प्रस्तावना
१६. १७१४ च्या मार्च एप्रिलापर्यंत कृष्णराव खटावकराची व्यवस्था लावण्यांत बाळाजीचा काळ गेला. गुदस्त सालीं आंग्रयाच्या तहांत शिंद्याचा कांहीं प्रांत शाहूकडे आला, त्यामुळे आंग्रयाचें व शिंद्याचें युद्ध लागलें. तेव्हां आंग्रयाचे कुमकेस बाळाजी विश्वनाथ जाऊन शिंद्याशीं तह १७१५ च्या ३० जानेवारीस झाला. पुढें पुणें प्रांतांत अंमल बसवून बाळाजी सातान्यास आला, तों दमाजी थोरातानें नारो शंकर सचिव यास अटकेंत ठेविलें असें कळलें. सचिवाला सोडविण्याच्या खटपटीत पेशव्यांना पुरंदर किल्ला मिळाला. ह्याच अवधींत रावरंभाजी निंबाळकर फितून मोंगलांकडे गेला. त्या मोंगलांचा पराभव खंडेराव दाभाडे यानें बेदम केला. इतक्यांत १७१६ च्या सप्टंबरांत पेशवे स्वारीस निघाले असतां, दमाजी थोरातानें त्यांस पुरंधराखालीं जाधवाच्या वाडीस पकडलें. तेथून सुटून, १७१७ च्या आरंभीं खंडेराव दाभाडे यास सेनापतिपद देऊन खंडेरावानें पराजित केलेल्या सय्यदांशीं तहाचें बोलणें करण्यास बाळाजी गेला. तहाचें बोलणें कायम केल्यावर बाळाजीनें दमाजी थोराताचें पारिपत्य केलें व १७१७ जूनमध्यें सचिवाची सुटका केली. १७१७ च्या आक्टोबरांत बाळाजी इसलामपुराकडे कोल्हापुरकरांवर गेला होता. [खंड ३, लेखांक ४५३] तेथून १७१८ आक्टोबरापर्यंत देशाचा बंदोबस्त करून स्वारी सय्यदांच्या साहाय्यास दिल्लीस निघाली. तेथें नवीन पातशहा स्थापून १७१९ च्या जूनांत साता-यास तो परत आला. १७१९ च्या आक्टोबरांत स्वारीस निघून इसलामपुराकडे गेला व बेहें येथें लढाई करून १७२० च्या २ एप्रिलास वारला.
१७. सय्यदांशीं तह करून शाहूचा दरारा वाढला. परंतु कोल्हापुरकरांच्या बाजूचे चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर वगैरे सरदार जास्त जास्त प्रबल होत चालले. त्यांनीं सय्यदांचा शत्रु जो निजामुन्मुलूख त्याचा पक्ष स्वीकारिला. शाहू, बाळाजी विश्वनाथ, खंडेराव दाभाडे, कंठाजी कदम बांडे, कान्होजी भोसले, चिमणाजी दामोदरजी, कान्होजी आंग्रे व सय्यद बंधू असा एकपक्ष झाला; व कोल्हापूरचा संभाजी, अमात्य, चंद्रसेन जाधव, निंबाळकर, चव्हाण व निजामुन्मुलूख असा दुसरा पक्ष झाला. ह्या दोन पक्षांची चढाओढ म्हणजेच १७२० पासून १७३१ पर्यंतचा इतिहास होतो. त्यांत शाहूकडील बाजीराव हें पात्र प्रमुख आहे व दुस-या पक्षाकडील निजामुन्मुलूख हें पात्र प्रमुख आहे. शाहू व बाजीराव ह्यांचे हितसंबंध अगदी एक होते. संभाजीचे व निजामुन्मुलुखाचे हितसंबंध अगदीं भिन्न होते. संभाजीला आपला वाटा मिळावा एवढीच आकांक्षा होती. निजामुन्मुलुखाला दक्षिणेंत राज्य स्थापावयाचें होतें. हे कार्य साधण्याच्या हेतूनें निजामुन्मुलुखानें संभाजीस हातीं धरिलें होतें. जाधव व निंबाळकर हे जहागिरीच्या आशेनें निजामुन्मुलुखाला मिळाले. त्यांच्या ऐपतीजोगी जहागीर संभाजीकडून मिळणें अशक्य असल्यामुळें, ते निजामाचे पूर्ण हस्तक बनले. शाहू व बाजीराव यांच्या मनांत निजामुन्मुलूख, संभाजी; जाधव, निंबाळकर, सय्यद, दिल्लीचा पातशाहा ह्या सर्वांस संपुष्टांत आणून सर्वत्र महाराष्ट्र-धर्माची व महाराष्ट्रराज्याची स्थापना करावयाची होती.