जनरूढीस झुगारून दिल्याचीं जीं वर उदाहरणें सांगितलीं आहेत त्यापैकीं कांहीं अशीं आहेत कीं, त्यावेळची परिस्थिति ध्यानांत आणून पूर्ण विचारांतीं हे नियम बाजूस टाकिले आहेत. पण दुसरीं आहेत त्यांत अशी गोष्ट नसून परंपरेनें आलेल्या नियमांची सर्व साधारण जी ढिलाई झाली त्याबरोबरच यांचीही झाली असावी. आह्मांस असें वाटतें कीं, महाराष्ट्रछत्र पेशव्यांच्या हातांतून नाहींसें झालें नसतें तर ह्या दोन्ही बाबतींत जास्त सुधारणा कांहीं एक ठराविक मर्यादेपर्यंत झाली असती व तीही फार जलद झाली असती. एतद्देशीय राजे राज्य करीत असते---या राजांचे अधिकारनियम आह्मीं वर सांगितलेच आहेत--- तर कांहीं घासाघीस न होतां ही सुधारणा थोडी प्रत्यक्ष, थोडी अप्रत्यक्षरीतीनें झाली असती; पण इंग्लिशांसारखे परदेशीय राजे आहेत ह्मणून व त्यांनीं स्वत:करितां जे नियम घातले आहेत त्यांस अनुरूपच ते अम्मल करीत आहेत म्हणून वरील बाबतीमध्यें सुधारणा होणें कठीण होत आहे. तरीपण इंग्रजी राज्याबरोबर पाश्चिमात्य शास्त्रें व कला, इतिहास व वाड्मय यांच्या शिक्षणाचा जो जोर लागला आहे तो, एतद्देशीय राजे असते तर मात्र लागला नसता हें खरें, पण सुधारणा सुलभ रितीनें झाली असती ह्यांत कांही संशय नाहीं.
पुष्कळ वर्षांपूर्वी सर हेन्री सम्नर मेन या विद्वान् गृहस्थानें असें ह्मटलें आहे कीं, ब्रिटिश न्यायकोर्टें स्थापल्यामुळें हिंदु कायद्याची वाढ खुंटली. त्याचप्रमाणें ब्रिटिश राज्यसत्तेच्या सामर्थ्यामुळें हिंदू लोकांच्या सामाजिक वाढीवर तसाच परिणाम झाला असेंहि म्हणतां येईल. असा परिणाम ज्या कारणांनीं घडून आला किंवा घडून येत आहे तीं कारणें कोणतीं आहेत याचें सूक्ष्म विवेचन करणें सोपें नाहीं; व तसें विवेचन करण्याचें हें योग्य स्थळ नव्हे; परंतु ठोकळ रीतीनें आपल्याला असें ह्मणतां येईल कीं, हिंदु समाजामध्यें पूर्वी ज्या शक्ति कार्य करीत होत्या, त्या ब्रिटिश राज्यसत्तेमुळें कमजोर झाल्या आहेत, आणि उलटपक्षीं व्यक्तिस्वातंत्र्य प्रचारांत येत आहे; उदाहरणार्थ नाना फडणविसांनीं प्रसंग आला तेव्हां जें करणें योग्य होतें तेंच करण्याबद्दच सल्ला दिली. मग हें करणें जनसंप्रदायाविरुद्ध होतें तरी त्यांनीं त्याकडे लक्ष दिलें नाहीं. पेशव्यांनीं नानांची सल्ला मान्य केली. ब्राह्मण लोकांनीं श्रीमंतांचें अनुकरण केलें. त्याबद्दल नुसता गवगवाहि कोणी केला नाहीं. नानांनीं सांगितलें कीं, तूर्त कृत्य उरकून घ्यावें–भोजन करावें--अशौचाबद्दल जी अडचण, त्यास कांहीं तरी शास्त्राधार नंतर काढूं. परंतु शास्त्राधार काढल्याचें मात्र कोठें आढळत नाहीं. पण जर शास्त्राधार काढणें जरूर होतें तर तो निघाला असता. कारण समाजाच्या अंगीं चेतनत्व असतें, तसें हिंदुसमाजामध्येंहि होतेंच. सर्व लोकांच्या संमतीनें-मग ती संमति गुप्त असेना–पूर्वीचे नियमबंध बरेच सैल झाले असते, व कालावधीनें प्रत्येक सुधारणेस जनरूढीनें आपली कबुली दिली असती. असला क्रम पेशव्याच्या अमदानींत व थोड्या संकुचित अर्थानें मराठी सांम्राज्यांतहि दिसून आला असता असें आह्मांस वाटतें. पण सध्याच्या आमच्या सुधारणेच्या स्थितींत हा क्रम क्वचितच दिसून येईल; किंबहुना जेथें जेथें ब्रिटिश प्राबल्य जास्त जोरांत आहे, त्या ठिकाणीं हा क्रम बराच मंद व क्षीणशक्ति असा दिसून येतो. कै० कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनीं ( या गोष्टीत ३० वर्षे झालीं. )
आपल्या युरोपियन स्नेहाच्या पंक्तीस बसून एका मेजावर फलाहार केला, म्हणून ज्या समाजांत शास्त्रीबुवा विचारश्रेष्ठ होते, त्याच समाजानें शास्त्रीबुवांच्या कृत्याविषयीं केवढें अकांडतांडव केलें व किती दपटशहा दिला हें सर्व महशूर आहेच. तदनंतर त्याचप्रमाणें दुसरी एक गोष्ट घडून येऊन त्याचाहि परिणाम असाच झाला. पहिल्या गोष्टीमुळें सुधारणा अजीबात खुंटली असें ह्मणतात. मग हें खरें असो वा खोटें असो, आणि त्यानंतर कांहीं सुधारणा झाली असो वा नसो. एवढें मात्र स्पष्ट आहे कीं, जी सुधारणा; झाली असेल ती फार मंद गतीनें होत आली आहे. उलटपक्षीं पेशवाईमध्यें जी चळवळ झाली, तिचा मुख्य उद्देश काय हें ज्यांस माहीत नाहीं किंवा संमत नाहीं, असे लोक आहेत हें ह्याच गोष्टीनें समजून आलें.