संतांचीं सर्व चरित्रें पाहिलीं तर असें दिसतें कीं, त्यांच्या अंगी, मेलेल्यास जिवंत करणें, आजारी मनुष्यास बरें करणें, क्षुधार्तास अन्न देऊन संतुष्ट करणें, इत्यादि अघटित कृत्यें करण्याचें अद्वितीय व अद्भुत सामर्थ्य असतें अशी लोकांची कल्पना असते. त्याप्रमाणें महाराष्ट्रांतील संतचरित्राविषयींहि गोष्ट आहे. परोपकार हें जें त्यांचे व्रत तें पाळण्यांत त्यांना अमानुष किंवा दैविक शक्तीपासून साहाय्य मिळतें, अशा ज्या । गोष्टी सांगतात, त्या सध्यांच्या काळीं म्हणने, तर्कशास्त्राच्या कसोटीस ( उतरल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर भरंवसा ठेवावयाचा नाहीं, अशा प्रवृत्तीच्या कालांत कोणास संमत असोत वा नसोत. : की। साहेबांनीं ह्मटल्याप्रमाणें ज्यावेळेस लोक कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यास सहज तत्पर असतात, त्यावेळेस असे अद्भुत चमत्कार नेहमीं होतात असें ह्मणण्याकडे व प्रतिपादण्याकडे लोकांची प्रवृत्ति होण्यास अनुकूल असें एक लोकमताचें वातावरण तयार होत असतें. साधुसंतांकडे खुद्द पाहिलें तर आपल्या अंगांत अद्भुत शक्ति आहेत असा ते कधीं बाणा बाळगीत नाहींत. ते ह्मणजे अगदीं लीन, सहनशील व ईश्वरावर सर्वस्वी भरंवसा ठेऊन राहिलेले पुरुष होत. हा त्यांचा दृढविश्वास खरोखर अस्थानीं नमून , सर्वथा यथार्थ आहे असें पुष्कळ वेळां त्यांचे प्रत्ययास आलें. ह्या परमेश्वरश्रद्धेच्या फलद्रूपतेबद्दल त्यांचा त्यांसही अचंबा वाटे. नैतिक दृष्ट्या या सर्व संतचरित्रांचें महत्व त्यांच्या या अचाट कृत्यावर नाहीं, तर नीतितत्वांचा खरेपणा व मनुष्याच्या उदात्त पारमार्थिक जीविताची सत्यता सिद्ध करून देण्यास त्यांच्या चरित्रांचा जो उपयोग झाला त्यांवर आहे. त्यांच्या चरित्राच्या या स्मरणीय स्वरूपाशींच पुढील इतिहासभागाचा संबंध आहे, आणि त्यांनी जें कार्य केलें तें केवळ अमूल्य व सर्वतोपरि उदात्त होतें हे आह्मीं दाखविणार आहों.
यूरोप खंडांतील धर्मसंशोधनाची चळवळ आणि तत्कालीन आमच्या या महाराष्ट्रांत झालेल्या साधुसंतांचे लेख व शिक्षणपद्धति यांनीं प्रतिबिंबित झालेला झगडा या दोहोंत एक प्रकारचें विशेष साम्य दिसून येतें. सोळाव्या शतकांतील युरोपस्थ सुधारणेच्छु, पाद्री लोक व त्यांचा मुख्य गुरु जो रोमचा धर्माध्यक्ष ( पोप ), यांचा अधिकार तुच्छ करूं लागले. या पाद्यास व त्यांच्या पोपास जो अधिकार प्राप्त झाला होता तो केवळ प्राचीन कालापासून चालत आला आहे; आणि या अधिकारापासूनच रोमन देशाची धुळधाण करणा-या रानटी लोकांच्या समूहाची सुधारणा होऊन त्यांना माणूसपणा आला असें ते पाद्री ह्मणत. कालांतरानें आपण चाकर आहोंत हें विसरून, धनी आपण, राज्यकर्ते आपण, ऐहिक पारमार्थिक सर्व शक्ति आपल्या ठायीं आहेत, आणि ईश्वर व मनुष्य यांच्यामधील मध्यस्थही आपणच असें ते ह्मणूं लागले. या मध्यस्थपणास त्यांनी अनेक धर्मविधि व संस्कारांचे कुंपण घातलें. त्याचा परिणाम असा झाला कीं, कालांतरानें पुष्कळ दुष्ट आचार प्रचारांत येऊन त्यायोगें लेकांचें त्यांचेवरील प्रेम नाहीसें झालें. कपटपटु पोप व त्यांचे व्यसनासक्त कार्डिनल्स (मार्गोपदेशक) यांची ऐहिक सत्ता राखण्या- करितां कराच्या रूपानें, धर्मादाय ह्मणून नव्हे,' पिटरस्पेन्स' नांवाचा कर ज्या अधिकारी वर्गानीं सुरू केला व ‘इंडलजन्सीस ' प्रसिद्ध केले त्या अधिकारीवर्गाविरुद्ध ल्यूथर जेव्हां भांडूं लागला त्यावेळेस या दुष्ट आचारांचा कळस झाला होता. पश्चिम हिंदुस्थानांतील धर्मसुधारणेंचें साम्य याच गोष्टींत दिसून येतें. प्राचीन अधिकार व प्राचीन संप्रदाय हिंदुस्थानांत, महत्वाकांक्षी बिशप व क्लर्जी यांच्या ठिकाणीं नव्हे, तर ब्राह्मण जातींमध्यें इतर खिळून गेले होते. व या ब्राह्मण जातीच्या प्रभुत्वाविरुद्ध साधुसंत मोठ्या धैर्यानें झगडत होते. मनुष्याच्या आत्म्याचें उच्चत्व, त्याचा जन्म अगर त्याची समाजांतील स्थिति यांजवर अवलंबून नाहीं असें ते प्रतिपादन करीत. असा सिद्धांत काढण्यास धर्मोपदेशकांस त्यांचा आयुष्यक्रम व त्यांचें शिक्षण सहज कारणीभूत झालें.