फक्त देवस्थान व धर्मादाय यांच्या खर्चाकरितां देणगीदाखल शिवाजीनें कांहीं जमिनींचीं उत्पन्नें दिलेलीं असत. हीं इनामें सार्वजनिक मालमत्ता अमून ती धारण करणा-या लोकांकडे लष्करी पेशाचा अधिकार नसत्यामुळें, मुख्य राज्यास त्यांच्यापासून साधारणपणें अपाय होण्याचा फारसा संभव नव्हता. धर्मादायाच्या बाबींत, विद्येस उत्तेजन देण्यास्तव दक्षिणा देण्याची चाल शिवाजीस फार पसंत होती. हल्लीं विद्वत्तेची परीक्षा घेऊन संभावना देण्याची जी चाल आहे, तिचीच ही जुनी आवृत्ति । होती. संपादन केलेल्या विद्येच्या महत्वाच्या व बाहुल्याच्या प्रमाणावर दक्षिणा देण्याचें मान ठरविण्यांत येत असे. त्यावेळीं विद्या पढविण्याकरितां सार्वजनिक शाळागृहें नव्हतीं. परंतु खासगी गुरु आपआपल्या घरांमध्यें शिष्यांस पढवीत असत व गुरु आणि शिष्ये ह्यांस । सरकारांतून वार्षिक उत्पन्न योग्य प्रमाणांत मिळून त्यावर त्यांचा निर्वाह होई. शिवाजीच्या अमदानींत संस्कृत भाषेचें अध्ययन अगदीं लुप्तप्राय झालें होतें. परंतु शिकण्यास उत्तेजन देण्याची जी त्याची पद्धति होती तीमुळें, दक्षिणेंतील पुष्कळ विद्यार्थी काशीकडे अध्ययनास जात व सुविद्य होऊन लोकांकडून सन्मान व राजाकडून धन मिळवून स्वदेशीं परत येत. ह्यामुळें विद्यानैपुण्याबद्दल महाराष्ट्राची सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. संभाजीस मुसलमानांनीं धरून नेल्यानंतर हे दक्षिणा देण्याचें काम तळेगांवच्या दाभाड्यांनीं हातीं घेतलें. पुढें पेशव्यांच्या कारकीर्दीत दाभाड्याच्या घराण्यास जेव्हां उतरती कळा लागली, तेव्हां तें काम खुद्द पेशवे यांनी चालविलें व दक्षिणेची रक्कमही सालोसाल वाढत चालली, ती इतकी कीं, पेशव्यांच्या हातांतून राज्यसत्ता इंग्रजांच्या हातीं आली त्यावेळीं ही रक्कम ५ लाखांपर्यंत गेली होती.
वर दिलेल्या हकीकतीवरून असे दिसून येईल कीं, शिवानीची राज्यपद्धति, त्याच्या पूर्वीच्या व त्याच्यानंतरच्या राज्यपद्धतीपासून कित्येक महत्वाच्या बाबींत अगदीं भिन्न होती. त्या बाबी पुढें दिल्याप्रमाणें :--
(१) डोंगरी किल्ले ज्यावर त्याच्या राज्यपद्धतीची इमारत रचलेली होती त्यांस त्यानें दिलेलें महत्व.
(२) एकाच घराण्यांत वंशपरंपरेनें राज्यांतील बडा अधिकार ठेवण्याच्या पूर्वापार चालीचें उल्लंघन.
(३) लष्करी अगर मुलकी कामगारास कामगिरीबद्दल जमिनी जहागिरी देण्याची बंदी.
(४) जमिनीच्या महसुलाचें काम जिल्ह्यांतील अगर गांवांतील जमिनदाराकडून काढून खुद्द सरकारी नोकराकडे सोपविण्याची चाल.
(५) मक्तयानें वसूल घेण्याची बंदी.
(६) अष्टप्रधानांची स्थापना व त्यांच्यामध्यें राज्यकारभारांतील कामांची केलेली वांटणी व प्रत्येकाचा खुद्द राजाशीं ठेविलेला संबंध.
(७) राज्यकारभारांत लष्करी खात्यापेक्षां इतर खात्यांस दिलेलें वर्चस्व.
(८) ब्राह्मण, प्रभु व मराठे या तिन्ही जातींतील लोकांकडे राज्यांतील लहान मोठीं कामें सोंपवून एकमेकांचा एकमेकांवर दाब राहण्याची कलेली व्यवस्था.