दुसरे, युरोपांतील सुधारकांस, मठस्थापना न आवडून पाद्री लोकांनी अविवाहित राहणें, सृष्टिनियमाविरुद्ध स्त्रियांनीं संसारापासून अलिप्त राहून संन्यास वेष घेऊन विरक्त होणें, हें पसंत नव्हतें. त्याचप्रमाणें आमच्या इकडेही सर्व साधुसंतानाही उपास करून देह कष्टविणें ; निरर्थक तप करणें व आजन्म यात्रा करीत राहणें पसंत नव्हतें. तसेंच योगसाधन केल्यापासून योगी लोकांस अद्भुत चमत्कार करण्याची शक्ति येते असें समजून ती शक्ति येण्याकरितां अति कडक नियम व व्रत करून शरीर झिजविणें हें सुद्धां त्यांना रुचेना. भक्ति व योग यामध्यें सुरू झालेली ही स्पर्धा इचें उत्तम उदाहरण म्हटलें ह्मणने गर्वानें फुगलेला चांगदेव व ज्ञानदेव यांची झालेली भेट होय. आपल्या अंगांतील योगशक्तीच्या जोरावर चांगदेव वाघावर बसून हातांत सर्पाचा चाबूक घेऊन आले, तेव्हां ज्ञानदेवानीं त्यास भिंतीवरून जाऊन लाजविलें. त्याचप्रमाणें ज्ञानदेव व नामदेव यांच्यांतील भेटीची हकीकत आहे. योगशक्तीच्यायोगानें ज्ञानदेव आकारानें लहान होऊन त्यांनीं एका खोल विहिरीचें पाणी पिऊन टाकलें. तेव्हां नामदेवानीं आपल्या शक्तीच्या जोरावर ती विहीर तुडुंब भरून टाकिली की सदासर्वदा जाणा-या येणा-यास तहान लागली असतां पोटभरे पर्यंत पाणी पिण्यास मिळावें. महाराष्ट्रांतील साधुसंतांच्या शिक्षणाचा हा जो विशेष भाग तो या गोष्टीवरून फार सुंदर रीतीनें खुलून दिसतो.
कान्होबा पाठकाविषयी एक आख्यायिका अशी आहे. कान्होबा । आपल्या मुलावर अतिशय प्रीति करीत असे. हें काशींतील एका ब्राह्मणास न आवडून त्यानें कान्होबाचा त्याबद्दल निषेध केला. तेव्हां कान्होबानें आपल्या मुलास उचलून जवळच्या विहिरींत टाकिलें; त्याचें त्याला कांहींच वाटले नाहीं. हें पाहून त्या ब्राह्मणास पराकाष्ठेचें आश्चर्य वाटलें. या उदाहरणावरून ब्रह्मचर्यव्रताचा पोकळपणा मात्र जास्त प्रत्ययास येतो. ब्रह्मचर्यव्रतापासून मनाची समता प्राप्त होत नाहीं व मुखदुःखाविषयी औदासिन्यही उत्पन्न होत नाहीं. एकनाथ तर सर्व जन्मभर आपल्या कुटुंबांतच राहिला. त्याचप्रमाणें तुकाराम व नामदेव यांनींही केले. त्यांच्या कमनशीबानें त्यांना त्यांच्या स्वभावास स्वभाव मिळणा-या बायका मिळाल्या नाहींत ही गोष्ट निराळी. तसेंच बोधलेबोवा, चोखामेळा, दामाजीपंत, भानुदास, दोन्ही साधु कुंभार, आणखी पुष्कळ इतर साधु लोक आपल्या कुटुंबांतच राहत होते. ज्ञानदेवाच्या बापानें आपल्या पत्नीच्या सम्मतिशिवाय संन्यास घेतला, म्हणून त्याचा गुरु रामानंद यानें त्यास घरी जाऊन पत्नीशीं आयुष्य घालविण्याची आज्ञा केली, व त्यानें तसें केलेंही. या सर्व गोष्टीवरून त्यावेळच्या साधुसंतांस गृहस्थाश्रमाची पवित्रता फार उत्तम तहेनें अवगत होती असें सिद्ध होतें. संसारत्याग केला म्हणजे मग जगांत काळजी किंवा दुःख कांहीं नाहीं असा जो सर्व लोकांचा गैरसमज होऊन गेला होता, त्यास चांगलें वळण लावण्यास या संतमंडळींनीं आपल्या हातून होतील तितके प्रयत्न केले. ( साध्वी स्त्रियांची ) संतिणींचीं चरित्रें तर याहूनही मनोरंजक आहेत. देवाच्या ठिकाणी त्यांची निष्ठा व दृढविश्वास असल्यामुळें देव त्यांना त्यांच्या दैनिक गृहकृत्यांतही हातभार लावी व त्यांच्या शंकेखोर भ्रतारास त्या बाहेर गेल्या तर कांहीं अंदेशा येईल म्हणून निरनिराळे वेष घेऊन देव त्यांच्याकडून त्यांच्या । घरींच इच्छेप्रमाणें सेवा करून घेई. अशा पुष्कळ गोष्टी या स्त्रियांच्या चरित्रांत सांगितल्या आहेत. आतां या गोष्टींत सांगितल्याप्रमाणें देवाचें येणें जाणें इतकें सवंगसुकाळ होणें चांगलें नाहीं हें खरें; पण त्या गोष्टींच्या मुळाशीं जें उच्च नीतितत्व आहे, त्यानें वरील दोषांचे चांगलेंच परिमार्जन होतें. विवाहित व गृहस्थाश्रमाचें पावित्र्य, या साधुसंतांनीं लोकांच्या नजरेस उत्तम त-हेनें आणून दिलें. पुरातन काळापासून चालत आलेल्या वैराग्यावर नीतितत्वाचा झालेला हा विजय कांहीं साधारण नव्हे.