शिवाजीच्या ताब्यांत सुमारे २८० किल्ले होते असा बखरीमधून उल्लेख सांपडतो. एका अर्थी असें ह्मणण्यास हरकत नाहीं कीं, डोंगरी। किल्ला व त्याच्या पायथ्याचा सभोंवारचा आसपासचा प्रदेश हा राज्याचा एक तुकडा मानणें हे शिवाजाच्या राज्यपद्धतीचें तत्व होतें. नवे किल्ले बांधण्याकडे व जुन्यांची दागदुगी करण्याकडे पैसा खर्च करण्यास तो बिलकुल मागें पुढें पहात नसे. त्याच्या किल्ल्यावर विपुल लष्कर व सामुग्री ठेविलेली असे. ज्या मर्दुमकीच्या कृत्यामुळें, शत्रूंच्या हल्ल्यास दाद न देणारे व आंत सुरक्षितपणें राहून बाहेरील शत्रूवर यथास्थित मारा करण्यास योग्य ह्मणून ह्या किल्यांची प्रसिद्धी झाली आहे, तींच कृत्यें ह्मणने मराठ्यांनी अगदीं प्रथम प्रथम ज्या लढाया मारिल्या त्यांतील मनोहर भाग होय. ह्या किल्लेरूपी दुव्यांनी महाराष्ट्र प्रांत अगदीं एकत्र सांधून सोडला होता व अगदीं आणीबाणीच्या प्रसंगीं त्यांनींच त्याचें रक्षण केलें. सातारा प्रांतांत खुद्द सातारा किल्यानें, अवरंगजेबाच्या अफाट सैन्यानें वेढा दिला असतांही कित्येक महिन्यापावेतों टिकाव धरिला होता; व अखेरीस त्या किल्ल्याचा पाडाव होऊन जरी तो शत्रूच्या ताब्यांत गेला तरी राजारामाच्या वेळीं हल्लींच्या औंधकरांच्या पूर्वजांनी तो किल्ला अगदीं प्रथम शत्रूकडून परत मिळविला. तोरणा व रायगड हे किल्ले शिवाजीच्या बाल्यावस्थेंतील पराक्रमाचीं फलें होत. शिवनेरी किल्ला तर त्याचें जन्मस्थानच. बाजी प्रभूच्या मर्दुमकीनें पुरंदर किल्ला प्रसिद्धीस आला व रोहिडा ? आणि सिंहगड हे किल्ले अद्वितीय योद्धा तानाजी मालुसरा याच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. शिद्दी जोहाराच्या प्रचंड सेनेनें घातलेल्या वेढ्याशीं टक्कर दिल्याबद्दल पन्हाळा किल्याची ख्याति आहे. आणि रणशूर बाजी प्रभू यानें स्वतः च्या प्राणाची आहुति देऊन रांगणा किल्ल्याच्या नजीकच्या खिंडींतील रस्ता मोठ्या हिमतीनें रोखून धरिल्यामुळें तो किल्ला इतिहासप्रसिद्ध होऊन बसला आहे. मालवणचा किल्ला व कुलाबा हीं ठाणीं समुद्रावर लढाई करण्यास सज्ज अशा मराठी आरमाराचीं ठिकाणें होत. प्रसिद्ध अफझलखान याच्या वधाबद्दल प्रतापगड विख्यात असून माहुली आणि सालेरी येथें मावळे गड्यांनीं मोगल सेनापतीशीं झुंजून त्यांस हतवीर्य केल्याबद्दल ती स्थळें प्रसिद्धीस आलीं आहेत. शिवाजीच्या ताब्यांतील या किल्ल्यांच्या अगदीं पूर्वबाजूची सरहद्द कल्याण, भिवंडी, वांई, क-हाड, सुपें, खटाव, बारामती, चांकण, शिरवल, मिरज, तासगांव, व कोल्हापूर या किल्ल्यांनीं मर्यादित आहे.
या किल्ल्यांनीं शिवाजीची ऐन वेळीं जी महत्वाची कामगिरी बजाविली आहे तीवरून त्यांची व्यवस्था ठेवण्यांत व त्यांच्या संरक्षणांत शिवाजीनें जे श्रम घेतले होते त्यांचें चांगलें चीज झाल्याचें दिसून येतें. प्रत्येक किल्यावर एक हवलदार असून त्याच्या हाताखालीं त्याच्याच जातीचे कांहीं मदतगार असत व त्यांच्याकडे किल्ल्याभोवतालच्या निरनिराळ्या तटाचें संरक्षण करण्याचें काम असे. तसेच देशस्थ, कोंकणस्थ अगर क-हाडे या तीन ब्राह्मणवर्गांपैकीं सुभेदार अथवा सबनीस या हुयाचा एक ब्राह्मण अम्मलदार असे, व कारखानी ह्मणून एक प्रभू जातीचा हुद्देदार असे. ह्या दोघांही अम्मलदारांस किल्ल्यावरील हवलदाराचे मदतनीस ह्मणून कामें करावीं लागत. हवलदार व त्याचे हाताखालील मराठे कामगार यांच्याकडे किल्यावरील शिबंदीचा ताबा असे. ब्राह्मण सुभेदार दिवाणी व मुलकी कामें पाहत असे व किल्ल्याच्या आसपासच्या खेड्यांवर त्याचा अम्मल असे, आणि प्रभू कारखाननीस याचे ताब्यांत लष्करचा दाणागोटा, चंदीवैरण व दारूगोळा वगैरे लढाऊ सामान असून किल्ल्याच्या दागदुजीचें काम त्यासच पहावें लागे. अशा प्रकारें ह्या तिन्ही जातींच्या लोकांस एकाच ठिकाणीं पण निरनिराळीं कामें करावयास लागत आणि त्यामुळें त्यांच्यामध्यें परस्परांविषयी विश्वास उत्पन्न होऊन एकमेकांत मत्सर वाढण्यास बिलकुल जागा राहत नसे. डोंगर किना-याच्या बाजूनें मोठ्या दक्षतेनें संरक्षण केलें जात असे व किल्ल्याच्या पायथ्याकडील रानाचें रक्षण प्रजेपैकीं रामोशी व इतर हलक्या जातींच्या लोकांकडे सोंपविलें होतें. दिवसा व रात्रीं पाहण्याचें व रक्षणाचें काम कसें करावें याबद्दल प्रत्येक शिपायास फार काळजीपूर्वक समज दिली जात असे. किल्ल्याचा लहानमोठेपणा व त्याचें महत्व यांच्या मानानें किल्ल्यावरील लष्कराची संख्या कमी जास्त असे. प्रत्येक नऊ शिपायांवर एक नाईक असून त्यांच्या जवळ बंदुका, तरवारी, लहान मोठे भाले व पट्टे हीं हत्यारें दिलेलीं असत. नोकरीबद्दल प्रत्येक शिपायास त्याच्या हुद्याप्रमाणें रोख अगर अन्य रूपानें ठरीव असें वेतन मिळे.