बाळाजी आवजी हा हबशाच्या पदरीं नोकरीस असलेल्या एका सरदाराचा वंशज होता. स्वतःचा जीव बचावण्याकरतां बाळाजी विश्वनाथाप्रमाणें ह्यासही आपले मुळचें गांव सोडून द्यावें लागलें होतें. १६४८ त शिवाजीनें याची हुशारी पाहून यांस आपला मुख्य चिटणीस केलें. याचा मुलगा व नातू यांणींही राजारामाचे कारकीर्दीत मोठमाठालीं कामे केलीं आहेत. चिटणीसांची ह्मणून जी बखर प्रसिद्ध आहे, ती यांच्याच घराण्यापैकीं एकानें लिहिली आहे.
मावळे सरदारांपैकीं येसाजी कंक हा मावळे लोकांच्या पायदळ पलटणींचा मुख्य अधिकारी होता. शिवाजीच्या कारकीर्दीच्या सुरवातीस मुलूख काबीज करण्याच्या कामी याचा फारच उपयोग झाला. हा व तानाजी नेहमी शिवाजीबरोबर असत. शिवाजीनें जेव्हां अफझुलखानास मारलें व शाईस्तेखानाच्या वाड्यांत शिरून जेव्हां शिवानीनें त्याच्यावर हल्ला केला, तेव्हां हे दोघेही शिवाजीबरोबर होते. शिवाजी दिल्लीस गेला तेव्हांही यांणी त्याची पाठ सोडली नाहीं.
तानाजी मालुसरे व त्याचा भाऊ सूर्याजी यांणी सिंहगड घेण्याच्या कामीं विलक्षण शौर्य दाखविलें आहे. जीवाची पर्वा न करतां हे दोन बंधू बेधडक सिंहगडच्या तटावर चढले व त्यांणी किल्ला सर केला. गड मिळाला पण तानाजी सिंह पडला. महाराष्ट्र कवीनीं याची कीर्ति वर्णिल्यामुळें या बंधुद्वयाची नांवें अजरामर झाली आहेत.
बाजी फसलकर देशमूख हा कोंकणांत सावतांशीं लढत असतां मेला. फिरंगोजी नरसाळा हा चाकणचा किल्लेदार होता. १६०४ त त्याणें तो किल्ला शिवाजीच्या स्वाधीन केला. जे लोक प्रथम शत्रू असून पुढें शिवाजीचे परममित्र झाले त्यांपैकींच बाजी फसलकर हा एक होता. मोंगलांनी चाकण पुनः घेतलें तेव्हां ते बाजी फसलकरास नोकरीस बोलवूं लागले. पण फसलकर त्यांच्या थापेस भुलला नाहीं. त्याणें शिवाजीच्या सैन्यांत नोकरी धरली.
संभाजी कावजी आणि रघुनाथपंत हे जावळीवर हल्ला करण्यांत प्रमुख होते. याच हल्लयांत चंद्रराव मोरे मारला गेला. येसाजी कंक जसा पायदळाचा मुख्य होता तसा नेताजी पाळकर हा घोडेस्वारांचा मुख्य सरदार होता. शिवाजीच्या सर्व सरदारांत हा फार धाडशी व बाणेदार होता. अहमदनगर, जालना, औरंगाबादेपर्यंत पूर्वेकडील सर्व प्रदेश याणें लुटून फस्त केला होता. कोठेंही संकटाची वेळ आली की, तेथें ही स्वारी दत्त असेच.