परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या चरित्रांत एक गोष्ट आहे. सध्यां आमचेजवळ जे अस्सल कागदपत्र आहेत त्यांत ह्या गोष्टीचा उल्लेख नाहीं. तरीपण ही गोष्ट सांगण्यासारखी आहे म्हणून सांगतो. महाराष्ट्रांतील सर्व लोकांस ही गोष्ट माहीत आहे, पण रा. निगुडकर यांनी जें परशुरामभाऊचें चरित्र प्रसिद्ध केलें आहे, त्यांत जशी हकीकत दिली आहे तशी येथें सांगतों. ती हकीकत अशीः--परशुरामभाऊंची ज्येष्ठ कन्या बयाबाई नांवाची होती. तिला बारामतीचे जोशी यांचे घरी दिलें होतें. लग्नाचे वेळेस ती अवघी सात किंवा आठ वर्षांची असेल. लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आंतच, तिच्या पतीचा अंत झाला. तेव्हां जगरूढीप्रमाणें ती बालविधवा झाली. नंतर कांहीं दिवसांनी परशुरामभाऊंनी आपल्या हतभागी कन्येची सर्व हकीकत रामशास्त्रयापुढें मांडली. ती हकीकत ऐकूनः शास्त्रीबोवांस त्या मुलीबद्दल कळवळा आला व ते म्हणाले कीं, “ या मुलींना पुनर्विवाह करण्यास कोणतीही हरकत नाहीं.” परशुरामभाऊंनीं हें। सर्व वर्तमान काशीक्षेत्रांतील विद्वान् ब्राह्मणांस कळवून त्यांजकडून पुनर्विवाहाबद्दल संमति मिळविली. परंतु इतकी मजल मारिल्यानंतर भाऊंनीं आपल्या मुलीचा पुनर्विवाह करण्याबद्दलचा उद्देश सोडून दिला; कारण त्यांचे इष्टमित्र त्यांस ह्मणाले कीं, पुनर्विवाह आजपर्यंत चालत आलेल्या जनरूढीस अगदीं विरुद्ध आहे, तेव्हां ही जनरूढी सोडून देऊन समाजाचीं मनें बिघडून टाकण्याचें धाडस न करणें हें श्रेयस्कर होय. सबब भाऊंनीं आपला विचार अजीबात टाकून दिला. तरी पण ही गोष्ट ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्वाची आहे. परशुरामभाऊ पटवर्धन ह्मणजे पेशवाई दरबारांतील कांहीं लहानसहान सरदार नव्हेत. शिवाय पूर्वजांच्या धर्मावर पूर्ण निष्ठा बाळगणारे अशा मनुष्याने, खोलपर्यंत रुजलेल्या जनरूढीस झुगारून देण्याचा अगदीं मनापासून प्रयत्न चालवावा, हें त्यावेळच्या पिढीचीं मनें जनरूढीनें। कशीं खच्चून आवळून टाकलीं होतीं, याचा विचार केला ह्मणजे बरेंच विलक्षण दिसतें. तशांत रामशास्त्रयांसारख्या परमपूज्य व श्रेष्ठ पंडिताची–ज्याची उज्वल कीर्ति सर्व महाराष्ट्रसाम्राज्यामध्यें एकसारखी दुमदुमून आहे अशा पंडिताच्या संमतीची, जनरूढीस झुगारून देण्याच्या कामीं भर पडावी हें त्याहूनही विलक्षण आहे. आणि काशीक्षेत्रस्थ पंडितांनीं यास आपल्या ऐकमत्याचें पाठबळ द्यावें हें तर सर्वांत विलक्षण होय. उलटपक्षीं त्यावेळीं हिंदुसमाजाची स्थिति अशी होती हेंसुद्धां चांगल्या त-हेनें दिसून येतें. रामशास्त्र्यासारख्या विद्वान् पंडिताचें पूर्ण पाठबळ असतां व पुनर्विवाहासारख्या सुधारणेविरुद्ध असलेलीं लोकांचीं मतें अगदीं निराधार आहेत अशाबद्दल ढळढळीत शास्त्रीय प्रमाण असतां परशुरामभाऊसारख्या मनुष्याला अंतःकरणांत पाझर फुटून जी गोष्ट करण्यास तो तयार झाला ती गोष्ट तडीस नेण्यास धीर होऊं नये, यापरतें तत्कालीन हिंदुसमाजस्थितिसूचक दुसरें उदाहरण तें कोणतें ?
याच प्रकारची आणखी एक गोष्ट येथें सांगणें इष्ट आहे, व त्यासही कागदपत्रांत कांहीं पुरावा नाहीं. सध्यां ब-याच हिंदुलोकांचें ज्या विषयाकडे लक्ष लागत चाललें आहे अशा विषयासंबंधीं ही गोष्ट आहे. याविषयीं आह्मांस जी माहिती आहे, ती फॉर्ब्स साहेबांच्या प्रख्यात “ पूर्वेकडील लोकांच्या इतिहासा " वरून (Orientel memoirs-of Forbes ) मिळालेली आहे. फॉर्ब्स साहेब इ. स. १७६६ सालीं व त्यानंतर कांहीं वर्षे पश्चिम हिंदुस्थानांत राहिले होते. हें साहेब लिहितातः-“ त्यांनीं ( राघोबादादांनीं ) दोन ब्राह्मण विलायतेस पाठविले होते. ते हिंदुस्थानांत परत आल्यावर, एक उत्तम सुवर्णाचें स्त्रीलिंग करून त्यांतून त्यांना जावें लागलें. हा विधि झाल्यानंतर व ब्राह्मणांना दानधर्म केल्यानंतर, त्यांना पूर्वीप्रमाणें ब्राह्मणजातींत घेण्यांत आले, व त्या जातीचे त्यांना सर्व हक्क परत मिळाले. परत म्हणण्याचें कारण, इतक्या अपवित्र देशांतून प्रवास केल्यामुळें मलिनता उत्पन्न होऊन हे त्यांचे हक्क नष्ट झाले होते. ह्यावरून इतकें सिद्ध होतें कीं, हिंदुस्थानदेश एकछत्री ब्राह्मणी साम्राज्याखालीं होता, अशा प्राचीनकाळीं “ काळा पाणी " ओलांडून जाण्याचें महत्पातक प्रायश्चित्तानेंही क्षालन न होण्याजोगें नव्हतें, व आतां जो एक नवीन सिद्धांत निघाला आहे कीं, द्विजानें समुद्रपर्यटण केल्यास प्रायश्चित्त घेऊनही त्याला जातिधर्मात घेतां येत नाहीं हा सिद्धांत त्यावेळच्या लोकांना संमत नसून राज्यकर्ते पेशवे यांचेंसुद्धा त्या सिद्धांतास अनुमोदन नव्हतें.