कांहीं मुसलमानांवरही या नवीन विचारांचा परिणाम घडला. दर्यासुरुंग नांवाचा एक मुसलमानच शिवाजीच्या आरमाराचा मुख्य सरदार होता. यानें मोंगलाच्या शिद्दी तांडेलास अगदी जेरीस आणलें. इब्राहिमखान नांवाच्या एका मुसलमानाकडेच शिवाजीनें पठाण सैन्याचें अधिपतित्व दिलें होतें. विजापूर व गोवळकोंडा येथील दरबारांनी कमी केलेल्या मोंगल शिपायांस शिवाजी आपल्या नोकरीस ठेवी. अशा शिपायांची शिवाजीनें एक निराळीच पलटण बनविली होती.
शिवाजीच्या हाताखालीं ब्राह्मण, प्रभू, मराठे व मावळे किती होते; परस्पराशी त्यांचें काय प्रमाण होतें वगैरे गोष्टींची माहिती ग्रांट साहेबांनीं आपल्या इतिहासांत दिली आहे. ग्रांटडफ साहेब ह्मणतात कीं शिवाजीच्या सैन्यांत प्रमुख प्रमुख २० ब्राह्मण होते, ४ प्रभू होते व मराठे व मावळे सरदार १२ होते. मोंगलांच्या व विजापूर बादशहाच्या पदरींही १४ मराठे सरदार होते. ब्राह्मण मंडळींपैकी पंडितराव व न्यायाधीश हे दोन अधिकारी खेरीजकरून बाकी सर्वांस मुलकी दिवाणी कामें करून वेळ पडल्यास शिपाईबाणीचाही पोशाख चढवावा लागे. ही दोन्हीं कामे त्यांणीं फार उत्तम रीतीनें बनावलीं. ग्रांड डफनें दिलेले आंकडे बखरींत दिलेल्या आंकड्याशीं जुळत नाहींत, तथापि निरनिराळ्या जातींतील वर दाखविलेले प्रमाणांत त्यामुळें कांहीं अंतर होत नाहीं चिटणवीस यांच्या बखरींत. शिवाजीच्या हाताखालीं ब्राह्मण व प्रभू सरदार ५० व मावळे आणि मराठे सरदार ४० होते असे लिहिलें आहे. पण बखरीच्या शेवटी त्याणें जी यादी दिली आहे तींत ४५ ब्राह्मण व ७५ मावळे आणि मराठे लोकांची नावे आढळतात, ठोकळ मानानें पाहिलें तर सर्व जातींतील मिळून सरासरी १०० लोक शिवानीच्या कारकीर्दीत उदयास आले. मोंगलांस पादाक्रांत करून रायगड येथे स्थापलेल्या नवीन हिंदूपदपादशाहीचे खरे आधारस्तंभ हेच होते. या सर्व लोकांची चरित्रें आमच्या लहानशा इतिहासांत देणें अशक्य आहे. कारण तसें केलें तर ग्रंथ फार वाढेल. करितां ज्या लोकांनीं आपली नांवें प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या हृदयपटलावर कोरली आहेत, ज्यांच्या कीर्तीचे पोवाडे महाराष्ट्रांतील कवीनीं गाइले आहेत, ज्यांचीं अलौकिक कृत्यें बखरकारानीं बखरींत गोवून अक्षय्य करून टाकलीं आहेत अशा वेचक वेचक नरवीरांचींच चरित्रें आह्मीं लिहिणार आहोंत. यावरून इतरांची योग्यता आह्मीं कमी समजतों असें नाही. त्याणींही आपआपल्यापरी मोठीं शूर कृत्यें करून स्वदेशाच्या मुक्ततेस हातभार लाविला आहे.
ब्राह्मण मंडळींत हणमंते त्या वेळी फार नांवानलेले होते. दादोजीकोंडदेवाकडे जशी शाहानीच्या पुणें प्रांताची व्यवस्था होती, तशीच कर्नाटक प्रांताची व्यवस्था नारोपंत हणमंते यांजकडे होती. नारोपंताप्रमाणें त्याचे मुलगे रघुनाथपंत व जनार्दनपंतही फार हुशार होते. शिवाजीचा भाऊ व्यंकोजी यास तंजावर प्रांतीं एक नवीन राज्य स्थापण्यास विशेषतः रघुनाथपंतानेंच मदत केली. पुढें व्यंकोजीचें व त्याचें जेव्हां जुळेनासें झालें, तेव्हां त्याणें जिंजीचा किल्ला स्वाधीन करून घेऊन अर्काट, वेलोर व म्हैसूर प्रांतांतील कांही भाग यावर आपला अम्मल चालू केला. यांच्याच सांगण्यावरून शिवाजीनें कर्नाटकावर स्वारी केली. या स्वारीच्या वेळीं रघुनाथपंतानें आपल्या ताब्यांतील सर्व ठाणीं शिवाजीच्या हवालीं केलीं. संभाजीस कैद करून अवरंगजेब जेव्हां एकामागून एक मराठ्यांचे किल्ले घेऊं लागला, तेव्हां मराठ्यांस दक्षिणेंत पळ काढावा लागला अशा ऐन अडचणीचे प्रसंगी त्यांस दक्षिणेंतील या ठाण्यांचा त्यांस फार उपयोग झाला. कांहीं काळ तर त्यांणीं जिंजीकिल्याच्या मजबूत तटबंदीच्या आश्रयाखालींच काढला. अवरंगजेबाची खोड मोडण्याची त्यांची तयारी येथेंच झाली. येथूनच एकदिलानें व एकजुटीनें पुनः स्वदेशीं जाऊन त्यांनीं अवरंगजेबाचें पूर्ण पारिपत्य केलें. रघुनाथपंताचा भाऊ जनार्दनपंत हा तर खुद्द शिवाजीच्या सैन्यांतच होता. मोगलांशीं यांचे अनेक युद्धप्रसंग झाले आहेत. अशा प्रकारचे हे हणमंते बापलेक स्वामीकार्यास फार उपयोगीं पडले. यांच्यासारखे शूर आणि मुत्सद्दी पुरुष जगांत फार विरळा सांपडतील.