बीं कसें बळावले ?
प्रकरण ४ थे.
गेल्या भागांत जी तोटक हकीगत दिली आहे, त्यावरून मराठ्यांची पांगलेली शक्ति एकत्र करून ज्या वीरनायकानें मराठी साम्राज्याची स्थापना केली, त्या वीरनायकाच्या आंगच्या अलौकिक गुणांची वाचकांस बरीच ओळख झाली असेल. शिवाजी महाराजांचा उदय झाला नसता तर मराठेशाई ' मुळी अस्तित्वांतच आली नसती असें कदाचित् आमच्या वाचकांस वाटेल, पण हा त्यांचा समज चुकीचा आहे. शिवाजीस सर्व बाजूने मदत मिळाली नसती तर त्याच्या एकट्याच्या हातून पारतंत्र्यापासून महाराष्ट्राची कधींच सुटका होतीना. जमीन बरोबर नसती तर त्याणें पेरलेलें बीं वाळून किंवा कुजून गेलें असतें. मोगल अमदानीचा कष्टमय अनुभव मिळूनही त्या वेळचे कर्तेलोक शिवाजीस मदत करण्यास राजीखुषीनें तयार झाले नसते तर शिवाजी सारख्या अचाट बुद्धीच्या मनुष्याचेही प्रयत्न निर्फल झाले असते. शिवानीच्या मनोवेधक चरित्रानें एतद्देशीय व परदेशीय सर्व इतिहासकारांस इतके अंध बनविलें आहे कीं, शिवाजीस सहायभूत झालेल्या लोकांचे त्यास बिलकुल महत्व वाटत नाहीं. तत्कालीन पुरुषांच्या अंगी अढळून येणारी शक्ति, बुद्धी आणि महत्वाकांक्षी शिवाजीच्या अंगी जरा विशेष प्रमाणानें विकास पावली होतीं. यावांचून शिवाजीच्या अंगी कांहीं विशेष नव्हतें. शिवाजीनें जें बीं रुझविलें त्यास पाणी घालून त्याची त्यावेळेच्या कर्यासवत्यो पुरुषानीं योग्य जोपासना केली नसती तर, महाराष्ट्रराज्यवृक्ष मुळींच बनला नसता, ही गोष्ट त्यांच्या अगदी लक्षांत येत नाहीं. त्यावेळच्या प्रसिद्ध पुरुषांची शिवाजीस किती मदत झालीं हें मोठ्या मोठ्या इतिहासकारांस जर कळत नाहीं तर आमच्या वाचकांस कसें कळावे ? पण शिवाजीच्या चरित्राची व त्याच्या वेळच्या परिस्थितीची बरोवर माहिती होण्यास ही गोष्ट कळणें अत्यंत जरूर असल्यामुळें, शिवाजीच्या वेळीं प्रसिद्धीस आलेल्या शूर शिपायांची मुत्सद्यांची व धर्मोपदेशकांची त्रोटक चरित्रें या भागांत देण्याचे आह्मीं योजिलें आहे. या पुरुषांचीं चरित्रें लिहिण्यास असावी अशी साधनें उपलब्ध नाहींत. जी थोडीबहुत माहिती मिळते तेवढ्यावरच हें काम करणें भाग पडत आहे. पण इलाज नाहीं.