प्रस्तावना
१३. बाळाजी विश्वनाथास सेनाकर्तृत्च मिळाल्यापासून शाहूच्या सुदैवाला प्रारंभ झाला. १७११ त चंद्रसेन जाधवाचा हैबतराव निंबाळकरानें पराभव केला. १७१२ च्या मेंत कोल्हापूरचा शिवाजी वारला. १७१२ च्या नोव्हेंबरांत शंक्राजीपंत सचिवानें जलसमाधि घेतली. सारांश १७१२ च्या शेवटीं व १७१३ च्या प्रारंभाला ताराबाईचा पक्ष अगदीं बुडाल्यासारखा झाला. १७१३ त कृष्णराव खटावकर व कान्होजी आंग्रे साता-यावर चाल करून आले. कृष्णरावावर प्रतिनिधि व आंग्रयावर बहिरोपंत पिंगळे यांस शाहूनें पाठविलें. पेशव्यांच्या मदतीनें प्रतिनिधीनें कृष्णरावाची समजूत काढिली. आंग्रयानें बहिरोपंत पिंगळ्यास कैद केलें. तेव्हां बाळाजी विश्वनाथानें आंग्र्यावर चालून जाऊन पिंगळ्याला सोडविलें व तह करून आंग्रयाला शाहूच्या बाजूला वळविलें. ह्या कामगिरीबद्दल बाळाजी विश्वनाथास शाहूनें मुख्य प्रधानकी किंवा पेशवाई १७१३ च्या नोव्हेंबराच्या १६ व्या तारखेस दिली. ह्याच वर्षी पेशव्यांचा दक्षिणेकडील प्रतिस्पर्धी जो निजामउल्मुलुख यास दक्षिणेची सुभेदारी मिळाली.
१४. बाळाजी विश्वनाथास पेशवाई मिळाली तेव्हां शाहूनें त्याला ब-याच कामगि-या सांगितल्या. आंग्रयाशीं समेट केल्यानें कोकणांत स्वस्थता झाली. शंक्राजीपंत सचिव वारल्यावर साता-याच्या व पुण्याच्या मधील मावळ प्रांतांत कांहीं बखेडा उरला नाहीं. कृष्णराव खटावकराला इनाम देऊन कृष्णेच्या पलीकडील माण देशांत शांतता झाली. येणेंप्रमाणें स्वराज्यांतील साता-याभोंवतील कांहीं प्रांत अगदी निर्धास्त झाला ह्या निर्धास्त प्रांतांच्या पलीकडील टापूंत अंमल बसविण्याचें काम अद्याप राहिले होतें. पुण्यापासून जुन्नरापर्यंतचा प्रदेश व क-हाडापासून बेळगांवापर्यतचा प्रदेश शत्रूच्या हातांतच होता. खानदेश, व-हाड, गुजराथ, मावळा, पेडगांव, अक्कलकोट, तंजावर, कर्नाटक, कोल्हापूर, वगैरे प्रांतांत अद्याप अंमल बसवावयाचाच होता. सारांश साता-याभोवतील कांही तालुक्यापलीकडे शाहूचा अंमल बसवावयाचें काम अद्याप सबंद उरकावयाचें राहिलेंच होते. हें काम १७१४ पासून १७२० पर्यंत बाळाजी विश्वनाथ करीत होता. त्यांत त्याला बरेंच यश आलें.
१५. १७०७ पासून १७१४ पर्यंत ग्रांटडफनें दिलेला वृत्तांत व मीं हा वर दिलेला त्रोटक वृत्तांत ह्यांत मित्यासंबंधानें व मजकुरासंबंधानें बरीच तफावत वाचकांस दिसून येईल. अमुक स्थलीं ग्रांटडफ चुकला आहे असें प्रत्येक स्थळीं म्हणण्याचें विशेष प्रयोजन दिसलें नाहीं १७१४ पासून १७२० पर्यंतच्या वृत्तांतांतही प्राय: हाच क्रम स्वीकारणे इष्ट दिसतें.