शिवाजीच्या पश्चात् मराठी राज्याचा विस्तार ‘ स्वराज्या' च्या मर्यादेच्या बाहेर इतका वाढला की, पूर्वेकडे कटकपर्यंतचा मुलूख, पश्चिमेकडे काठेवाडपर्यंतचा मुलूख, उत्तरेकडे दिल्लीपर्यंतचा मुलूख व दक्षिणेकडे तंजावरपर्यंतचा मुलूख यांचा त्यांत समावेश झाला. अशावेळीं शिवाजीनें घालून दिलेल्या पद्धतीपैकीं काहीं गोष्टी पूर्णपणें चालू ठेवणें शक्य नव्हतें हे खरें आहे. शिवाजीच्या राज्यांत ह्मणने खुद्द महाराष्ट्रांत राजा, प्रजा, सैन्यांतील लोक व अधिकारी हे सर्व एकाच जातिधर्माचे असून शिवाय राजभक्तीच्या सर्वसाधारण भावानें त्या सर्वांचा अगदीं एकजीव झालेला होता. ही स्थिति पुढें तशीच टिकणें शक्य नव्हतें. कारण राज्याचा विस्तार हिंदुस्थानाच्या दूरदूरच्या प्रदेशांत होत गेल्यामुळें जेथील जित लोक जेत्यापासून सर्व बाबीमध्यें अगदीं भिन्न होते व पुष्कळवेळां लप्करांतही पोटभरू लोकांचा भरणा झाल्यामुळें लष्करी अम्मलदारांविषयीं अगर राजाच्या प्रतिनिधीविषयीं त्यांच्या मनांत पूज्य बुद्धि व प्रेमभाव वसत नसे. यास्तव शिवाजीची वर सांगितलेली पद्धति हिंदुस्थानांतील सर्व ठिकाणच्या प्रदेशास लागू करतां येण्याजोगी नव्हती यांत आश्चर्य नाहीं. डोंगरी किल्ले व त्यांच्या आसपासचा सपाट प्रदेश यांच्यासंबंधाचें महत्त्व फक्त महाराष्ट्रापुरतेंच होतें व गुजराथ अगर माळवा प्रांताच्या सपाट प्रदेशांत व खुद्द महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांत राज्यपद्धतीचा पाया या नात्यानें त्याचें विशेषसें महत्व वाटण्याजोगें नव्हतें. तसेंच जमिनीचा महसूल करण्याचें काम खुद्द सरकारतर्फे करणें व रयत आणि जमीनदार ह्यांचे हक्क काढून घेणें ही पद्धतही ह्या दूरदूरच्या प्रांतांस लागू पडण्याजोगी नव्हती. कारण ती चाल त्या प्रांतांतील पूर्वीच्या राज्यपद्धतीस अगदीं विरुद्ध होती. करितां ह्या व ह्याच प्रकारच्या दुस-या कांहीं बाबींत शिवाजीच्या वंशजांनीं शिवाजीच्या पद्धतीचें उलंघन केलें ह्यावद्दल त्यांस दोष देतां येणार नाहीं. तथापि वरील बाबीखेरीज इतर गोष्टींत त्यांनीं त्या पद्धतीचा अवलंब केला नाहीं ही त्यांची मोठी चूक झाली यांत संशय नाहीं. वे ह्या चुकीचें कारण दुसरें कोणचेंही नसून, त्यांच्या वंशनापैकीं कोणासही शिवाजीच्या पद्धतीची उपयुक्तता कळून आली नाहीं व ज्यानें त्यानें आपआपल्या वेळेच्या सोईप्रमाणें हवेतसे राज्यकारभारांत फेरफार केले, आणि त्यायोगानें एक जीव झालेल्या राष्ट्रांत अव्यवस्था व गोंधळ होऊन सर्वत्र अव्यवस्था माजून राहिली व राष्ट्रावर येणा-या पहिल्याच अरिष्टाबरोबर नष्ट होईल इतकें तें डळमळींत झालें.
अष्टप्रधानांच्या मंडळाकडून राज्यकारभार चालविण्याची चाल शाहूच्या पहिल्या अमदानींत चालू होती, परंतु इतर मुत्सद्यांस मागें टाकून जसजसे पेशवे बळावत चालले तसतशी ती हळू कमी होत चालली व अखेरीस पुणे येथें पेशव्यांनीं आपली गादी स्थापिल्यावर तर ती अगदींच नाहींशी झाली. पेशव्याच्या खालच्या प्रतीचे पंतअमात्य व पंतसचिव ह्या मुत्सद्यांच्या शाहूराजाच्या पश्चात् कोठें मागमूसही लागत नाहीं; ते मराठी दरबाराचे निव्वळ जहागीरदार होउन बसले. त्यांच्या जागेवर दुसरे लोक नेमण्याची पेशव्यांनीं काळजी घेतली नाहीं व तसें करण्यास त्यांस धैर्यही झाले नाहीं. तर सर्व अधिकार त्यांनींच बळकाविला. पेशवे हे स्वतःच सेनापति, जमाखर्ची प्रधान व परराष्ट्रीय प्रधानांची कामें पाहूं लागले. अशाप्रकारें सर्व राज्यसत्ता एकाच अधिका-याच्या ताब्यांत गेल्यामुळें, शिवाजीच्या पद्धतीप्रमाणें राज्यकारभार चालविला असतां राष्ट्रांत जो जोम राहिला असता, तो नाहींसा झाला यांत नवल नाहीं.