरातावर चाल करून गेला तेव्हां बाजीराव त्याच्याबरोबर होता. दमाजी थोरातानें दगा कसा केला, ह्याची आठवण शाहूनें बाजीरावाला एका पत्रांत केली आहे (शकावली पृष्ठ ६६). बाळाजी विश्वनाथाबरोबर बाजीराव दिल्लीस गेला होता. तेथून परत आल्यावर बाळाजीपंत नानांनीं त्याला खानदेशांत सय्यदांचा हस्तक जो अलमअल्लीखान त्याचें साहाय्य करण्यास ठेवून दिलें १७२० च्या जुलैंत अलमअल्लीचा निजामुन्मुलुखानें बाळापूर येथें पराभव केला. ह्या लढाईत बाजीराव होता किंवा नव्हता ह्याचा दाखला अद्याप मिळालेला नाहीं. १७२० पावसाळा छावणींत काढून त्या सालाच्या आक्टोबरांत निजामुन्मुलुखाच्या कोण्या एका हस्तकाचा बाजीरावानें बारामतीजवळ पराभव केला. हा पराक्रम करून १७२० च्या नोव्हेंबरांत बाजीरावानें साता-यास पेशवाईचीं वस्त्रें महाराजांच्या हातून घेतलीं. बाजीराव उपेक्षणीय पुरुष नाहीं, अशी पक्की खातरी होऊन निजामानें बाजीरावाची भेट सावर्डिया येथें घेतली, परंतु तिच्यापासून विशेष कांही निष्पति झाल्याचें आढळत नाही. १७२१ च्या आगस्टापर्यंत बाजीराव विजापूर प्रांतात होता. १७२१ च्या सप्टंबर--आक्टोबरांत भडबुंज्या मोगलांशीं पुरंदरास लढाई झाली व नंतर १७२२ प्रारंभीं करीमबेगाशीं युद्ध झालें. निजामाच्या ह्या दोघांही सरदारांचा पराभव करून बाजीराव १७२२ मेंत सुप्यास व जुलैंत साता-यास गेला. ह्या अवधींत निजामुन्मुलुख दिल्लीस जाऊन पातशाहीत ढवळाढवळ करूं लागला.