प्राचीनकाळीं यूरोपांत सर्व पुस्तकें लाटिनभाषेंत लिहीत असत, म्हणून त्या भाषेस वर्चस्व प्राप्त होऊन लोकांना बरेच त्रासदायक झालें होतें. तसेंच प्राचीन पांडित्याच्या गुलामगिरीसही लोक कंटाळून गेले होते. युरोपांतील सुधारकांनी या त्रासदायक वर्चस्वापासून व दास्यापासून राष्ट्रीय बुद्धीची सुटका केली. हा या सुधारकांनीं मिळविलेला शाश्वत भय सर्व यूरोपचा इतिहास वाचणा-यांस माहीत आहेच. या सुधारकांच्या साहाय्यानें उच्चनीच लोकांस बायबल अगदीं सुगम झालें, तसें आजपर्यंत कधीं झालें नव्हतें व आजपर्यंत विद्यादानाचा अधिकार जो एकट्या धर्माधिका-याकडेच होता त्या अधिकारास अज्जी धक्का बसला. त्याचप्रमाणें हिंदुस्थानांतही स्थिति झाली. साधुसंतांनी जेव्हां आपल्या प्राकृत भाषेंत, लेखनद्वारें व कीर्तनद्वारे लोकांस उपदेश करण्यास सुरवात केली व सरसकट पुरुष व स्त्रिया, ब्राह्मण व शूद्र सर्व लोकांच्यापुढें आजपर्यंत गुप्त असलेलें ज्ञानभांडार जेव्हां धिटाईनें उघडें करून दाखविलें, तेव्हां प्राचीन संस्कृतभाषेंत निष्णात असलेल्या पंडितांना परमावधीचें आश्चर्य वाटलें. परंतु पूर्ण जय मिळावण्यास या साधुसंतांना बराच त्रास व पुष्कळ दुःखें भोगावीं लागलीं. मज्जाव केलेल्या या प्रांतांतून हिंडण्याचें प्रथम साहस ज्ञानदेवानें केलें व लवकरच एकनाथ, रामदास , नामदेव, तुकाराम, वामन पंडित, मुक्तेश्वर , श्रीधर, मोरोपंत इत्यादिकांनी त्याचें अनुकरण केलें. शेवटले चार गृहस्थ धर्मगुरुपेक्षां ग्रंथकर्ते व कवी या नात्यानेंच जास्त प्रसिद्ध आहेत, तरीपण त्यांच्या कवितास्फूर्तीचें मूल एकच.
आतां बायबलप्रमाणें वेदांचें व शास्त्रांचें प्राकृत भाषांतर झालें नाहीं ही गोष्ट खरी; पण असा फरक पडण्यास सबळ कारण आहे. बुद्धधर्मक्रान्ति झाल्यापासून वेद व शास्त्रें यांपेक्षां रामायण, महाभारत, भागवतपुराण व गीता यांच्या ठिकाणींच छोकांची आसक्ति जडली होती. हें या प्राकृत ग्रंथकर्त्यास माहीत होतें, व म्हणूनच त्यांनीं त्या ग्रंथांचें भाषांतर करून सर्व लोकांस ते ग्रंथ सुलभ करून टाकले. एकनाथ व तुकाराम हेच या रणांतील पुढारी व त्यांनाच ब्राह्मणद्वेषाग्नीचा सर्व ताप सोसावा लागला. युरोपांतल्याप्रमाणें त्यांचे ग्रंथ जाळून टाकिले नाहींत, तरी पण पाण्यांत फेंकून द्यावेत अशी आज्ञा झाली होती. अशी गोष्ट सांगतात कीं, जलदेवतांना त्यांचा होणारा नाश आवडला नाहीं, म्हणून ते ग्रंथ पाण्यांत न बुडतां वर जसेच्या तसेच कोरडे राहिले, आणि त्यांची पूर्वीपेक्षांही जास्त ख्याती झाली. वामन पंडित म्हणजे संस्कृत भाषेचें महान् पंडितच. आपल्यासारख्या पंडितास बोलण्यास किंवा लिहिण्यास प्राकृतभाषा नालायख असें त्यांस वाटे-पण जेव्हां रामदासांची व त्यांची संगति जडली, तेव्हां त्यांचे डोळे उघडले व वामनपंडितांस आपला मार्ग चुकीचा आहे असें दिसून आलें. तसेंच रामायणाचें भाषांतर करणारा साल्या रसाळ, त्यास आपल्या अगाध ज्ञानाचा भारी गर्व, पण त्याच्या इष्ट देवतेनें त्यास दृष्टांत दिला कीं, ‘तूं केलेला ग्रंथ नामदेव शिंप्याकडे पाठवून तपासून घे.' या दृष्टांतानें त्याच्या गर्वाचें खंडन झालें. ज्ञानदेवाकडूनही देवांनीं असाच एक चमत्कार घडवून आणला, तो असा. एका रेड्याकडून सर्व वेदांचें पाठांतर करविलें. पाहूं गेलें तर वेदाचा अर्थ समजल्याशिवाय सर्व वेद तोंडपाठ म्हणण्याची आपल्या अंगांत शक्ति आहे, अशी जे बढ़ाई मारतात, त्यांच्या मानसिक शक्तीचें हास्यकारक चित्र या गोष्टीवरून उत्तम दिसून येतें.