सु॥ इसने सलासीन मयाव अलफ, सन ११४१
फसली, अवल साल छ २९ जिल्काद, २५ मे
१७३१, ज्येष्ठ शुध्द १ शके १६५३.
छ ३ जिल्हेज रोजी (२९ मे १७३१) श्रीमंत साता-यास गेले, ते छ २० जमादिलाखर रोजी (९ डिसेंबर १७३१) पुण्यास परत आले. छ २० जमादिलाखर (९ डिसेंबर १७३१) चिमाजी अप्पाचें दुसरें लग्न झालें, नांव अन्नपूर्णाबाई. छ ५ साबान रोजीं (२२ जानेवारी १७३२) स्वारी कुलाब्यास गेली होती. छ १० रमजान रोजी (२६ फेब्रुवारी १७३२) परत आले. दिल्लीत बादशहानें ऐकिलें कीं सरबुलंदखानानें मराठ्यास चौथ व सरदेशमुखी दिली. यामुळे त्यास राग येऊन त्यानें अभेसिंगाबरोबर लष्कर देऊन गुजराथेंत पाठविलें व सरबुलंदखानास माघारें बोलाविलें. तो तिकडे गेल्यावर त्याचा अपमान केला. अभेसिंग याच्या फौजदारानें बडोदा किल्ला पूर्वी मोंगलांनीं गाइकवाडाकडून घेतलेला तो आपण घेतला. परंतु तेथील लोकांस पिलाजी गाइकवाड याचें अगत्य फार असें. त्याणें कित्येक जागीं आपली ठाणी बसविली होती. करितां त्याशी तह करण्याचें निमित्त करून कित्येक वेळां माणसे पाठविली. बोलणी चालली होती त्याप्रमाणें एकेदिवशी त्याशी बोलण्याकरितां मनुष्य पाठविला. तो बोलून परत निघाला. नंतर काही वस्तु आंत राहिली असें मिष करून काही गोष्ट कानांत सांगण्याचा आकार दाखवून पिलाजीजवळ जाऊन एकाएकी खंजीर पोटांत खुपसून ठार मारिले. त्या मारेकरियासही पिलाजीच्या माणसांनी त्याच ठिकाणी ठार मारिलें. पिलाजीचे मरणामुळे अभेसिंग लाभ चिंतीत होता, तो त्यास प्राप्त झाला नाही. पिलाजीचा मित्र पाद्रागांवाचा ठिकमा नांवाचा तेथील देसाई होता. त्यानें पिलाजीचा भाऊ महादजी यास बोलावून आणून बडोदा किल्ला त्याणें घेतला. तो अद्यापपर्यंत गाइकवाड यांचे वंशजांकडे आहे. पिलाजीचा वडील पुत्र सोनगडास होता. त्यानें मोठे लष्कर जमा करून बडोद्यापासून जोतपूरपर्यंत स्वा-या करून अभेसिंगास बहुत उपद्रव दिल्यामुळें तो अहमदाबादेस आपला विश्वासू मनुष्य ठेऊन आपण जोतपुरास जाता झाला. महाराज याणीं बाजीराव पेशवे यास सरदेशमुखीचे बंदोबस्ताकरितां हिंदुस्थानांत पाठविलें होतें.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)