प्रतापराव गुजर हाही एक घोडेस्वारांचा सेनापति होता. बागलाणांतील मोंगल फौजेचा व पन्हाळखोरींतील विजापूर सैन्याचा पराभव करण्याचें फार जोखमीचें काम शिवाजीनें याचेकडे सोंपविलें होतें. यानेंही ही कामगिरी आपल्या धन्याच्या मर्जीप्रमाणें बजाविली. शिवाजीनें मोंगल बादशहाशीं तह करून औरंगाबाद येथें जी मराठी फौज ठेविली होती त्यावरील मुख्य सरदार प्रतापरावच होता. विजापूरच्या सैन्याचा याणें नेटानें पाठलाग केला नाहीं म्हणून शिवाजीनें यास टपका दिला. ही गोष्ट प्रतापरावाच्या मनास फार झोंबली. विनापूरच्या सैन्याची व त्याची जेव्हां पुन: गांठ पडली तेव्हां तो त्या फौजेवर तुटून पडला. विजापूरच्या सैन्याचा यावेळी पूर्ण मोड झाला खरा, पण या कामीं प्रतापरावास तानाजी मालुसरे, बाजी फसलकर, सूर्याजी काकडे वगैरे लोकांप्रमाणें स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले, संताजी घोरपडे, धनाजी जाधव वगैरे शूर पुरुष यावेळीं नुकते कोठें समरांगणावर येऊं लागले होते. शिवाजीच्या पश्चात् यांची खरी योग्यता दिसून आली. यापैकी पहिल्या जोडीनें व-हाडांत मराठ्यांची सत्ता कायमपणें स्थापली. दुस-या जोडीनें अवरंगजेबास पादाक्रांत करून महाराष्ट्रास स्वतंत्र करण्याकरतां चालविलेल्या युद्धाचा शेवट गोड केला.
ह्या अशा लोकांच्या बलाची व अकलेची जोडगण होती ह्मणूनच शिवाजीस स्वराज्याची स्थापना करण्याचें कामीं मदत झाली. संकटकाळीं यापैकीं एकही वीर स्वकर्तव्यास विसरला नाहीं. एकही निमकहराम बनला नाहीं किंवा शत्रुपक्षास जाऊन मिळाला नाहीं. कित्येकांनी तर ' आपल्या कर्तव्यास आपण जागलों. ' असें म्हणून ऐन विजयाचे प्रसंगी मोठ्या आनंदानें आपले प्राण सोडले. ह्या स्वार्थत्यागांच्या गोष्टीवरून वरील लोकांची महती तर दिसून येतेच, पण त्याबरोबरच शिवाजीवरील त्यांचें विलक्षण प्रेम व ज्या सहत्कार्यासाठी ते झटत होते त्याची खरी योग्यताही दिसून येणारी आहे. इतक्या लोकांच्या श्रमानें ज्या राज्याची स्थापना झाली त्याची मर्यादा देणें अत्यंत जरूर आहे. १६७४ त शिवाजीस जेव्हां ज्याभिषेक झाला त्यावेळी स्वराज्याची मर्यादा बरीच वाढली होती. शहानीची पुणें प्रांतांतील जहागीर म्हणजे पुणें, सुपे, इंदापूर, बारामती हे परगणे, मावळचा सर्व भाग, वांई, सातारा, क-हाडपर्यंत सातार जिल्ह्याची पश्चिमेकडील सर्व बाजू, कोल्हापूरचा पश्चिम भाग, उत्तर दक्षिण कोंकणपट्टी व त्यांतील सर्व किल्ले, बागलाण, वेलोर, वेदनूर, म्हैसूर व कर्नाटकांतील ठाणीं इतक्या प्रदेशाचा त्यावेळी स्वराज्यांत अंर्तभाव होत होता. हा सर्व प्रांत शिवाजीच्या पश्चात् थोडक्याच दिवसांत मोंगलांनी पुनः काबीज केला. शिवाजीनें