त्यावेळीं प्रचलित असलेल्या नियमांचा कडकपणा मुद्दाम होऊन कमी केलेला आहे, अशीं बरीच उदाहरणें एके ठिकाणीं करून आह्मीं वर सांगितली आहेत. त्याचप्रगाणें वरच्याविरुद्ध अशीं निराळ्या प्रकारचीं एक दोन उदाहरणें सांगणें प्रशस्त होईल. आमच्यापुढें जे कागदपत्र आहेत, त्यांमध्यें पेशव्यांच्या घराण्यांत बालविवाह झाल्याचीं पुष्कळ उदाहरणें सांपडतील यांत कांहीं संशय नाहीं. बाळाजी बाजीरावाचीच गोष्ट घ्या. ते अवघे नऊ वर्षांचे असतांना त्यांचा विवाह झाला.
विश्वासराव तर लग्नाचेवेळी केवळ आठ वर्षांचे होते. थोरले माधवराव फक्त नऊ वर्षांचे. नारायणराव दहा, व सवाई माधवरावास नुकतें आठवें संपून नववें वर्ष लागलें होतें. बालविवाहाची चाल पेशव्यांचे घराण्यांतच होती असें नाहीं. नाना फडणविसांचें जें एक छोटेसें आत्मचरित्र आहे, त्यांत नाना दहा वर्षांचे असतांना त्यांचा विवाह झाला असें लिहिलें आहे. तसेंच पहिली बायको मेल्यानंतर लागलाच द्वितीय संबंध केल्याचींही पुष्कळ उदाहरणें आहेत. विधवा स्त्रियांच्यासंबंधानें पेशवाईच्या अगदीं अखेरी अखेरीस ज्या महत्वाच्या गोष्टी घडून आल्या त्यांची तारीखवार याद उपलब्ध झाली आहे. शके १७२९ श्रावण शुद्ध १२ रोजीं घडलेली हकीकत :-पुणें येथें नागझरीजवळ विधवा स्त्रियांचें केशवपन करण्याचा विधि झाला. असल्या अमंगळ कृत्याबद्दलची जास्त माहिती मिळाली असती तर बरें झालें असतें. लग्नसमारंभांत नेहमीं कलावंतिणीचा नाच होई व धर्मपत्नीच नव्हे, तर रखाऊ स्त्रियासुद्धां पतिमरणानंतर सती जात असत, अशीही हकीकत आढळते.
वर आह्मीं ज्या गोष्टी व जी किरकोळ माहिती एकत्र करून दिली आहे, तीवरून पूर्वकाळच्या राज्यांत मराठा मंडळाची सामाजिक व धार्मिक स्थिति कशी होती याचें किंचित् दिग्दर्शन होतें. सध्यां ज्या गोष्टी प्रचलित आहेत, त्यांपैकीं पुष्कळ तेव्हांही प्रचारांत होत्या हें। निर्विवाद आहे. ब्राह्मणी पद्धति आतांपेक्षां त्यावेळीं जास्त जोरांत होती, व ती असणें हें स्वाभाविकच आहे; पण पूर्वपरंपरागत नियमांचें कितीएकदां तरी उल्लंघन झालें, व वर सांगितल्याप्रमाणें कितीएक नवीन कल्पना निघाल्या; परंतु ह्या देशामध्यें ब्रिटिशराज्यसत्तेखालीं पाश्चात्य विचारांची सुरवात झाल्यानंतर वरील बाबतींत थोडी ढिलाई होऊं लागली असें जें कांहीं लोकांचें मत आहे, त्याचा व वरील गोष्टींचा मेळ बसत नाहीं. माझ्या मतें वरील ढिलाई या काळाच्या फार पूर्वीपासून सुरू झाली आहे. शिवाय वर एक दोन उदाहरणांत ह्या ढिलाइचीं जीं कारणें सांगितलीं आहेत, ती पाहिलीं ह्मणजे, असें अनुमान निघतें कीं, निराळ्या प्रकारची परिस्थिति असतांना जे नियम अमलांत आले, ते खुद्द मराठाशाहींतील परिस्थितीस योग्य असे नव्हते. प्रथमतः कांहीं विशेष गोष्टींत हा अयोग्यपणा दिसून आला असावा, व त्यावेळेस प्रचलित नियमांचे उल्लंघन झालें असावें. याप्रकारें एकदां एके ठिकाणीं वाट झाली म्हणजे दुस-या ठिकाणींही तशाच वाटा पडतात. मग परिस्थिति तितकी अनुकूल नसली तरी चिंता नाहीं.