नोकर लोकांस रोख पगार देणें आणि खुद्द सरकारी नोकरांनी जमीन महसूल वसूल करणें या दोन गोष्टी शिवाजीने आपल्या राज्यांत अमलांत आणिल्या होत्या. या दोन बाबीसंबंधानें जुन्या राज्यपद्धतींत शिवाजीनें जो फेरफार केला त्याचा विशेष निर्देश बखरकारांनीं केला आहे. कारण ह्या दोन गोष्टी अमलांत आणण्याचा शिवाजीचा अगदीं निश्चय झाला होता असें दिसतें. शिवाजीच्या पूर्वी राज्यकारभारांत जो घोटाळा उडून जात असे तो पुष्कळ अंशीं गांवच्या व जिल्ह्याच्या जमीनदाराकडे वसुलाचें काम सोंपविल्यामुळें होत असे अशी शिवाजीची बालंबाल खात्री झाली होती. हे जमीनदार लोक रयतापासून वाजवीपेक्षा अधिक पैसा वसूल करीत ; पण सरकारी खनिन्यांत भरणा करितांना कमी रकम भरीत. शिवाय संधि साधून लोकांत तंटे बखेडे उत्पन्न करण्यास व कधीं कधीं वरिष्ठ सरकारच्या हुकुमाची अवज्ञा करण्यास चुकत नसत. शिवाजीच्या पूर्वी जमीनदाराकडे जीं कामें असत ती करण्यास त्यानें पगारी नोकर-कमाविसदार, महालकरी आणि सुभेदार-नेमिले होते. शेतामध्यें पीक उभें असतां धान्याचा व रोख पैशाचा वसूल करणें हें कमाविसदाराचें काम असे. शेतांतील जमिनीची योग्य प्रकारें मोजणी करून खातेदाराच्या नांवासह सरकारी दप्तरांत नोंदिली जात असे व दरसाल खातेदाराकडून सरकारी देण्याबद्दल कबुलायत घेतली जात असे. वसूल धान्याच्या रूपानें घ्यावयाचा झाल्यास सरकारी सारा उप्तन्नाच्या दोनपंचमांशाहून अधिक केव्हांही वसूल केला जात नसे. बाकीचें उत्पन्न खातेदारास मिळे. कडसरीच्या दिवसांत अगर कांहीं आकस्मिक कारण घडून आल्यास तगाईदाखल शेतक-यांस मोठमोठ्या रकमा मिळत. आणि त्यांची फेड चार पांच वर्षांच्या मुदतींत हप्त्याहप्त्यानीं करून घेतली जात असे. प्रत्येक सुभेदाराकडे मुलकी व फौजदारी हे दोन्ही अधिकार असत. दिवाणी कज्जाच्या कामास त्यावेळी विशेषसें महत्व नव्हतें, आणि तशा प्रकारचे तंटे उप्तन्न झाल्यास सुभेदार गांवांतील पंचांच्या मार्फत व विशेष भानगडीचा कब्जा असल्यास इतर ठिकाणच्या पंचांच्या मार्फत त्याचा निकाल करून तो अमलांत आणीत असे.