पुढच्या पिढीकरतां पैसा किंवा प्रदेश कायमपणें मिळवून ठेवला नाहीं. त्यानें जी संपत्ति मिळविली तिचें मोल कधींच करतां यावयाचें नाहीं. त्यानें महाराष्ट्रीयांत एकी करून त्यांच्या अंगीं एक प्रकारचा विलक्षण जोम आणला. त्यांच्या अंगीं असलेल्या गुणांची व शौर्याची त्यांस पूर्ण ओळख करून दिली. मुसलमानांचा पराभव करणें शक्य आहे हें त्यांच्या प्रत्ययास आणून दिल्हें. मराठ्यांत हा जो नवीन हिय्या उत्पन्न झाला त्यामुळेंच पुढें अवरंगजेबाशीं १६८५ पासून १७०७ पर्यंत सतत बावीस वर्षे टक्कर देऊन त्यांस स्वराज्याचे संरक्षण करतां आलें. शिवाजीच्या हाताखाली मराठ्यांच्या पुढा-यांस युद्धशिक्षण मिळालें नसतें तर अवरंगजेबाच्या तडाख्यांतून स्वराज्याची सुटका झाली नसती. शिवाजीच्या कारकीर्दीत सरासरी १०० लोक तयार झाले. प्रत्यक्ष समरांगणावर मिळालेल्या अनुभवानें हे लोक युद्धकलेंत अगदीं निष्णात झाले होते. राज्यनौका कशी हाकावी ही कलाही त्यांस पूर्ण अवगत झाली होती. असे १०० लोक जेव्हां तयार झाले तेव्हां त्यांचें अनुकरण करण्यास अर्थातच नवीन पिढी पुढें सरसावली. लोकांत नवीन तेज झळकूं लागलें. मुसलमानांस हाकून लावणें ह्मणजे यकश्चित् काम असें प्रत्येकास वाटूं लागलें. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, मोरोपंत पिंगळे वगैरे लोकांप्रमाणें स्वदेशसेवेंत आपले प्राण अर्पण करण्यास लाखो लोक तयार झाले. शिवाजी व त्यास सहायभूत झालेल्या लोकांनी घालून दिलेल्या अनुकरणीय कित्त्याचाच हा सर्व परिणाम नव्हे काय? हा परिणाम वाचकांस बरोबर कळावा म्हणूनच शिवाजीच्या चरित्राबरोबर त्याच्या साहाय्यकारी मंडळीचींही चरित्रें आह्मीं थोडक्यांत दिलीं. गुलामगिरींत दिवस गेल्यामुळें हताश झालेल्या महाराष्ट्रीयांत स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा यांचा अभिमान उत्पन्न करावा एवढ्याकरतांच शिवाजीचा अवतार होता. शिवाजीनें मिळविलेली संपत्ति व प्रांत संभाजीनें घालविले. पण शिवाजीनें लोकांत जें नवीन पाणी उत्पन्न केलें, त्याचे तेज बिलकुल कमी झालें नाहीं. जसजशीं नवीन संकटे येऊ लागलीं, तसतसा लोकांचा जोम अधिकच वाढत गेला. त्यांची शक्ति दुणावली. जयसिंग व दिल्लीरखान ह्यांच्या लहानशा फौजेपुढें शिवाजीस शस्त्र ठेऊन दिल्लीस जाणें भाग पडलें. पण शिवाजीनंतरच्या पिढीस खुद्द अवरंगजेब बादशहाच्या नायकत्वाखालीं तयार झालेल्या सेनासमुद्राशीं झुंजावयाचें होतें. तथापि ही नवी पिढी डगमगली नाहीं. अवरंगजेबास ते बिलकुल शरण गेले नाहींत. थोडा वेळ दक्षिणेकडे माघार खाऊन त्यांनीं पुनः त्याजवर चाल केली व त्याजपासून त्यांनी आपलें नुकसान सव्याज भरून घेतलें.