वर ह्मटल्याप्रमाणें त्यांच्यौपकीं जवळ जवळ निम्मेशिम्मे ब्राह्मणांशिवाय इतर जातींतील होते. कांहीं कांहीं तर खरोखरच हलक्या जातींतील होते. ब्राह्मणसुधारकापैकीं पुष्कळांच्या वंशपरंपरागत शुद्धत्वास कलंक लागून त्यायोगें ते कोणताही कृत्रिम निर्बेध नको असें ह्मणण्यास तयार झाले. ज्ञानदेव, त्यांचे बंधु व बहीण मुक्ताबाई यांचा जन्म त्यांचा बाप विरक्त होऊन संन्यासी झाल्यावर झाला. त्याचा धर्मगुरु रामानंद यांस जेव्हा समजलें की, संन्यासआश्रम घेण्यास त्याच्या बायकोची परवानगी नव्हती, तेव्हां त्यानें ज्ञानदेवाच्या बापास आपल्या-- गांवी जाऊन बायकोजवळ राहणेस आज्ञा केली. अशा प्रकारें त्या संन्याशास झालेल्या मुलांस त्या जातींतील सर्व लोक अगदीं हलक्या जातींतील समजून त्यांचा तिरस्कार करीत व ब्राह्मणांनीं तर योग्य कालीं त्यांचें मौंजीबंधनसुद्धां करण्याचें नाकारिलें. अशा अज्ञात स्थितींत तीं मुलें जन्मभर राहिलीं; पण लोक त्यांच्या ज्ञातिहीनत्वाकडे लक्ष न देतां उलट त्यांचा मानच करूं लागले. दुसरा साधु मालोपंत याचा एका नीच जातींतील मुलीशीं विवाह झाला होता. तिची जात लग्न होईपर्येत कोणासही कळली नाहीं; पण नव-यानें तिचा त्याग न करितां फक्त तिच्याशीं व्यवहार करण्याचें वर्ज केलें. आणि ती मेल्यानंतर जनरूढीस अनुसरून तिची उत्तरक्रिया करूं लागला. त्या वेळीं एक अद्भुत चमत्कार दृष्टीस पडला. त्यायोगें त्याचे जे कट्टे शत्रू होते त्यांचीसुद्धां खात्री झाली कीं हे दोघेही जन्मतःच परमपवित्र होते. त्याचप्रमाणें जयरामस्वामीचा गुरु कृष्णदास याचा एका नापीत कन्येशीं विवाह झाला व नंतर तिचें हीनजातीत्व कळून आलें, तथापि त्या मनुष्याच्या पवित्र आचरणाचा असा परिणाम झाला कीं, त्याचा पुष्कळ छळ होऊनही त्या वेळच्या श्रीजगद्गुरु शंकराचार्यांनींही त्याच्या विरुद्ध ब्र देखील काढला नाहीं. एकनाथ जातिभेदास अगदीं कमी महत्व देत होता ही गोष्ट महशूर आहेच. त्यानें एका बुभुक्षित महारास भोजन घातलें आणि नंतर जेव्हां त्यास वाळींत टाकिलें आणि प्रायश्चित्त घेण्याकरितां ह्मणून तो नदीवर गेला, तोंच एक चमत्कार झाला. त्याच्या योगानें असे सिद्ध झालें की, एका बुभुक्षित महारास अन्न देण्याचें पुण्य सहस्र ब्राह्मणांस भोजन घालून मिळणा-या पुण्यापेक्षां जास्त आहे. कारण कीं पहिल्या पुण्यानें एका महारोग्याचा रोग बरा झाला व दुस-याने कांहींच परिणाम झाला नाहीं. त्याच प्रकारचा एक चमत्कार पुष्कळ साधुसंतांनी केलेला विशेषेंकरून ज्ञानदेव, एकनाथ ह्यांनीं केलेला सर्वास महशूर आहेच. तो असा–ज्ञातिनियम मोडल्याबद्दल आह्मीं तुमच्या घरीं श्राद्धास बसत नाही असें ज्यावेळेस ब्राह्मणांनी म्हटलें, त्यावेळेस या साधूंनीं त्या हट्टी ब्राह्मणांच्या मृत वाडवडिलांस स्वर्गातून पृथ्वीवर आणलें व तुमचा पोकळ जात्यभिमान अगदीं निरुपयोगी आहे अशी त्यांच्या धर्मलंड पुत्रांची खात्री करून त्यांस लाजविलें. नामदेवाच्या चरित्रांत त्याच्या पंढरपुरच्या देवानें ब्राह्मणांस भोजनास बोलावण्यास नामदेवास सांगितलें व स्वतः त्या साधूबरोबर त्यानें भोजन केलें. तेव्हां त्यांस लोकांनीं वाळींत टाकिलें. त्यावेळेस ज्ञानदेव साक्षात् हजर असून त्यानें त्या दुष्ट ब्राह्मणांस खालील उपदेश केला.
तो म्हणाला, “ देवाला कोणी उच्च व नीच असा नाहीं; त्याला सर्व सारखेच आहेत. मी उच्च कुलांतील, माझा शेजारी नीच कुलांतील, असा विचार कधींही मनांत आणूं नका. नीच व उच्च हे दोघेही गंगेत स्नान करितात म्हणून गंगानदी कधीं अपवित्र होत नाहीं; किंव श्वासोच्छवास करतात म्हणून हवा बिघडत नाहीं ; किंवा दोघेही पृथ्वीवर हिंडतात ह्मणून पृथ्वी कांहीं स्पर्श करण्यास अयोग्य होत नाही.”