जिह्यांतील दिवाणी बाबींची व्यवस्था राजधानीच्या मुख्य शहरीं असणान्या बड्या अधिका-यांच्या ताब्यांत असे. ह्या अधिका-यांपैकीं दोघां- पंत अमात्य व पंत सचीव --कडे अनुक्रमें हल्लींच्या राज्यव्यवस्थेंत जीं कामें जमाखर्ची प्रधान व दप्तरदार व हिशेबतपासनीस यांजकडे आहेत तीं असत असें ह्मणण्यास हरकत नाहीं. जिल्ह्यांतील सर्व हिशेब या दोघांकडे पाठविले जात व तेथें एकंदर राज्याच्या हिशेबाची तोंडगिळवणी करणें, हिशेबाची तपासणी करून चुका दुरुस्त करणें व चुकी करणा-यास दंड करणे हीं कामें होत. जिल्हाकामगारांच्या कामाची तपासणी करण्याकरितां आपल्या तैनातींतील माणसें पाठविण्याचा या बड्या अम्मलदारांस अधिकार असे. पंत अमात्य व पंत सचीव हे राज्यामध्यें पेशव्यांच्या खालोखालचे उच्च दरजाचे अधिकारी होत, व त्यांच्याकडे मुलकी कामाखेरीज लष्करी अधिकारही सोंपविलेले असंत. आठ खात्यांवरील मुख्य अधिकारी ज्यांस अष्टप्रधान ह्मणत, त्यांच्यामध्ये हे वरील दोन अधिकारी मोठ्या महत्वाचे मानले जात. खुद्द राजाच्या खालच्या दरजाचा अधिकारी ह्मणजे मुख्य प्रधान यास पेशवा असें ह्मणत व त्याजकडे लप्करी अमलासुद्धां इतर सर्व राज्यव्यवस्थेचा कारभार असे. व सिंहासनाच्या खालीं उजवे बाजूस पहिल्या जाग्यावर बसण्याचा त्याचा मान असे. सेनापति यांनकडे फक्त लष्करची सर्व व्यवस्था असून त्याची जागा तक्ताच्या डाव्या बाजूची पहिली होती. अमात्य व सचीव हे पेशव्यांच्या उजव्या बाजूस अनुक्रमें बसत व त्यांच्या खाली मंत्री ह्मणजे राजाचा खासगी कारभारी बसत असे. परराष्ट्रीय प्रधान ज्यास सुमंत ही संज्ञा होती, तो सेनापतीच्या डाव्या बाजूस बसत असून त्यानंतर धर्माध्यक्ष पंडितराव व मुख्य न्यायाधीश हे अनुक्रमें बसत. येथवर दिलेल्या हकीगतीवरून असें दिसून येईल कीं, हिंदुस्थानचा राज्यकारभार चालविण्याची हल्लींची ब्रिटिश सरकारची पद्धति शिवाजीच्या अष्टप्रधानांच्या पद्धतीचीच छाया होय. त्यावेळचे पेशवे ह्मणने हल्लीचे गव्हरनर जनरल ज्यांस व्हाईसराय (प्रतिनिधि) असेंही ह्मणतात ते होत. सेनाध्यक्ष-जमाखर्ची प्रधान व परराष्ट्रीय प्रधान या हुद्यांचे अधिकारी हल्लींही आहेत. फरक इतकाच कीं, हल्लींच्या विधायक मंत्रिमंडलांत धर्माध्यक्ष, न्यायाधीश व खासगी कामगार यांचा समावेश होत नाहीं, तथापि त्यांच्या ऐवजीं त्यांत होम खात्याचे सभासद, कायदे कानू करणारा सभासद व पब्लिक वर्कसचा मुख्य अधिकारी हे असतात. हा फेरफार परिस्थितीच्या बदलामुळें झालेला आहे. तरी राजास राजकीय कामाचा भार योग्य प्रकारें संभाळण्याचे कामीं मदत करण्याकरितां राज्यांतील निरनिराळ्या खात्यांचे वरिष्ठ अधिका-यांचे एक मंडल असावें ह्या तत्वाच्या पायावर ह्या दोन्हीं पद्धतींची रचना झालेली आहे. शिवाजीनें स्थापिलेल्या व अमलांत आणिलेल्या ह्या पद्धतीवरहुकूम जर त्याच्या वंशजांनी राज्यकारभार चालविला असता, तर सुव्यवस्थित व बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेशीं गांठ पडण्यापूर्वीच मराठी राज्यावर जीं अनेक संकटें आली व ज्यांच्यामुळें अखेर तें राज्य नष्टप्राय झालें, त्यांपैकीं बरीच संकटें सहज टाळतां आलीं असतीं.