प्रस्तावना
५ ग्रंथकर्त्याचें ज्ञान अत्यंत विस्तृत असल्यानें जितके वाचक बुचकळ्यांत पडतात तितकेच त्याचें ज्ञान आकुंचित असल्यानेंही तोच चमत्कार होतो. 'मोहरम महिन्यांत बारामतीवर लढाई झाली' असें ४४ व्या पृष्ठावर, 'भडबुंजा मोंगलाचा पराजय केला,’ व 'करीमबेगाशीं युद्ध जुन्नर मुक्कामीं झालें' असें ४६ व्या पृष्ठावर लिहिलें आहे. बारामतीवर कोणाशीं लढाई झाली, भडबुंज्या व करीमबेग हे कोण होते, ह्यांचा निर्देश लेखकानें केला नाहीं. पुढें जेव्हां एखादें अस्सल पत्र सांपडेल व त्यांत ह्या नांवांचा उल्लेख येईल, तेव्हां ह्या तीन प्रसंगांचा साद्यन्त अर्थ कळेल. तोंपर्यंत साशंक स्थितींतच वाचकानें राहिलें पाहिजे. सारांश, वाचकांचीं मनें शंकाकुल करणा-या अशा मित्या ह्या शकावलींत ब-याच आहेत.
६ कोणत्याहि शकावलींत मित्यांचाच समूह तेवढा देण्याचा परिपाठ असल्यामुळें, सांगोपांग इतिहासाशीं तिची तुलना करणें बरोबर होणार नाहीं. काल, स्थल व व्यक्ति ह्या तीन घटकांच्या संमेलनानें ऐतिहासिक प्रसंगाची निष्पत्ति होते. पैकीं कालाचा प्रामुख्यानें निर्देश करणें कोणत्याहि शकवलीचें मुख्य प्रयोजन असतें. ह्या दृष्टीनें पाहिलें म्हणजे, प्रस्तुत शकावली इतिहासकाराला फारच उपयोगाची वाटेल. दफात्यांत निरनिराळ्या सालाखालीं जी जी मिति ग्रंथकर्त्याला महत्त्वाची अशी दिसली ती ती त्यानें ह्या शकावलींत उतरून घेतली आहे. दस-यापासून आगोठीपर्यंत प्रत्येक वर्षी पेशवे कोठें कोठें केव्हां केव्हां होते ह्याचा तपशील देण्याचा ह्या शकावलींत प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न बाळाजी विश्वनाथाच्या व कारकीर्दीसंबंधानें फारच तुटपुंजा आहे. परंतु बाजीराव बल्लाळाच्या व बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील मित्या ब-याच भरपूर अशा दिल्या आहेत. ह्या मित्यांवरून, व ह्या मित्यांशीं स्वतंत्र पत्रांतील मित्यांची सांगड घातली असतां असें दिसून येतें कीं, ग्रांटडफनें बाजीराव बल्लाळाच्या व बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील ब-याच मित्यांचा घोटाळा केला आहे. मित्यांचा घोटाळा झाला म्हणजे प्रसंगांच्या पौर्वापर्याचा घोटाळा होतो; व येथून तेथून सर्व हकीकत चिताड होऊन जाते. एक मिति चुकली असतां ती चार प्रकारची अडचण करते. (१) जेथें ती मिति हवी असते तेथें ती नसते (२) जेथें ती नको असते तेथें ती येते; (३) जेथें ती चुकून आणलेली असते तेथील ख-या प्रसंगाचें उच्चाटण ती करते; (४) व जेथून ती आणलेली असते तें स्थळ रिकामें टाकावें लागतें किंवा एखाद्या निराळ्याच प्रसंगानें भरून काढावें लागतें येणेंप्रमाणें एका मितीच्या अव्यवस्थित मांडणीनें हा असा चतुर्विध घोटाळा होतो. बाळाजी विश्वनाथाच्या, बाजीराव बल्लाळाच्या व बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील कोणत्या मित्यांसंबंधानें ग्रांट्डफनें हा असा घोटाळा करून ठेविला आहे, तें ह्या तिन्ही पेशव्यांच्या कारकीर्दीचें नवीन माहितीप्रमाणें अत्यंत त्रोटक वर्णन देऊन स्पष्ट करून दाखवितो.