पुरवणी :-
तीर्थरूप राजश्री राऊ तथा राजश्री आप्पा स्वामीचे सेवेसी. विनंति. आजि मंदवारी प्रात:काळी दरबारास गेलों होतों. राजश्री नारबोवा व आणीकही कित्येक लोक मुज-यास आले होते. तेव्हा राजश्री स्वामी बोलले की, राजश्री प्रधान पंत पुण्यास कोट बांधितात, येविषयी पहिले हुजुरे व कागद पाठविले. परंतु ते गोष्ट न ऐकता आपलाच हेका करून किल्ला बांधितात. तस्मात् मोंगलाचें पुण्याचें ठाणें बसावें, असे त्याच्या मनांत आहें की काय ? सिंहगड किल्ला जवळ तेथें चिरेबंदी कोट पक्के काम करितात. द्वाही हुजुरे याणीं दिली, तथापि मोजीत नाहीत आणि कोट बांधितात. राजश्री सचिव पंताचा किल्ला सिंहगड जवळ आहे. ऐशियास सचिवाकडील किल्ल्यास मोंगलाचा मोर्चा बसवावा असे त्याचे चित्तांत आहे, हे कांहीच कळत नाही. तसेंच जागा जागा किल्ले वाघोली व नांदडें व वाडी व आंबी वगैरे जागी किल्ले बांधितात. मोंगलाची आवाई झाली तरी यांतून एकही जागा रुजणार नाही. आणि आपलें आपल्यासच प्रतिबाधक कर्म कां करितात ? व वडीलही उगीच डोळे झांकितात. परंतु गळफांस बसेल. पूर्वी पिलाजी जाधव वाडा बांधीत होते, तेव्हां आह्मीं मनाई करीत होतों. परंतु राजश्री चंद्रसेनराव जाधव थोराताची पाठ राखीत, यामुळे वाडीस कोट जाला. शेवटीं राजश्री बाळाजीपंत धरिले. तेव्हां तीच वाडी पुरंदरास मोर्चा जाहला व मुलूख हेराण जाहला. आह्मी सांगत होतों तें न ऐकिलें. शेवटी त्याच गोष्टीस आलें. तसेंच हेंही कर्म आहे. राजश्री प्रधान पंतांनी कांही पुण्यांत कोट बांधावा असें काही नाहीं, ह्मणून बहुत श्रमी होऊन बोलले. स्वामीस विदित व्हावें ह्मणून लिहिलें आहे. चोरपाळतीनें बातमीही पाठविणार आहेत. किल्ला कसा बांधितात असें आहे. तरी स्वामींनी राजश्री स्वामीचे आज्ञेंप्रें॥ किल्ला न बांधावा. हवेलीभोंवती बुरुज न घालितां चार दिवाळी मात्र करावीं. जुनें काम आहे तें कांही फार पक्कें तो नाहीं. परंतु उगीच भ्यासूर दिसतें. त्यास पांढरे मातीनें भिंतीचें बाहेरील अंग सारवावें, ह्मणजे डोळेफोड दिसणार नाहीं. अर्थ सूचना लिहिला आहे. स्वामी खावंद आहेत. खातरेस येईल ते करावें. विदित झालें पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.२१
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)