शिवाजीनें घातलेलें व चांगल्या रीतीनें चालविलेलें वळण सोडून राज्यांतील बडे बडे हुद्दे वतनाप्रमाणें वंशपरंपरेनें चालविण्याची पद्धत सुरू करण्यांत त्याच्या वंशजाकडून दुसरी मोठी चूक झाली आहे. खुद्द पेशव्यांचें पद जर वंशपरंपरेने चालू लागलें, तर इतर अधिका-यांचीही तशीच स्थिति झाली यांत आश्चर्य नाहीं. बापाची नैसर्गिक कर्तृत्वशक्ति व बुद्धिमत्ता ही मुलाच्या अंगीं परंपरेनें येतेच असा नियम नसल्यामुळें, पुष्कळ अधिकार कर्तत्वशून्य व अयोग्य अशा लोकांच्या हातीं जाऊन सहजच राज्यास हळू हळू उतरती कळा लागत चालली. पेशव्यांच्या चार पुरुषांस वंशपरंपरेच्या हक्कानें पेशवेपद प्राप्त झालें; पण इतर मुत्सद्यांस आपआपले अधिकार आपल्या कुटुंबांत चालवून घेण्याचा तो हक्क नव्हता. अगदीं लहान हुद्यावरील लोकसुद्धां स्वतःच्या कर्तबगारीनें मोठ्या योग्यतेस चढले; पण त्यांचा प्रधानमंडळांत प्रवेशच होत नसे. उदाहरणार्थ, नाना फडणीस हा निव्वळ फडणिशीचें काम करणारा कारकून, पण त्याची मुख्य प्रधान होण्याची महत्वाकांक्षा होती. तसेंच महादजी शिंदे म्हणजे दुस-या प्रतीचा सरदार ; पण स्वतःच्या शौर्यानें आपल्या वेळच्या लोकांत अत्यंत बलाढ्य होऊन बसला. ह्या दोघां व यांच्याच योग्यतेच्या इतर लोकांचा मुत्सद्दीमंडळांत प्रवेश झाला नाहीं. आणि एकजण दुस-यास अधिकारानें अगर कपटानें खालीं पाड.. ण्याची खटपट करूं लागला. लष्करावरील बलाढ्य सेनापतीनीं आपआपल्या प्रांतांत स्वतंत्र राज्यें स्थापन करण्यास सुरुवात केली. आपल्या मर्जीस येईल त्याप्रमाणें ते इतरांशीं युद्ध अगर तह करूं लागले. अष्टप्रधानांकडून राज्यकारभार चालविण्याची व्यवस्था तींत काल व परिस्थिति यांस अनुरूप थोडा बदल करून चालू ठेविली असती व शिवाजीच्या पश्चात् दोन पिढ्यांच्या कारकीर्दीत वंशपरंपरेनें अधिकार देण्याच्या चालीस थारा दिला नसता, तर वर सांगितलेला अनिष्ट प्रकार बहुतेक टाळतां आला असता.
आपल्या पराक्रमानें मोठमोठे प्रांत जिंकणारांस तेच प्रांत जहागिरीदाखल बक्षीस द्यावयाचे नाहींत, ह्या शिवाजीच्या तत्वाचें उल्लंघन ही सर्वात मोठी चूक झालीं. शाहू राज्यावर येण्याच्या पूर्वी ज्या गोष्टी घडून आल्या, त्यामुळें शाहूस त्या तत्वाचें उल्लंघन करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतें. संभाजीच्या मृत्यूनंतर बहुतेक महाराष्ट्रप्रांत पुनः मोंगलांच्या ताब्यांत गेला, आणि त्याचा भाऊ राजाराम व त्याचें साहाय्यकारी मंत्रिमंडळ ह्या सर्वांस दक्षिणेचा मार्ग सुधारणें भाग पडलें. त्यांस राज्य स्थापण्याचें सर्व काम पुनः आरंभापासून सुरूं करावे लागलें व त्यावेळी जे लोक स्वपराक्रमानें पुढें आले, त्यांस त्यांच्या मर्जीप्रमाणें वागू देणेंच इष्ट होतें. अर्थात् या बाबतींत राजारामास अगर त्याच्या मंत्र्यांस दोष देणें वाजवी होणार नाहीं. राजारामाच्या वेळचा आणीबाणीचा प्रसंग शाहूच्या कारकीर्दीच्या आरंभापर्यंत जोरांत होताच. पण पुढें महाराष्ट्राच्या गादीवर शाहूची कायमपणें स्थापना होऊन, सर्वत्र स्थिरस्थावर झाल्यानंतर, ज्यावेळीं राज्य वाढविण्यासाठी मराठ्यांच्या मोहिमा सुरूं झाल्या, त्यावेळेस ही जहागिरी देण्याची पद्धत बंद करण्यास चांगली संधि होती. पण ह्याच वेळीं प्रत्येक शूर सरदारास स्वतःच्या मर्दुमकीवर प्रांत काबीज करून जहागीर मिळविण्याची मुभा देण्यात आली, व खरी -चूक ह्याच वेळीं झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. पिलाजी व दमाजी गायकवाड हे गुजराथ प्रांताचे राजे बनले. नागपूरकर भोसले आपल्या प्रांतांत प्रबळ झाले, व शिंदे, होळकर आणि पवार यांनीं माळवा प्रांतांत व उत्तर हिंदुस्थानांत आपआपलीं राज्यें स्थापिलीं. हे सर्व सरदार आपआपल्या जहागिरीपैकीं कांहीं भाग खंडणीदाखल महाराष्ट्रांतले प्रमुख अधिकारी जे पेशवे यांस देत व एवढ्यापुरतेंच ते सातारच्या गादीचें वर्चस्व फक्त नांवास मात्र कबूल करीत. ह्या वर सांगितलेल्या महागिरी जेव्हां वंशपरंपरेनें चालूं लागल्या, तेव्हां महाराष्ट्राच्या व्यवस्थित सत्तेंत पूर्ण अव्यवस्था होऊन गेली. ज्यांनीं ह्या जहागिरी प्रथम मिळविल्या, त्यांच्या ठायीं स्वामिभक्ति वास करीत होती; परंतु आपल्या खासगी जहागिरींत पेशव्यांनीं अगर सातारच्या राजांनीं हात घालणें ही गोष्ट, त्यांच्या वंशजांस आवडेनाशी झाली. अशाप्रकारें शिवाजीच्या ह्या महत्वाच्या तत्वाचें उल्लंघन सर्व महाराष्ट्राच्या नाशास कारणीभूत झालें.