प्राचीन संस्कृतभाषेचें महत्व जास्त, की प्राकृत भाषेचें महत्व जास्त, अशासंबंधानें प्रस्तुतकालीं जो कलह माजून राहिला आहे, तो आज कालचा नसून फार पुरातनचा आहे. त्यांतील मुद्यांचा निकाल प्राकृत भाषांच्यातर्फे मागेंच लागला आहे, व पंडित व प्राचीनवस्तुसंशोधक यांचे म्हणणें कितीही विरुद्ध असो, या प्रश्नास एकच उत्तर आहे, व तें त्या साधुसंतांनीं संस्कृतभाषेस आपल्या आरंभिलेल्या कार्यास निरुपयोगी ह्मणून बाजूस सारून मातृभाषेची वाढ व सुधारणा करण्यांत त्यांनीं आपले सर्व श्रम खर्ची घातले, त्याचवेळेस दिलें आहे. हिंदुस्थानांत अर्वाचीन प्राकृतभाषांची वाढ साधुसंताच्या श्रमानेंच झाली, आणि ज्या भागांत सुधारणा करण्याकडे लोकांचा विशेष कल होता, त्याच भागांत प्राकृत वाङ्मयाची ही वाढ मोठ्या सपाट्यानें झाली असें खुशाल म्हणतां येईल.
यूरोपामध्यें प्रोटेस्टंट सुधारकांनी दुसरा एक अति महत्वाचा फेरफार अमलांत आणिला. त्यांनी रोमनक्याथोलिक धर्मसंस्थांमध्यें मूर्तिपूजा व संतपूजा यांचा जो बडेजाव माजून राहिला होता, त्याविरुद्ध मोठा गवगवा केला. आमच्या इकडेही तसाच गवगवा झाला होता; परंतु प्रोटेस्टंट सुधारकांमध्यें विशेषेंकरून त्यांच्यापैकीं अति आग्रही लोकांमध्यें, मूर्तिभंजक पंथ जसा निघाला तसा इकडे निघाला नाहीं. महाराष्ट्रांतील साधुसंतांस व्यावहारिक व तात्विक दृष्ट्यासुद्धां अनेक देवांची पूजा आवडत नसे. प्रत्येकजण ईश्वरी अवताराच्या एका विवक्षित रूपास भजत असे. आणि त्यामुळें बाकीच्या देवांविषयी त्याची भक्ति नसे. उदाहरणार्थ, रामदास, राम या नांवानें ईश्वरास भजे. एकनाथ व जयरामस्वामी कृष्ण. म्हणून त्याची पूजा करीत. तुकाराम, चोखामेळा, नामदेव हे विठोबा म्हणून, नरहरी सोनार आणि नागनाथ शिव ह्मणून, जनार्दनस्वामी व नरसिंहसरस्वति दत्तात्रय ह्मणून, मोरया गोसावी व गणेश नागनाथ गणपति म्हणून, ईश्वराची आराधना करीत. त्याचप्रमाणें इतरत्र साधुलोकांची गोष्ट आहे. हे साधुसंत जेव्हां दुस-या देवालयांत जात, तेव्हां ते ज्या मूर्तीची पूजा करीत नसत, ती मूर्ति ते पहात नसत, म्हणुन ती मूर्ती त्यांचें आवडतें रूप धारण करून त्यास दर्शन देई, अशा अनेक चमत्कारिक गोष्टी या साधुसंतांच्या चरित्रांत लिहिल्या आहेत. या साधुसंतांपैकीं प्रत्येकजण, सत्ताधीश ईश्वर एक आहे, दुसरा कोणीही नाहीं असें मानित असे, व कोणासही ह्या सिद्धांताविषयीं शंका घेऊं देत नसत व वादविवादही करूं देत नसत. पण वर सांगितल्याप्रमाणें या देशांत मूर्तिभंग कधींही झाला नाहीं; तर आपण पुजीत असलेली ईश्वराचीं नानाविध रूपें हीं जाऊन शेवटीं एकच देवाधिदेव किंवा ब्रह्म आहे, असें ते मानीत. सर्व लोकांच्या मनाची अशी प्रवृत्ति 'फार जुनाट आहे. वेदकालामध्यें सुद्धां जरी इंद्र, वरुण, मरुत आणि रुद्र यांच्याकरितां केलेल्या यज्ञयागामध्यें ते त्यांची वेगवेगळी आराधना करीत, तरी ते सर्व एका श्रेष्ठ सृष्टिकर्त्याचीं निरनिराळीं रूपें आहेत असें मानीत असत. याच प्रवृत्तीवरून साधुसंतांस मूर्तिपूजेचें विशेष महत्व कां वाटत नसे तें सहज समजण्यासारखें आहे. हे साधुसंत लोक (मूर्तिपूजक, या शब्दाचा एक अर्थ आक्षेप घेण्याजोगा आहे व त्या अर्थानें ते ) मूर्तिपूजक होते असें ह्मणणें म्हणजे त्यांचे विचार व कल्पना यांचा पूर्ण विपर्यास करण्यासारखेंच होय. वैदिक कालांत तर मूर्ति किंवा पुतळा यांची कधींही पूजा करीत नसत. अवताराची कल्पना जेव्हां निघाली, तेव्हांच ही चाल प्रचारांत आली. आणि जैन व बौद्ध हे आपल्या साधुसंतांची पूजा करीत, त्यायोगें या चालीस विशेष जोर आला. शेवटीं शेवटीं येथील मूळचे रानटी लोक आर्यसमाजांत मिसळून त्यांची दगडधोंड्याचीं पूजासुद्धां इकडे सुरू झाली व या रानटी लोकांच्या देवांची गणना आर्य देवांच्या अवतारांत होऊं लागली. साधुसंत मात्र अशा अडाणी क्षुद्रकल्पनेस कधींही थारा देत नसत. मूर्तीचे ठिकाणी ईश्वरी गुण दिसेनात, तेव्हां ते मुर्तिं पूजेचा निषेध करूं लागले. तुकाराम, रामदासांनी तर या अडाणी मूळच्या लोकांच्या देवांची व त्यांच्या भयंकर पूजाहोमांची अगदी निर्भर्त्सना केली. भानुदासाच्या चरित्रांत एक गोष्ट आहे:--विद्यानगरचा राजा एका देवीची पूजा करीत असे. त्यास भानुदासानें सांगितलें कीं, आपली देवी पंढरपुरांत माझ्या देवाच्या सेवेंत असून झाडूचें काम करीत असते. तेव्हां राजा पंढरपुरास जाऊन पहातो तों खरोखरच तसा प्रकार त्याच्या दृष्टीस आला. दुस-या दोन संतांच्या चरित्रांत लिहिलें आहे :–कालीदेवीस मनुष्यांचे व जनावरांचे बळी देत असत. असला क्रूरपणाचा प्रकार टाकून दे म्हणून श्रीहरीचें नांव घेऊन संतांनीं जेव्हां तिचा निषेध करण्यास सुरवात केली, तेव्हां ती देवी भयानें गर्भगळीत होऊन तिनें असे बळी केव्हांही देऊं नयेत अशी सक्त ताकीद केली. तेव्हां मूर्तिपूजेचा उपयोग या साधुसंतांनीं भक्तिप्रसार करण्याच्या कामी कसा केला हें या गोष्टीवरून दिसून येईल व हा विशेष लक्ष्यांत ठेविला नाहीं तर असल्या महत्वाच्या कामांत या आमच्या धर्मशिक्षकांचा कोणता संबंध होता हें समजणार नाहीं.