प्रस्तावना
१. प्रस्तुत शकावलींत खमसअशर सालापासून म्हणजे इ.स. १७१४ च्या मे पासून इहिदेसितैनच्या जमादिलाखरापर्यंत म्हणजे १७६१ च्या जानेवारीपर्यंत घडलेल्या ठळक ठळक प्रसंगांच्या मित्या दिल्या आहेत. शिवाय प्रथमारंभीं १७१४ च्या आधींच्या कांहीं प्रसंगांचाही क्वचित् धरसोडीचा उल्लेख केला आहे.
२. ह्या शकावलींत प्राय: पेशव्यांच्या मोहिमांचाच तेवढा निर्देश केला असल्यामुळें, इतर सरदारांच्या मोहिमांची माहिती हींत फारशी सांपडावयाची नांहीं. पेशव्यांच्या देखील सर्व मोहिमांच्या मित्या हींत दिल्या आहेत असें नाहीं. बाळाजी विश्वनाथाची बहुतेक कारकीर्द बिन मित्यांचीच ह्या शकावलींत सांपडेल. आतां इतकें खरें आहे कीं, बाळाजी विश्वनाथाच्या कांहीं हालचालींच्या मित्या ह्या शकावलींत दिल्या आहेत; परंतु ह्या मित्या इतक्या थोड्या आहेत की, सबंध महिनेच्या महिने बाळाजी विश्वनाथ कोठें होता व काय करीत होता, ह्यांचा नक्की पता अद्यापि लागावयाचाच आहे. समाधान एवढेंच मानावयाचें कीं, आतांपर्यंत ग्रांटडफादि बखरकरांच्या ग्रंथांत जेथें जेथें मुळींच कांहीं माहिती नव्हती, किंवा जी कांहीं थोडीबहुत माहिती दिलेली आहे, ती जेथें जेथें असंबद्ध, परस्परविरोधी व अपूर्ती होती, तेथें तेथें ह्या शकावलींतील मित्यांच्या साहाय्यानें जास्त तपशिलावर, संगतवार व निश्चयात्मक माहिती मिळण्याचा संभव उत्पन्न झाला आहे. बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीतील मित्यांना ज्या टीपा दिल्या आहेत, त्यांच्याकडे लक्ष पोहोंचविलें असतां माझ्या म्हणण्याचा अर्थ उघड होईल.
३. शकावलीच्या कर्त्याला पेशव्यांचें सर्व दफ्तर खुलें असून, बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीतील मित्या त्यानें इतक्या थोड्या कां दिल्या असा प्रश्न साहजिक उद्भवतो. त्याला उत्तर असें आहे कीं, पेशव्यांच्या दफ्तरांतील जीं दफातीं शकावलीकर्त्याला पहावयाला मिळालीं, त्यांतच मुळीं बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीच्या मित्या थोड्या आहेत, अथवा खरें म्हटलें असतां, मुळींच नाहींत. एक तर बाळाजी विश्वनाथाच्या वेळीं दफातीं ठेवण्याची वहिवाट मुदलांतच नव्हती असें तरी म्हटलें पाहिजे; किंवा दफातीं ठेवण्याची वहिवाट होती असें समजल्यास- आवकजावकाचें दफातें ठेविल्याशिवाय कोणताही कारखाना व विशेषतः राजकीय कारखाना चालणें अशक्य आहे, ही गोष्ट लक्षांत घेतली असतां हाच समज जास्त संभवनीय ठरतो-- तीं दफातीं कोणत्या तरी कारणानें नाहींशीं झालीं असावीं असें म्हणणें अवश्य होतें. कसेंही असो, ह्या शकावलींत बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीतील मित्या फारच थोड्या व अपूर्या आहेत ह्यांत बिलकूल शंका नाहीं. ह्यास दहापांच प्रत्यंतरें देतां येण्यासारखीं आहेत. तिस-या खंडांतील ४५३ व्या लेखांकांत “ इसलामपुरास बाळाजी विश्वनाथ होते ” असें लिहून, नंतर पुढें “थोरले पंतप्रधान दिल्लीहून सातारेस आलेवर महाराजांनीं दक्षिणप्रांतीं मोहीम सांगितली,” वगैरे मजकूर दिला आहे. ह्या लेखांकांत कोल्हापुरच्या संभाजीच्या व सातारच्या शाहूच्या कांहीं झटापटींचें वर्णन आहे व त्यांत बाळाजी विश्वनाथाच्या हालचालींचाही सहजासहजीं उल्लेख केला आहे. त्या उल्लेखावरून असें दिसतें कीं १७१७ त सय्यदांशीं तह केल्यावर बाळाजी इसलामपूर व वाळव्याकडे कांहीं वेळ होता. आणि तेथून १७१८ त तो दिल्लीस गेला व दिल्लीहून परत आल्यावर पुन्हां कोल्हापूरकरांवरील मोहिमेंत तो सामील झाला. शकावलींत सय्यदांशीं तह होण्यापूर्वीच्या बाळाजी विश्वनाथाच्या कोल्हापुरावरील मोहिमांचा बिलकुल उल्लेख नाहीं; दिल्लीहून परत आल्यावरच्या मोहिमेचा मात्र लहानसा उल्लेख आहे.