जिल्ह्याच्या व गांवच्या जमीनदारांच्या मदतीवांचून खुद्द सरकारतर्फे जमिनीचा महसूल वसूल करण्याची शिवाजीची पद्धत त्याच्या वंशजांनीं अगदीं पूर्णपणें चालविली होती व पेशव्यांच्या भर अमदानींत ह्मणजे नाना फडणीस यांच्या मृत्यूपर्यंत मक्त्यानें वसूल घेण्याच्या पद्धतीना अवलंब करण्यांत आला नाहीं. फक्त शेवटच्या राव बाजींच्या कारकीर्दीत मात्र खुद्द महाराष्ट्रांतही मक्त्यानें वसूल घेण्याची चाल पडली. माळवा, गुजराथ व उत्तर हिंदुस्थानांतील मराठ्यांच्या ताब्यांतील इतर प्रांत यांत मात्र ही मक्त्याची चाल ब-याच मोठ्या प्रमाणांत चालू होती. कारण तिकडे मराठी सत्तेची स्थापना ह्मणण्यासारखी स्थिर झालेली नव्हती. ह्या वसुलाच्या पद्धतींत मात्र शिवाजीच्या वंशजांनी त्याचें उत्तम प्रकारें अनुकरण केलें; पण मराठे, ब्राह्मण व प्रभु या तीन जातींत राज्यांतील अधिकार वांटून देण्यांत त्यानें जी दक्षता ठेविली होती, तिकडे त्याच्या वंशजांचे लक्ष गेल्याचें दिसत नाहीं. शिवाजीच्या कारकीर्दीत ज्या प्रभु जातीच्या लोकांनीं अलौकिक कृत्यें केलीं, त्यांचे वंशज बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीपासून अगदीं मागें पडत चालले. फक्त सखाराम हरि ह्मणून एक प्रभु गृहस्थ रघुनाथराव पेशव्याच्या हाताखाली लप्करांत एक बडा अम्मलदार होता, व त्याचें नांव मात्र ह्या वेळच्या इतिहासांत ऐकूं येतें. तथापि बडोदा व नागपूर या संस्थानांत ह्या जातींतील लोकांकडे मुत्सद्यांची व सेनापतीचीं कामें देण्यांत आलेलीं होतीं. ब्राह्मणांसंबंधानें पहातां कोंकणस्थ ब्राह्मणांस शिवाजीच्या वेळी बिलकुल थारा नव्हता, अशी एक समज आहे. पण ब्राह्मणांतील तिन्ही वर्णीतील लोकांस शिवाजीने सुभेदार अगर किल्ल्यावरील सेनापति नेमिलें होतें असें बखरकारांनी लिहून ठेवलें आहे. शिवाजी व त्याचे दोन पुत्र संभाजी व राजाराम यांच्या कारकीर्दीमध्ये देशस्थ ब्राह्मण साहजिकच पुढें आलेले होते. शाहूच्या कारकीर्दीत पेशवे स्वकर्तबगारीनें महत्वास चढले आणि तेव्हांपासून हे पारडें फिरलें. पुढे रघुनाथरावदादा व माधवराव पेशवे यांच्यामध्यें आपसांत तंटे सुरू झालें, तेव्हां मुख्य मुख्य देशस्थ जहागिरदारांनी राघोबाची तरफदारी केली. तेव्हांपासून तर पेशवाई राज्यांत देशस्थांचें वजन अगदींच कमी झालें.
लष्करी अधिकारासंबंधानें पाहतां ते सर्वस्वी मराठ्यांनीच व्यापून टाकिला होता असें नाहीं, मात्र सेनेंतील बहुतेक अम्मलदार व शिपाई मराठा जातीचे होते. मराठा सरदारांप्रमाणेंच शिवाजीचे ब्राह्मण सरदारही मोठे पराक्रमी होते व हीच स्थिति पहिल्या पहिल्या पेशव्यांच्या कारकीर्दीपर्यंत चालू होती. मराठ्यांचे अति बलाढ्य असे सेनापति पहिल्या बाजीरावाच्या तालमींत तयार झालेले होते. बाजीरावाच्या हाताखालीं लढणा-या मोठमोठ्या मराठ्या सरदारांनीं दूरदूरच्या प्रदेशांत स्वतंत्र राज्यें स्थापिलीं, व जेव्हां खुद्द सातारच्या गादीसही दहशत बसेल इतकी त्यांची सत्ता वाढत चालली, तेव्हां त्यांच्याशीं सामना देण्यास पेशव्यांनीं दक्षिणेंत ब्राह्मण सरदार तयार करण्याचें राजकीय धोरण बांधिलें. आणि तेव्हांपासून पटवर्धन, फडके, रास्ते, गोखले ह्या घराण्यातील ब्राह्मणवीर पुढें सरसावले; पण लढाऊ कामांत तरबेज झालेल्या शिंदे व होळकर ह्यांच्या सैन्यापुढें त्यांच्यानें कधीही टिकाव धरवला नाहीं. मराठ्यांमध्यें अशा त-हेनें वैमनस्य माजून गेलें तें इतर गोष्टींबरोबर सर्व महाराष्ट्रराज्याच्या नाशास कारण झालें.