तथापि अतिशय हृदयद्रावक उदाहरण म्हटलें ह्मणने पंढरपूर येथील देवळांत शिरल्याबद्दल चोखामेळा महार याचा झालेला छळ होय. असें अविचाराचें कृत्य कां केलेंस म्हणून त्यास लोकांनी विचारलें असतां तो ह्मणाला कीं मला देवानेंच देवळांत ढकलीत आणलें. मीं आपण होऊन काहीं आलों नाहीं. नंतर तो देवळांतील पुजा-यास उद्देशून बोलला “ भक्ति किंवा विश्वास जर नाहीं तर उच्च जातींमध्यें जन्म होऊन काय उपयोग? किंवा धर्मविधि आणि विद्वत्ता यांचा काय उपयोग ? मनुष्य नीच जातींतील असेना, त्याचें अंतःकरण जर खरें आहे, ईश्वरावर प्रीति आहे, सर्व प्राण्यांस आत्मवत् मानितो, आपल्या व दुस-याच्या मुलांमध्यें भेद करीत नाहीं आणि खरें बोलतो, तरच त्याची जाति पवित्र होय. ईश्वर त्यावर नेहमीं संतुष्ट असतो. मनुष्याचा ईश्वराचे ठायीं जर विश्वास आहे व मनुष्यमात्राविषयीं जर प्रीति आहे, तर त्याच्या जातिविषयीं विचार करूं नका. आपल्याठायीं प्रीति व भक्ति असावी अशी देवाची इच्छा आहे व म्हणुन तो त्यांच्या जातिविषयीं काळजी करीत नाहीं." या उदात्त ज्ञानोपदेशानें त्या हटवादी ब्राह्मणांवर कांहींच परिणाम झाला नाहीं. उलट त्यांनी तेथील मुसलमान कामगाराकडे फिर्याद दिली व त्यानें बायबलांतील “पायलेट " प्रमाणें चोखामेळ्यास त्याच्या मुसक्या आंवळून त्यास बैलाकडून ओढीत न्यावें व अशा रीतीनें त्याचें हालहाल करून त्यास मारून टाकावे अशी शिक्षा दिली. पण देवानें मोठ्या चमत्कारिक रीतीनें त्यास संकटांतून सोडविलें व जुलमी लोकांची निराशा केली. कारण ते बैल जाग्यावरून अगदीं हालेनात. ह्याचसंबंधानें बहिरामभटाची गोष्टसुद्धां मजेशीर आहे. शास्त्री असून ब्राह्मणधर्मात त्यास शांति मिळेना, ह्मणून त्यानें मुसलमानीं धर्म स्वीकारला, कीं एकेश्वरी मतानें तरी आपल्या अंतःकरणाचें समाधान होईल. पण इच्छिलेली शांति मिळत नाहीं ह्मणून पुन्हा ब्राह्मण धर्मांत आला. तेव्हां ब्राह्मण व मुसलमान दोघेही या धर्मपालटाबद्दल त्यास दोष देऊं लागले, परंतु आपण हिंदुही नाहीं अथवा मुसलमानही नाहीं असें तो म्हणूं लागला. बहिरामभटानें ब्राह्मणांस असा सवाल केला कीं, मी मुसलमान झालों आहें, माझा सुंता केला आहे, मला ब्राह्मण ह्मणायचें असेल तर खुशाल ह्मणा, व मुसलमानांस म्हणाला, माझ्या कानांस भोंकें आहेत तीं बुजवा. (ह्मणजे आपण हिंदु आहोंत मुसलमान नव्हे असें तो ह्मणाला.) हिंदुधर्म स्वीकारलेले महंमदी लोक, शेख महमद याचे अनुयायी या नांवानें प्रसिद्ध असलेले, रमजानउपोषणव्रतें व एकादशीउपोषणव्रतें अद्याप पावेतों. पाळीत आहेत व मक्केस तसेंच पंढरपुरास यात्रे करतां जात आहेत. कबीर, नानक, व माणिकप्रभू यांच्यासारखे महाप्रसिद्ध साधु लोक आहेत, त्यांस हिंदु लोक आपले व मुसलमान लोक आपले असें मानतात व दोघेही त्या साधूंना भजतात. या साधूंच्या चरित्रांवरून मनुष्याच्या पारमार्थिक स्वभावाची कल्पना फार उदात्त झाली आहे, तसेंच जातिभेदाची गांठही फार सैल झालेली आहे, हें स्पष्टपणें दाखविण्यास वरील उदाहरणें बस्स आहेत.
या उदात्त शिक्षणाचा परिणाम पाहूं गेलें तर असा दिसून येतो कीं, त्यायोगानें धर्मसंबंधी बाबतींत ज्ञातिमहत्वास मुळींच थारा मिळाला नाहीं. फक्त सामाजिक गोष्टींत मात्र तिचें महत्व राहिलें आहे व तेंही फारच कमी आहे. दक्षिणहिंदुस्थानांतील ब्राह्मण, त्यांचे जातिसंबंधानें चमत्कारिक गैरसमज--ब्राह्मण जाणाच्या मार्गावरून चांडाळ गेला तर, त्याची सावली पडली तरी देखील, तो रस्ता अपवित्र होतो म्हणून त्याच्या सावलीचा देखील कंटाळा करणें- याची व दक्षिणमहाराष्ट्रांतील लोकांचा या सर्व गोष्टींत दिसून येत असलेला उदासीनपणा याची तुलना करून पाहिली तर हें सहज दिसून येतें. हें औदासिन्य, प्रतिवार्षिक वारक-याच्या मेळ्यांत आणि शेवटच्या दिवशीं होणा-या गोपाळकाल्याचे वेळीं जो सर्वास एकसारखा आनंद होतो त्यांत विशेष दिसून येतें. पुजारी ह्मणने ईश्वर व मनुष्य यांच्यामधील मोक्षप्राप्ति करून देणारें अवश्य साधन आहे, ब्राह्मणजातीचें वरिष्ठत्व ईश्वरनिर्मितच आहे, त्यांची बाकीच्या जातींनीं सेवा व पूजा केली पाहिजे, इत्यादि विचार यूरोपांतल्याप्रमाणेंच हिंदुस्थानच्या या भागांतसुद्धां बाजूस पडले. आणि सर्व दर्जाच्या स्त्रीपुरुषांस असें वाटूं लागलें कीं,हीन कुलांत जन्म झाला तरी ईश्वरावर दृढभक्ति व प्रीति असली ह्मणने मोक्ष मिळण्यास कांहींही अडचण नाहीं.