शिवाजीची राज्यव्यवस्था.
प्रकरण ७वें.
शिवाजीच्या शिपाईगिरीच्या मर्दुमकीच्या इतिहासावरून, त्याच्या श्रेष्ठतम बुद्धिमत्तेच्या केवळ एका अंगाचा आह्मांस बोध होतो, व राज्यव्यवस्था सुयंत्रितपणें चालविण्यास लागणारे त्याच्या अंगी जे इतर गुण होते, व ज्यामुळें त्याच्याबद्दल अधिक पूज्यभाव उत्पन्न होतो, ते आमच्या लक्षांतून अजीबात जाण्याचा फार संभव आहे. प्रसिद्ध पहिल्या नेपोलियनप्रमाणें, शिवाजी हा आपल्या वेळच्या राजकीय संस्थांचा उत्पादक व रचयिता होता. आणि विशेषतः ह्याच संस्थांच्यायोगानें, त्यानें हाती घेतलेल्या कार्यांत त्यास यश मिळत गेलें, आणि त्याच्या पश्चात् फारच थोड्या अवकाशांत, महाराष्ट्रावर जी भयंकर संकटें कोसळलीं, त्यांतून सुरक्षितपणें पार पडून व मोंगलसत्तेशीं एकसारखीं वीस वर्षे झुंजून, महाराष्ट्रास पुनः आपलें स्वातंत्र्य स्थापितां आलें. शिवाजीनें स्थापिलेल्या ह्या राजकीय संस्था त्याच्यापूर्वी प्रचलित असलेल्या हिंदी अगर मुसलमानी राज्यपद्धतीहून अगदीं भिन्न असल्यामुळें त्यावरून त्याच्या अंगची विलक्षण कल्पकता व अमूप ग्राहकशक्ति हीं चांगला व्यक्त होतात, आणि ह्मणूनच त्या संस्थांचें आह्मांस लक्षपूर्वक निरीक्षण केलें पाहिजे. शिवाय, आपण आरंभिलेल्या व संपादिलेल्या कार्यात कधींही फाटाफूट व बेबंदशाई यांचा शिरकाव होऊं द्यावयाचा नाहीं असा शिवाजीचा बाणा होता, पण त्याच्याच वंशजांनी त्याच्या पश्चात् महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याप्रीत्यर्थ झगडुन पुनः स्वराज्य स्थापन केल्यानंतर, शिवाजीनें घालून दिलेलें राज्यपद्धतीचें वळण गिरविण्याचें सोडून देऊन जुन्या राज्यपद्धतीचा स्वीकार केला, व त्यामुळें, आपसांत फाटाफूट व बेबंदशाही यांचें त्यांनी बीजारोपण केलें. ही गोष्ट विशेष लक्षांत घेण्यासाखी आहे. सर्व हिंदुस्थानावर व खुद्द स्वतःच्या अमलाखालीं एकछत्री राज्य स्थापण्याची शिवाजीनें कधींही हांव धरिली नाहीं, हें पूर्वीच सांगण्यांत आलें आहे. आपल्या लोकांस राजकीय स्वातंत्र्य मिळवून द्यावें, स्वसंरक्षण व स्वत्वस्थापन करण्यास त्यांस समर्थ करावें, आणि राष्ट्र या नात्यानें त्यांच्यामध्यें ऐक्यभाव उत्पन्न करावा, एवढ्याचकरितां त्यांची सारी खटपट होती. इतर राष्ट्रांचा उच्छेद करावा, ह्या कल्पनेचा त्यास गंधही नव्हता. गोवळकोंडा, बिदनूर, फार तर काय, पण विजापूर येथील बादशहांशीही त्याचें सख्य होतें, व त्यांच्या ताब्यांतील अनुक्रमें, तेलंगण, म्हैसूर व कर्नाटक ह्या प्रांतांत त्यानें कधींही ढवळाढवळ केली नाहीं. द्राविड देशांतील वडिलोपार्जित जहागिरीचा उपभोग त्यानें आपला सावत्र भाऊ जो व्यंकोजी यास एकट्यासच घेऊं दिला. मोंगलांच्या ताब्यांतील प्रांतांमधून चौथाई व सरदेशमुखी ह्या दोन बाबी वसूल करून तो स्वस्थ बसे. स्वराज्य ( खुद्द स्वतःच्या अमलाखालींल मुलूख ) व मोंगलाई ( स्वराज्याच्या बाहेरील परकीयांच्या अमलाखालील मुलूख ) हीं दोन परस्परापासून अगदीं भिन्न आहेत असें तो समजे. त्यानें ज्या राजकीय संस्था स्थापिल्या होत्या, त्या केवळ महाराष्ट्र देशाच्या राज्यकारभारापुरत्याच होत्या, तथापि महाराष्ट्र देशाच्या अगदीं दक्षिणेकडच्या प्रदेशांत, त्याच्या ताब्यांतील जे लढाऊ किल्ले होते, त्यांची व्यवस्था करण्याकडे, त्यांचा त्यानें अंशतः उपयोग केला होता. आपल्या अमलाखालील प्रदेशाचे त्यानें प्रांत (जिल्हा) म्हणून अनेक भाग केले होते. पुण्याजवळील वडिलोपार्जित जहागिरी शिवाय त्याच्या ताब्यांत पुढील प्रांत होते. १ मावळाप्रांत---हलींचे मावळा, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके --व त्याच्या सभोंवतींचे १८ डोंगरी किल्ले; २ वांई, सातारा आणि क-हाड हे प्रांत-हल्लींचा सातारा जिल्ह्याचा पश्चिमेचा भाग-व त्यांच्या भोंवतींचे १५ डोंगरी किले; ३ पन्हाळा प्रांत -हल्लींचा कोल्हापूर इलाख्याचा पश्चिमेचा भाग व १३ डोंगरी किल्ले; ४ दक्षिण कोंकणप्रांत-हल्लींचा रत्नागिरी जिल्हा व ५८ डोंगरी किल्ले आणि जलदुर्ग; ५ ठाणेंप्रांत-हल्लींचा उत्तर कोंकणभाग व १२ किल्ले; ६, ७ त्रिंबक आणि बागलाण प्रांत-हल्लींचा नाशिक जिल्ह्याचा पश्चिमभाग व ६२ डोंगरी किल्ले. या प्रांताखेरीज त्याच्या शिबंदी लष्कराची ठाणीं पुढील प्रांतांत होतीं. ८ वनगड प्रांत-हल्लींचा धारवाड जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग व २२ किल्ले; ९,१०,११ बिदनूर, कोल्हार व श्रीरंगपट्टण-हल्लींचा म्हैसूरप्रांत व १८ किल्ले; १२ कर्नाटक प्रांत -हल्लींच्या मद्रास इलाख्यांत सामील केलेला कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील प्रांत व १८ किल्ले; १३ वेलोरप्रांत-हल्लींचा अर्काट जिल्हा । व २५ किल्ले; आणि १४ तंजावर प्रांत व ६ किल्ले. सह्याद्रीच्या सर्व रांगेवर लहान मोठे किल्ले मधून मधून चमकत असत व पश्चिमेस समुद्रकिना-यापर्यंत व ह्या किल्लयांच्या पूर्व प्रदेशापर्यंत मधील प्रदेशाची रुंदी ५० मैलांपासून फार तर १०० मैलांपर्यंत होती.