मोरोपंत पिंगळे तर शिवाजीचा उजवा हातच होता. उत्तर कोकणांत व बागलाणांत शिवाजीची सत्ता यानेंच वाढविली. ही महत्वाची कामगिरी बजाविल्याबद्दल शिवाजीनें त्यांस पेशवाईची वस्त्रें दिलीं. किल्ले बांधण्याच्या व सैन्य तयार करण्याच्या कामांत तो फार निष्णात होता. मोरोपंताचा बाप कर्नाटकांत शहाजीकडे नोकरीस होता. कांहीं दिवस बापाजवळ राहून मोरोपंताने कर्नाटकप्रांत सोडला व स्वदेशी येऊन त्याणें १६५३ त शिवाजीच्या सैन्यांत नोकरी धरली. यावेळीं त्याचे वय फारच लहान होतें. मोरोपंताच्या पूर्वी पेशवाईचें काम शामराजपंत पहात होता. त्याच्या हातून कोंकणप्रांतांत शिद्दी व सावंत यांणीं माजविलेला पुंडावा मोडवेना. तेव्हां त्या कामगारीवर शिवाजीनें मोरोपंतास पाठविलें. मोरोपंतानें ही कामगिरी उत्तम प्रकारे फत्ते केली. त्यावेळच्या बहुतेक सर्व लढायांत मोरोपंत हजर असे. शिवाजीच्या पाठीमागें मोरोपंत फार दिवस जगला नाहीं. बाळाजी विश्वनाथास शाहूमहाराजांकडून १७१४ त पेशवाईची वस्त्रें मिळेपर्यंत ' पेशवाई' मोरोपंताच्या घराण्यांत अव्याहत चालली होती. मोरोपंत हा राजकीय बाबतींत शिवाजीचा मुख्य सल्लागार असून शिवाय त्यावेळचा प्रसिद्ध सेनानीही होता. याच्याइतका हुशार व निस्सीम राजभक्त निदान त्यावेळच्या लोकांत तरी सांपडणार नाही.
आबाजी सोनदेवहीं हणमंते व पिंगळे यांच्याच तोडीचा माणूस होता. आपल्याच प्रदेशांत न घुटमळतां परमुलखांत बेशक शिरून कल्याणावर प्रथम याणेंच स्वारी केली. कल्याण वरचेवर मोंगल घेत, पण आबाजी सोनदेव यांच्या कोकणसुम्यांतील आघाडीचें ठाणें नेहमी हेंच असे मोरोपंताप्रमाणें आबाजी सोनदेवही किल्ले बांधण्याच्या कामांत मोठा कुशल होता. शिवानी दिल्लीस गेला तेव्हां मागें राज्यकारभाराचे कामीं जिजाबाईस सल्लामसलत देण्यास शिवाजीनें आबाजी सोनदेव व मोरोपंत यांसच सांगितलें होते. आबाजीस प्रथमतः मुझुमदारी च्या जागेवर नेमिलें. पुढें शिवाजीस जेव्हां राज्याभिषेक झाला तेव्हां आबाजीच्या मुलास अष्टप्रधानांपैकी अमात्याची जागा मिळाली.
राघोबल्लाळ अत्र्यानें शिंद्याबरोबर झालेल्या लढायांत बरीच कीर्ति मिळविली होती. चंद्रराव मो-याचा पराभव करण्याच्या कामांत हाच पुढारी होता. याचें शौर्य पाहून आपल्या पठाण पलटणीच्या आधिपत्याचा पहिला मान शिवाजीनें यासच दिला होता.
अण्णाजी दत्तोही यावेळीं फारच प्रसिद्धीस आला होता. हा प्रथमतः पंतसचिव व नंतर सुरनीस झाला. पनाळा व रायगड घेण्याच्या कामीं याणें फार मेहनत घेतली, कोंकणप्रांतांतील लढायांतही हा होता. कर्नाटकावर पहिली स्वारी याणेंच केली, व त्याचवेळी त्याणें हुबळी शहर लुटलें. कोंकणच्या उत्तरपट्टीची व्यवस्था आबाजी सोनदेव व मोरोपंत पहात. तळकोंकणची व्यवस्था अण्णाजीदत्तोकडे होती. शिवाजी दिल्लीस गेल्यावर मागें ज्या लोकांवर आपल्या राज्याचें रक्षण करण्याचें काम त्याणें सोंपविलें होते त्या लोकापैकींच अण्णाजीदत्तो हा एक होता.