प्रस्तावना
११. धनाजी जाधव वगैरे सरदारांच्या साहाय्यानें १७०७च्या जूनांत शाहूचंदनवंदनाखालीं येऊन उतरला; व तेथून त्यानें सातारच्या किल्ल्यावरील परशराम त्रिंबक प्रतिनिधि वगैरे ताराबाईकडील सरदारांशीं बोलणें लावलें. हे सरदार लवकर वश होतील असें दिसेना. सबब वाई येथील शेखमिरे ह्यांचा फितुर करून शाहूनें तो किल्ला १७०७ च्या डिसेंबरांत काबीज केला, व पुढें एका महिन्यानें म्हणजे १७०८ च्या जानेवारींत तो राज्याभिषित्त्क झाला. परशराम त्रिंबक कैर्देत असल्यामुळें गदाधर प्रल्हाद यास प्रतिनिधिपद मिळाले; बहिरोपंत पिंगळ्यास पेशवाई मिळाली; सखो विठ्ठलास न्यायाधिशी व होनो अनंत यास सेनाकर्तेपद प्राप्त झालें. धनाजी जाधव यास सेनापतिपद व हैबतराव निंबाळकरास सरलष्करपद मिळालें. सचिव अमात्य वगैरे जे सरदार ताराबाईबरोबर साता-याहून पन्हाळ्याकडे गेले त्यांचे हुद्दे अर्थातच शाहूनें काढून घेतले.
१२. साता-यास राज्यव्यवस्थेची अशी विल्हेवाट लाविल्यावर,शाहूनें बहि: शत्रूंकडे आपली दृष्टि फेकिली. शाहूचा पहिला शत्रु म्हटला म्हणजे कोल्हापुरचा शिवाजी व त्याचे सरदार हे होत. ह्या सरदारांनी पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश व सर्व कोंकणपट्टी अडवून टाकिली होती. ह्या प्रदेशांत दंगा करण्याचें व्रत त्यांनीं बरींच वर्षे पतकरलें होते. शाहूचा दुसरा शत्रु म्हटला म्हणजे दक्षिणेंतील मोंगल अधिकारी होत. दिल्लीच्या पादशाहानें शाहूस सोडून दिलें खरें. परंतु पातशाहाच्या अंमलदारांनीं स्वराज्यांतील बराच प्रांत शाहूस घेऊं दिला नाही. तेव्हां स्वराज्यांतील जेवढा प्रांत मोगल अंमलदारांनीं बळेंच हाताखाली घातला होता, तोहि सोडविणें शाहूस भागच होतें. येणेंप्रमाणें १७०८ च्या पावसाळ्यानंतर शाहूस चोंहोकडे शत्रूंना तोंड देणें प्राप्त झालें. १७०८ च्या आक्टोबरापासून १७१० च्या जूनापर्यंत शाहू पन्हाळा, रांगणा, कोल्हापूर, इस्लामपूर, क-हाड वगैरे ठिकाणीं छावणी देऊन होता. [खंड ३, लेखांक ६४]. ह्या अवधींत धनाजी जाधवानें तुळजापुराकडे, परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, चिमणाजी दामोदर, खंडेराव दाभाडे ह्यांनी व-हाड, खानदेश, गुजराथ वगैरे प्रांतांत अंमल बसविण्याचा उद्योग चालविला होता; परंतु शाहूच्या राज्याची स्थिरता कोल्हापूरच्या शिवाजीला गप्प बसविण्यावर विशेष होती. शाहूचे सर्व सरदार मोंगलांच्या प्रांतांत मोहिमा करण्यास एका पायावर तयार असत. परंतु कोल्हापूरच्या शिवाजीवर व ताराबाईवर जाण्यास कोणीहि सरदार धजत नसे. हें अलीकडील काम ते शाहूच्याच अंगावर लोटून देत १७०८ पासून १७१० च्या जूनापर्यंत शाहू पन्हाळ्याकडे स्वत: छावणी करून बसला होता, ह्यांतील अर्थ हा आहे. १७१० च्या जूनांत धनाजी वारणातीरीं वारल्यावर शाहूनें सेनापतिपद त्याचा मुलगा चंद्रसेन जाधव यास दिले; परंतु ह्या मनुष्याचें लक्ष शाहूकडे बिलकूल नव्हतें. त्यानें लवकरच ताराबाईकडे व मोंगलाकडे संधान बांधिलें, व शाहूचा पक्ष अगदी दुर्बल करून सोडिला १७१० च्या जूनापासून १७११ च्या आगस्टपर्यंतचा शाहूचा काल फारच संकटाचा गेला. शाहूपाशीं म्हणण्यासारखें फारसें सैन्य राहिलें नाहीं. शाहूचे राज्य आधारहीन होतें कीं काय अशी भीति पडली. अशा वेळीं नवीन सैन्य तयार करून बाळाजी विश्वनाथानें शाहूची बाजू उत्तम राखिली. ह्या सेवेबद्दल होनो अनंताचे सेनाकर्तेपद शाहूनें बाळाजी विश्वनाथास दिलें.