तोरणा किल्ला घेऊन व रायगडावर शिबंदी वगैरे ठेऊन महाराष्ट्र राज्यरूपी इमारतीच्या पायाचा दगड शिवाजीच्या हातून बसते न बसतो इतक्यांत दादोजी कोंडदेव वारला. जवळ जवळ दहा वर्षे शहाजीच्या जहागिरीची व्यवस्था दादोजी कोंडदेवाने पाहिली. इतक्या अवधींत त्याच्या हाताखाली बरेच लोक कारकुनीच्या कामांत तरबेज झाले. जसजसें स्वराज्य वाढत गेलें, तसतसा शिवाजीस या लोकांचा फार उपयोग झाला. आबाजी सोनदेव, रघुनाथ बल्लाळ, शामराजपंत मोरोपंत पिंगळ्यांचे वडील वगैरे मंडळीस मुलकी व लष्करी शिक्षण दादोजीनेंच दिलें होतें; हे लोक शिवाजीस नेहमीं प्रोत्साहन देत. यांचा तसाच अण्णाजी दत्तो, निराजी पंडित, रघोनी सोमनाथ, दत्तानी गोपीनाथ, रघुनाथपंत आणि गंगाजी मंगाजी वगैरे लोकांचा स्वराज्य स्थापण्याच्या कामीं शिवाजीस फार उपयोग झाला. स्वदेशाची यवनांच्या त्रासापासून सुटका करण्याची जी नवीन चळवळ महाराष्ट्रांत सुरु झाली होती त्या चळवळींत एखादी युक्ति अगर कल्पना सुचवावयाची झाली तर हेच लोक सुचवीत. ह्यांनी सांगितलेली कामगिरी धड्या छातीनें व बाहुबळानें तंतोतंत बजावण्याचें काम शिवाजीने बाळपणचे मित्र येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी फसलकर वगैरे मावळे बहादरांनी उचललें होतें. या मावळे बहादरांच्या पाठीस पाठ देण्यास फिरंगोजी नरसाळा, संभाजी कावजी, माणकोजी दहातोंडे, गोमाजीनाईक, नेताजी पाळकर, सूर्याजी मालुसरे. हिरोनी फर्जंद, देवजी गाढवे वगैरे मावळे मंडळी एका पायावर तयार होतीच; शिवाय या मंडळीस महाडचे मुरारबाजी प्रभू, हिरडे मावळांतील बानी प्रभू व हवसाणचे बाळाजी आवजी चिटणवीस वगैरे प्रमुख प्रमुख प्रभू येऊन मिळाले. मुरारप्रभू व बाजीप्रभू हे प्रथमतः मोंगलांकडे चाकरीम होते; पण शिवानीनें त्यांचें शौर्य पाहून त्यांस आपल्या सैन्यांत जागा दिल्या. शिवाजीच्या अंगी असा कांहीं विलक्षण गुण होता कीं, त्याच्या शत्रू सही त्याच्याशीं सख्य करून, इमानेंइतबारें त्याची नोकरी करावी असें वाटे. आरंभीं शिवाजीस मुख्यतः ब्राह्मण, प्रभू व मावळे लोकांची मदत होती. विजापूर आणि अहमदनगर या दोन दरबारच्या पदरी नोकरीस असलेल्या मुख्य मुख्य मराठे सरदारांनीं यावेळीं त्यास बिलकुल मदत केली नाहीं इतकेंच नव्हे, तर उलट त्याचा पायमोड करण्याची त्यांनी होईल तितकी खटपट केली, यामुळें निरुपाय होऊन त्यांच्यावरही शिवाजीस शस्त्र धरावें लागलें. या मराठे मंडळींत बाजी मोहिते ह्मणून शहाजीचा एक नातेवाईक होता. शिवाजीस सुपें घ्यावयाचे वेळीं त्याच्यावरही छापा घालून, त्यास कैद करून कर्नाटकांत पाठवावे लागलें.
मुधोळच्या बाजी घोरपड्यानें तर, नीचपणाची कमालच केली. विजापूर दरबारच्या चिथवणीवरून, त्यानें शहाजीस गुप्तपणें धरण्याचा घाट घातला. या कृत्याबद्दल शिवाजीनें त्यास भयंकर प्रायश्चित भोगावयास लावलें. जावळीच्या मो-यांनी शिवाजीचा खून करण्याकरतां विजापुरदरबारनें पाठविलेल्या एका पाजी ब्राह्मणास आपल्या प्रांतांत आश्रय दिला ही गोष्ट शिवाजीस कळली तेव्हां स्वतःचा जीव बचावण्याकरतां मो-यांस जमीनदोस्त करणें त्यास भाग पडलें. मो-यांचा सूड उगविण्याच्याकामीं शिवाजीस कुमार्ग स्वीकारावा लागला; पण याबद्दल शिवाजीस जबाबदार धरतां येत नाहीं. नीच' मनुष्यास योग्य शासन देण्यास प्रसंगी तसेच उपाय योजावे लागतात. कांट्यानेंच कांटा काढला पाहिजे. वाडीचे सावंत, कोंकणचे दळवी व शृंगारपुरचे शिरके आणि सुरवे वगैरे लोकांनीं, शिवाजीनें आरंभिलेल्या महत्कार्यात बरेच अडथळे आणले,यामुळें त्यांसही पादाक्रांत करून कह्यांत ठेवणें शिवाजीस भाग पडलें. फलटणचे निंबाळकर, ह्मसवडचे माने, झुंजारराव घाटगे वगैरे बडीबडी मराठे मंडळी, स्वदेशाची मुक्तता करण्यासाठीं सज्ज झालेल्या शिवाजीप्रभृति नवीन पक्षाशीं विजापूरच्या वतीनें सारखी लढत होती. या गोष्टींवरून असें सिद्ध होतें की, शिवाजीने अस्तित्वांत आणलेल्या या नवीन राष्ट्रीय चळवळीचा सर्व जोर कायतो मध्यम दर्जाच्या लोकांवरच अवलंबून होता. जुन्यानुन्या मराठे जाहागीरदारांनीं प्रारंभीं तरी या चळवळीस बिलकुल मदत केली नाहीं. जसा शिवाजीस जय येऊं लागला, तशी या जुन्या मराठे जहागीरदारांच्या घराण्यांतील तरुणबांड मंडळी शिवाजीस येऊन मिळाली. प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, शिदोजी निंबाळकर, संभाजी मोरे, सूर्यराव काकडे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, परसोजी रूपाजी भोंसले, नेमाजी शिंदे वगैरे मंडळी शिवाजीच्या कारकीर्दीच्या शेवटीं शेवटीं फार प्रसिद्धीस आली. ही नवीन राष्ट्रीय चळवळ सिद्धीस जाण्यास अशा थोर थोर मंडळीनीं जेव्हां कंबर बांधलीं, तेव्हां इतर सर्व दर्जाचे लहानथोर लोक तिच्याकरतां स्वत : च्या प्राणाचे बळी देण्यास तयार झाले; पण ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, महाराष्ट्राची सुटका करण्याच्या कामास, ज्यांस आह्मीं सूढ समजतों, अशा लोकांनीच प्रथम सुरुवात केली. त्यांणीं आरंभिलेल्या कार्यात त्यांस यश येणार, अशीं चिन्हें जेव्हां सर्वत्र दिसूं लागली तेव्हांच समाजाचे पुढारी ह्मणविणारे लोक त्यांस जाऊन मिळाले.