प्रभुजातीच्या सरदारांपैकी दोघांचीं नांवें सांगण्याजोगीं आहेत. पहिला खंडो बल्लाळ चिटणीस-शिवाजीचा मुख्य चिटणीस बाळाजी आवजी याचा मुलगा. त्याच्या बापास व चुलत्यास संभाजानें जरी निर्दयपणानें ठार मारिलें होतें, तरी पण खंडोपंतानें एकनिष्ठपणानें चाकरी करून पोर्तुगीज ( फिरंगी ) लोकांबरोबर झालेल्या लढाईत त्यानें तरवार गाजविली. सबब संभाजीची त्यावर मर्जी असे. संभाजीच्या मरणानंतर तो राजारामाबरोबर जिंजीस गेला. ही सर्व मंडळी वेष पालटून जात असतां बल्लारीजवळ मोंगल सुभेदारानें त्यांना ओळखून तो त्यांना पकडण्याच्या बेतांत होता. इतक्यांत खंडो बल्लाळानें जिवाची पर्वा न करतां आपण मागें राहून आपल्या सोबत्यांस पुढें पाठवून दिलें. त्या सुभेदारानें खंडो। बल्लाळ यास पकडून त्याचे हाल हाल केले, तरी पण त्याची स्वामिनिष्ठा यत्किंचित्ही ढळली नाहीं. पुढें थोड्या वेळानंतर त्यानें जिंजींतून राजारामाची सुरक्षितपणें सुटका होण्याचा सुयोग जुळवून आणला. मोंगलांचे सैन्यांत कांहीं मराठे सरदार होते. खंडो बल्लाळानें आपलें कोंकणांतील वतन त्या सरदारांचे सर्वस्वी स्वाधीन करून त्यांशीं स्नेहभाव संपादिला व वरील सुयोग जुळवून आणला. शाहूराजे साता-यास येऊन सिंहासनारूढ झाले तोंपर्यंत खंडो बल्लाळ जिवंत होते. या युद्धांत विजयश्री मिळविलेला दुसरा प्रभु सरदार प्रयागजी होय. ओरंगजेब बादशहानें स्वतः सैन्य घेऊन साता-यास पुष्कळ महिनेपर्यंत वेढा दिला होता. तेव्हां प्रयागजीनें मोठ्या शौर्यानें त्या शहरचें रक्षण केले.
हेच, ब्राह्मण, मराठे व प्रभु जातींतील मुख्य स्वदेशभक्त सरदार होते. आपणांवर आलेल्या आपत्तीस न जुमानतां राष्ट्रीय स्वातंत्र्याकरितां अखेरपर्यंत लढण्याचा त्यांचा निश्चय होता. आणि महाराष्ट्रांत राहून आत्मसंरक्षणाची चांगली तयारी करण्यास त्यास ---' - सत मिळेना ह्मणून त्यांनी दक्षिणेचा रस्ता धरला व जिंजींत जाऊन हेले.—हिले. तेथें राजारामानें अष्टप्रधान नेमिले, व तो दरबारही भरवूं लागला. उत्तम कामगिरी बजावणा-या लोकांस इनाम व जहागिरी देई-जणूं आपण आपल्या देशाचे अजून मालकच आहोंत असें त्यास वाटें-व मोंगल सैन्याशीं जास्त नेटानें झुंजण्यास आपल्या सेनापतीस आज्ञा करी. त्यांनीं आपलें सैन्य जमवून दक्षिणेंतील सहा सुभ्यांतच नव्हे तर मोंगल राज्याच्या अति प्राचीन प्रांतांतसुद्धां चौथाई व सरदेशमुखीचा हक्क मागण्याकरितां आपल्या सरदारांस योग्य अधिकार देऊन पाठवीत असे. तेव्हां लवकरच औरंगजेबास असें दिसून आलें कीं, मराठे सरदारांनीं धरून ठेवलेलें हे महाबलाढ्य ठिकाण पक्कें जमीनदोस्त केल्याशिवाय महाराष्ट्रांत आपण पुष्कळ मुलूख मिळविला तरी कांहींही उपयोग होणें नाही. ह्मणून औरंगजेबाने आपल्या दक्षिणेंत विजयी झालेल्या, झुलफिकारखान नामक सरदारास जिंजीस वेढा घालण्याचा हुकूम दिला व त्यानें इ० स० १६९१ त वेढा दिला. पण हा किल्ला इतका मजबूत होता, व वेढा घालणा-या मोंगल सैन्यास त्रास देण्याचें काम संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांचेकडे असून त्यांनीं आपलें काम इतक्या उत्तम रीतीनें केलें कीं, इ० स० १६९८ पर्यंत झुलाफिकारखानास किल्ला सर करितां आला नाहीं. व शेवटीं किल्ला सर केला तेव्हां राजाराम व त्याचे लोक हे तेथून पळून गेले असेंच त्याला आढळून आलें. मराठ्यांना या वेळेस विश्रांतीची फार गरज होती. ती विश्रांति त्यांना या सात वर्षांच्या अवधींत मिळाली व मोंगलांचें व आपलें सामर्थ्य सारखेंच आहे असेंही त्यानां कळून आलें. औरंगजेबच्या सैन्यानें जो दरारा उत्पन्न केला तो आतां पार नाहींसा झाला व मराठा सैन्याची एक तुकडी एकीकडे वेढ्यापासून जिंजीचें संरक्षण करीत आहे तों दुसरीकडे धनाजी जाधव व संताजी घोरपडे महाराष्ट्रांत परत येऊन, शिवानीच्या वेळचें शिलेदार, बारगीर इत्यादि कसलेल्या घोडेस्वारांना त्यांनीं आपल्या पक्षात आणून मिळविलें. घासदाणा वसूल करुन त्यांतून या बिनपगारी व आपखुषीनें चाकरी करणा-या घोडेस्वारांचा खर्च चालत असे. इ. सन १६९१ तच मराठ्यांच्या टोळ्यांनी नाशिक, बीड व बेदर हीं शहरें लुटिलीं. इ. सन १६९२ ते रामचंद्रपंत विशाळगड येथून ठाणें उठवून साता-यात जाऊन राहिले व घाटमाथ्यावरील मुलुखावर त्यांनीं अम्मल सुरू केला व सैन्याच्या टोळ्या पाठवून ठिकठिकाणीं किल्ल्यांतील मोंगल पटणीचा ते पराभव करीत. याप्रमाणें वाई, रायगड, पन्हाळा व मिरज येथील किल्ले मिळाले.